मुंबई | काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे. संजय राऊत यांनी यासंदर्भात केलेलं ट्विट फारच बोलकं असून हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात 'भारत बचाव आंदोलना'चं आयोजन केलं होतं. यावेळी माफी मागायला मी काही राहुल सावरकर नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. संसदेत केलेल्या 'रेप इन इंडिया' या वक्तव्याप्रकरणी भाजपकडून माफी मागण्याची होत असलेली मागणी त्यांच्या या वक्तव्याच्या मुळाशी आहे.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे.
तडजोड नाही, या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा अर्थ आता वेगळ्या पद्धतीने घेतला जाऊ लागला आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेना सत्तेत विराजमान आहे. त्यामुळे सावरकर वादाचा मुद्दा वाढला तर ही आघाडीसुद्धा तुटू शकते, असं मानलं जातंय.

