Dailyhunt
Nashik: सिंहस्थापूर्वी गोदावरी प्रदूषणमुक्त; 227 कोटींच्या 'त्या' प्रकल्पाला मंजुरी

Nashik: सिंहस्थापूर्वी गोदावरी प्रदूषणमुक्त; 227 कोटींच्या 'त्या' प्रकल्पाला मंजुरी

Godavari Nashik

नाशिक (Nashik): केंद्र शासनाच्या अमृत २ अभियानांतर्गत नाशिक महापालिकेच्या २२७.१८ कोटी रुपयांच्या दोन मलनि:स्सारण प्रकल्पांना राज्य शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

यामध्ये १२०.१७ कोटींच्या नवीन मलवाहिका तर १०७ कोटींच्या जुन्या मलवाहिका बदलण्याच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांना मंजुरी मिळाल्याने सिंहस्थापूर्वी गोदावरी प्रदूषणमुक्तीच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. तसेच नंदिनी या गोदावरीच्या उपनदीत मलजल मिसळण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघणार आहे. या योजनेत महापालिका खर्चाचा निम्मा भार उचलणार आहे.

Nashik: निकृष्ट रस्तेकामाच्या विरोधात 2 अधिकारी अन् 2 कारवाया

नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थात अमृतस्नानासाठी सुमारे पाच लाख साधू-महंत व सात कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी प्रदूषण मुक्त असावी अशी साधूमहंत व पर्यावरणप्रेमी यांनी वेळोवेळी मागणी केलेली आहे.

सध्या गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या पात्रात सोडण्यात आलेल्या सांडपाण्याच्या नाल्यांमुळे गोदावरी नदी प्रदूषित बनली आहे. त्यातच सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने उभारलेली मलनिस्सारण केंद्रे कालबाह्य झाल्याने गोदाप्रदूषणात भर पडत आहे.

सध्या महापालिका पीपीपी तत्त्वावर मलनिस्सारण केंद्राचे आधुनिकीकरण करीत आहे. मात्र या मलनि:स्सारण केंद्रापर्यंत सांडपाणी वाहून आणण्यासाठी पर्याप्त क्षमतेच्या मलवाहिका नसल्यामुळे नदीप्रदूषणमुक्तीला अडचण आहे. त्यातच नव्याने विकसित होणाऱ्या भागात मलवाहिकांचे जाळे नाही. त्यावर मार्ग काढण्यासाठी महापालिकेने नवीन मलवाहिकांचे जाळे निर्माण करण्यासाठी १२०.१७ कोटी तर जुन्या मलवाहिका बदलून अधिक क्षमतेच्या मलवाहिका टाकण्यासाठी १०७.०१ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प अहवाल शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला होता.

Tender Scam: वादग्रस्त अधिकाऱ्याकडेच 'आयुक्त'पदाची सूत्रं कशी काय?

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तांत्रिक मान्यतेनंतर राज्य शासनाच्या तांत्रिक समितीने व राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीने या दोन्ही प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखविला होता. यानंतर राज्य शासनाच्या नगरविकास विभागानेदेखील अंतिमतः या दोन्ही प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

या २२७.१८ कोटींच्या दोन मलनिस्सारण प्रकल्पांसाठी केंद्र शासनाच्या अमृत २ अभियानांतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून ५० टक्के अर्थात ११३.५८ कोटींचा निधी अनुदान स्वरूपात मिळणार आहे. उर्वरित ५० टक्के अर्थात ११३.५८ कोटींचा खर्च महापालिकेला स्वनिधीतून करावा लागणार आहे. या प्रकल्पामुळे गोदावरीसह उपनद्यांमधील सांडपाण्याचा प्रश्न बहुतांशी निकाली निघण्याची शक्यता आहे.

नवीन मलवाहिका टाकण्यासाठी १२०.१७ कोटींचा प्रकल्प राबवला जाणार आहे. यात नंदिनी नदी ते विठ्ठल नर्सरी ते कामटवाडा ते उंटवाडी सिव्हेज पंपिंग स्टेशन या दरम्यान ५.१२ किमी. लांबीची ८.३५ कोटींची नवीन मलवाहिका टाकली जाणार आहे.

Nashik: रिंगरोडसाठी सक्तीने भूसंपादन होणार?

याशिवाय किचन सम्राट ते वारकरी चौक दरम्यान ३.०२ कोटी, सराफ लॉन्स ते गुरू गोविंद सिंग कॉलेज ४.४१ कोटी, रोकडोबा हनुमानमंदिर ते नवीन गणेशवाडी ११.४४ कोटी, सारडा सर्कल ते रोकडोबा हनुमान मंदिर ३.९१ कोटी, होळकर पूल ते रोकडोबा हनुमान मंदिर १०.७७ कोटी, हुसेन चौक ते भद्रकाली पंपिंग ते बालाजी मंदिर, १०.०७ कोटी आदी कामे केली जाणार आहेत.

१०७.०१ कोटींच्या प्रकल्पांतर्गत ठिकठिकाणी जुन्या मलवाहिका बदलून अधिक क्षमतेच्या नवीन मलवाहिका टाकल्या जाणार आहेत. यात गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर तपोवन एसटीपी ते मानूर सिव्हेज पंपिंग स्टेशन ३.६९ कोटी, वरुणा नदीच्या उजव्या बाजूला धबधबा ते नवीन भाजीबाजार १.५४ कोटी, कपिला संगम ते पुरिया पार्क ११.९५ कोटी, भाभानगर ते नंदिनी नदी या दरम्यान ७.२८ कोटी, चांदशी पूल ते कुसुमाग्रज स्मारक ६.०३ कोटी, छत्रपती संभाजी महामार्ग ते रुद्रा फार्म या दरम्यान मलवाहिका टाकण्यासाठी २.०७ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama