बातम्या
राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रद्द केला डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' वादग्रस्त निर्णय

अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जो बायडेन ज्युनियर आणि अमेरिकेच्या ४९व्या उपाध्यक्ष म्हणून कमला हॅरिस यांनी बुधवारी शपथ घेतली. या शपथविधीनंतर काही तासांमध्येच बायडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक महत्वपूर्ण निर्णय रद्द केला. बायडेन यांनी पॅरिस हवामानबदलविषयक करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होणार असल्याची घोषणा केली.
वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बुधवारी अमेरिकेला पॅरिस हवामानबदलविषयक करारामध्ये पुन्हा सहभागी करुन घेण्यासाठी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराच्या माध्यमातून अमेरिका हवामानासंदर्भातील बदलांमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांना तोंड देणार आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन या करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
We’re back in the Paris Climate Agreement.
- President Biden (@POTUS) January 21, 2021
'अमेरिकेसाठी शिक्षा ठरणाऱ्या कराराचे समर्थन माझ्याकडून केले जाणार नाही, नागरिकांबद्दलची कर्तव्ये लक्षात घेऊन अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडत आहे.' असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडल्याने मोठा फटका बसणार असल्याचे तज्ज्ञांचे मत होते. अमेरिका बाहेर पडल्याने हरित वायू उत्सर्जन रोखण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांवर गंभीर परिणाम होतील. अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडल्यानंतरही इतर सर्व देश यासाठी आपला पाठिंबा कायम ठेवतील, अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्राच्या सचिवांनी व्यक्त केली होती. पॅरिस करारातून बाहेर पडण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर जगभरातून जोरदार टीका झाली होती.
The post राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रद्द केला डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ वादग्रस्त निर्णय appeared first on थोडक्यात घडामोडी.