विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (88) यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना पुढील विशेष उपचारांसाठी मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
Anna Hazare
मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा हजारे यांच्यावर सुरुवातीला राळेगणसिद्धी परिसरातील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांना तीव्र विषाणूजन्य संसर्गासह शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याची समस्या निर्माण झाली. वाढते वय आणि उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची प्रकृती अधिक खालावल्याचे सांगण्यात येत आहे.
यानंतर स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अधिक विशेष वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना तातडीने मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अण्णा हजारे यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बॉम्बे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर डॉ. गौतम भन्साली यांच्या प्रमुख देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून त्यांच्या प्रकृतीचे बारकाईने निरीक्षण केले जात असून, विविध वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल आणि सध्याच्या शारीरिक स्थितीचा आढावा घेतला जात आहे.
वैद्यकीय अहवालांचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर पुढील उपचारांची दिशा निश्चित केली जाणार आहे. सध्या अण्णा हजारे यांना ICUमध्ये ठेवण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीवर चोवीस तास वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.
अण्णा हजारे यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून पुढील वैद्यकीय अपडेटची प्रतीक्षा आहे.

