अभिजित दिपके यांच्या कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून CJP च्या निधीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक व्यवहारांवर आता नवा वाद निर्माण झाला आहे.
सुरतचे आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजित दिपके यांचे वडील भगवान दिपके यांच्या मालमत्तेची आणि अभिजित यांच्या अमेरिकेतील शिक्षणासाठी झालेल्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करून सरकारला प्रभावित करणाऱ्या अभिजित दिपके यांच्या विरोधात सुरतचे आरटीआय कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी भगवान दिपके यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासोबतच, ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभा खासदार कपिल सिबल यांनी CJP च्या आंदोलकांसाठी जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांच्या कायदेशीर संरक्षण निधीचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोग, आयकर विभाग आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाकडे केली आहे. तिवारी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, CJP ही अधिकृतपणे नोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा संस्था नसल्याचा दावा केला जात असतानाही ती प्रत्यक्षात राजकीय संघटनेप्रमाणे कार्यरत आहे. त्यामुळे पक्षाच्या नावाने निधी गोळा करणे, आर्थिक व्यवहार करणे आणि सार्वजनिक देणग्या स्वीकारणे या संदर्भात कायदेशीर पडताळणी होणे गरजेचे आहे. तसेच, कपिल सिबल यांनी दिलेल्या १ कोटी रुपयांच्या योगदानावर जीएसटी किंवा इतर कर लागू होतात का, याबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागितले आहे. या आरोपांनंतर अभिजित दिपके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती (Scholarship) मिळाली असून उर्वरित खर्चासाठी त्यांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी कोणत्याही बेकायदेशीर किंवा अघोषित आर्थिक स्रोतांचा वापर झालेला नाही, असे दिपके यांनी स्पष्ट केले. अभिजित दिपके हे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून त्यांनी डिजिटल मीडिया स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांनी पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून सध्या अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्स विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांचा उल्लेख "कॉकरोच" केल्यानंतर दिपके यांनी सोशल मीडियावर सुरू केलेल्या मोहिमेला मोठी पसंती मिळाली. या डिजिटल मोहिमेचे पुढे कॉकरोच जनता पार्टी (CJP) या दबावगटात रूपांतर झाले. त्यानंतर नीट (NEET) पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील दोष आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर देशभर आंदोलने उभी राहिली. या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आणि अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
या आंदोलनात अभिजित दिपके यांच्यासोबत पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. दिल्लीतील जंतर-मंतरपासून विविध राज्यांपर्यंत झालेल्या आंदोलनांनी देशभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले आणि CJP हे सोशल मीडियावरील उपरोधिक अभियानापासून एका प्रभावी युवक चळवळीत बदलले.
२७ जुलै रोजी CJP ने जाहीर केले की, पेपरफुटी आंदोलनानंतर विविध राज्यांमध्ये आंदोलक विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवर होणाऱ्या फौजदारी गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी कायदेशीर संरक्षण निधी उभारला जाणार आहे. या निधीसाठी ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी १ कोटी रुपयांचे योगदान जाहीर केले असून देशभरातील वकिलांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सिबल यांनी सांगितले की, देशातील कोणत्याही राज्यात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्यास त्यांना मोफत कायदेशीर मदत मिळेल, त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा असेल. तसेच ज्यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाले आहेत, त्यांची माहिती एका विशेष वेबसाइटवर दिली जाईल, ज्याद्वारे स्वयंसेवी वकील विद्यार्थ्यांशी जोडले जातील.
दरम्यान, अमित तिवारी यांच्या मागण्यांवर CJP ने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाच्या प्रवक्ते वैष्णवी गौर यांनी तिवारी यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, "जर पारदर्शकतेचाच विषय असेल, तर PM CARES निधीचीही चौकशी करा." या प्रकरणामुळे CJP च्या आर्थिक पारदर्शकतेवर आणि त्यांच्या कायदेशीर दर्जावर चर्चा सुरू झाली आहे. सध्या निवडणूक आयोग किंवा कर विभागाने यावर अधिकृत भूमिका घेतलेली नाही. मात्र, चौकशीची मागणी मान्य झाल्यास CJP च्या आर्थिक व्यवहारांबाबत आणि त्यांच्या नोंदणीबाबत अधिक स्पष्टता येईल. दुसरीकडे, दिपके यांनी सर्व आरोप फेटाळत आपले शिक्षण शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाद्वारे पूर्ण होत असल्याचा दावा कायम ठेवला आहे.
मोठी बातमी! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुणे शहरासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट
अभिजित दिपके यांच्या कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून CJP च्या निधीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक व्यवहारांवर आता नवा वाद निर्माण झाला आहे. सुरतचे आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजित दिपके यांचे वडील भगवान दिपके यांच्या मालमत्तेची आणि अभिजित यांच्या अमेरिकेतील शिक्षणासाठी झालेल्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

