Dailyhunt
Pimpri : पिंपरी-चिंचवडकरांना निगडीनंतर आता चाकणपर्यंत मिळणार दुसरा मार्ग

Pimpri : पिंपरी-चिंचवडकरांना निगडीनंतर आता चाकणपर्यंत मिळणार दुसरा मार्ग

PCMC

पिंपरी (Pimpri) : पिंपरी-चिंचवड शहराला दापोडी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गानंतर आता निगडी ते चाकण हा दुसरा मार्ग मिळणार आहे. महापालिकेच्या सूचनेनुसार महामेट्रोच्यावतीने सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) बनविण्याच्या कामास सुरूवात केली आहे.

आराखडा बनल्यानंतर लवकरच तो पिंपरी-चिंचवड महापालिकेस सादर केला जाईल. निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापासून चाकणपर्यंत हा मेट्रो मार्ग राहणार आहे. एकूण ४२ किमीपर्यंतचा हा मार्ग असणार आहे. त्यामुळे शहरातील केवळ २५ टक्केच भाग आता मेट्रोच्या 'कनेक्टिव्हिटी' शिवाय शिल्लक राहणार आहे.

Pune : हाय सिक्युरीटी नंबर प्लेटवरून वाहनचालक संतप्त, काय आहे कारण?

औद्योगिक शहर पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या तीस लाखांहून अधिक आहे. पिंपरी, चिंचवड, तळेगाव आणि चाकण हा औद्योगिक पट्टा असल्याने या भागांत दाट लोकवस्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासाठी नवीन मेट्रो मार्गाची गरज असल्याची मागणी शहरातील विविध संस्था आणि संघटनांकडून करण्यात आली. या मागणीचा विचार करत महापालिकेच्यावतीने मेट्रोच्या नव्या मार्गाबाबत मेट्रो प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महामेट्रोकडून आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या मार्गाद्वारे शहराचा दक्षिण भाग तसेच, भोसरीकडील भाग मेट्रोने जोडला जाणार आहे. वाकड आणि पिंपळे सौदागर हा उच्चभ्रू आणि आयटीचा परिसर मेट्रोशी कनेक्ट होणार आहे. या संपूर्ण मार्गामुळे निगडी ते दापोडी मार्गामुळे पिंपरी-चिंचवडचा ७५ टक्के भाग मेट्रोशी जोडला जाईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. आराखडा येत्या ४ ते ५ महिन्यांत तयार होण्याची शक्यता आहे. केंद्राने मान्यता दिल्यानंतर या नव्या मेट्रो मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल.

Mumbai : 'त्या' रुग्णालयाच्या कामातील विलंब, निकृष्ट दर्जा अधिकारी, कंत्राटदारांना भोवणार

निगडी, नाशिक फाटा येथे जंक्शन

या नव्या मार्गामुळे नाशिक फाटा येथे मेट्रोचे एक जंक्शन होणार आहे. या जंक्शनवरून भोसरी, चाकण, शहरातील दापोडी ते निगडी मार्ग व पुणे शहरात ये-जा करणे सुलभ होणार. निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प मेट्रो स्थानक येथे जंक्शन तयार होईल. तेथून रावेत, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, तसेच, भोसरी व चाकणला ये-जा करता येणार आहे. मेट्रोतून शहरातील बहुतांश भागांत प्रवास करता येईल.

असा असेल नवा मार्ग

निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक स्‍थानक, रावेत, मुकाई चौक, पुणे- मुंबई - बेंगळुरू महामार्ग, वाकड बायपास, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, भोसरी, मोशी, चाकण असा हा मार्ग आहे. या मार्गाचे अंदाजे ४२ किलोमीटर इतके अंतर आहे.

हे भाग मेट्रोला जोडणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सूचनेवरून महामेट्रोकडून निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापासून रावेत, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, भोसरी मार्गे चाकणपर्यंत मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. या नव्या मार्गामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा एक तृतीय अंश भागातून मेट्रो धावेल.

निगडी भक्ती-शक्ती चौक - रावेत मुकाई चौक - पिंपळे सौदागर - पिंपळे गुरव - नाशिक फाटा ते चाकण या नव्या मेट्रो मार्गाचा आराखडा बनविण्याचे काम सुरू झाले आहे. हा मार्ग एकूण ४२ किमी अंतराचा आहे. त्यामुळे शहरातील ७५ टक्के भाग हा मेट्रोशी जोडला जाणार आहे.

- डॉ. हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama