विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raosaheb Danve विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत चेहरा कोण असेल, यावरून सुरू असलेल्या सस्पेन्सचा अखेर पडदा फासला आहे. स्वतः उद्धव ठाकरे या निवडणुकीत उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली.
महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे विधान परिषदेच्या रिंगणात उतरणार असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच हा निर्णय घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.Raosaheb Danve
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवार व्हावे, अशी भूमिका वारंवार मांडली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाऐवजी पक्षातील आक्रमक चेहरा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.Raosaheb Danve
उद्धव ठाकरे यांनी 2020 साली विधान परिषदेवर प्रवेश केला होता आणि त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोण जाणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू असताना, ठाकरेंनी अंबादास दानवेंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरेंनी त्यांची जागा शिवसैनिकाला दिली - अंबादास दानवे
विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. "उद्धव ठाकरे साहेबांचे मी आभार मानतो. पक्षाने शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मला जबाबदारी दिलेली आहे. उद्धव ठाकरेंनी सभागृहात यावे, अशी आमची सगळ्यांची भूमिका होती. परंतु, उद्धवजींनी एका सामान्य सैनिकाला त्यांची जागा सभागृहात दिली. उद्धव ठाकरेंनी सगळ्या नेत्यांशी चर्चा करून, मला उमदेवारी देण्याचा निर्णय घेतला असे वाटते. मी याआधीही सभागृहात होतो. आता एका गॅपनंतर पुन्हा सभागृहात येतोय," असे अंबादास दानवे म्हणालेत.
काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवारी नाकारल्यामुळे आता महाविकास आघाडीची रणनीती काय असेल?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभा निवडणुकीतवेळी ठाकरे गटाचे शरद पवारांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे विधान परिषदेला उद्धव ठाकरे जो कोणी उमेदवार देतील त्याला आमचा पाठिंबा राहील, असे आमच्याकडून सांगण्यात आले होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे आता काँग्रेसला उद्धव ठाकरेंचा निर्णय मान्य आहे का? काँग्रेसकडून कोणती भूमिका घेतली जाते? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
अंबादास दानवे दुसऱ्यांदा विधान परिषदेवर
दरम्यान, अंबादास दानवे यापूर्वी ऑगस्ट 2019 मध्ये विधान परिषद सदस्य म्हणून छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून निवडून आले होते. शिवसेनेतील फूटीनंतर ऑगस्ट 2022 मध्ये त्यांची विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. अंबादास दानवेंना आता दुसऱ्यांदा विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळणार आहे.
घोषणेनंतर संजय राऊतांची पोस्ट
दरम्यान, अंबादास दानवे यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणाले, अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील उद्या ११ वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली.
महायुतीचे किमान 8 उमेदवार निवडून येण्याची शक्यता
विधान परिषद निवडणुकीच्या गणिताकडे पाहिले, तर एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीचे पारडे जड दिसत आहे. भाजपकडे 131 आमदार, शिवसेना शिंदे गटाकडे 57, तर अजित पवार गटाकडे 40 आमदार आहेत. या बळावर महायुतीचे किमान 8 उमेदवार सहज निवडून येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 असल्याने त्यांचा फक्त एकच उमेदवार निश्चितपणे निवडून येऊ शकतो.

