Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ankit Balian : हत्येच्या दोन तास आधी गाणं पोस्ट, त्यानंतर गोळीबार; अंकित बलियान प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

Ankit Balian : हत्येच्या दोन तास आधी गाणं पोस्ट, त्यानंतर गोळीबार; अंकित बलियान प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

रयाणवी गायक आणि युट्यूबर अंकित बलियानची शामलीमध्ये जिमबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हल्लेखोर दोन दिवसांपासून त्याचा पाठलाग करत असल्याचं समोर आलं आहे.

धमकीच्या पार्श्वभूमीवर या हत्येमागे नेमकं कोण आहे, याचा तपास सुरू आहे.

उत्तर प्रदेशातील शामलीमध्ये हरयाणवी गायक आणि युट्यूबर अंकित बलियानच्या हत्येने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही हत्या अचानक झालेली नसून पूर्वनियोजित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हल्लेखोरांनी अंकितच्या हालचालींवर आधीपासून नजर ठेवली होती आणि योग्य संधी साधून त्याच्यावर गोळीबार केल्याचा संशय आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अंकितचा घटनेच्या सुमारे दोन दिवस आधीपासून मागोवा घेत होते. बुधवारी त्याच्या घरापासून ते जिमपर्यंतच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं. अंकित जिममधून बाहेर येताच हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले. अंकितच्या दैनंदिन वेळापत्रकाची हल्लेखोरांना अचूक माहिती असल्याने त्यांना ही माहिती नेमकी कुणाकडून मिळाली, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवली आहेत. जिम परिसर आणि आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, संशयास्पद वाहनं आणि व्यक्तींची माहिती गोळा केली जात आहे. हल्लेखोर कुठे थांबले होते, कोणाच्या संपर्कात होते आणि हत्येनंतर कोणत्या दिशेने पळाले, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथकं काम करत आहेत. या प्रकरणात अंकितच्या कुटुंबीयांनीही काही गंभीर संशय व्यक्त केला आहे.

अंकितचे काका चिकू यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अंकितसोबत काम करणाऱ्या राणा नावाच्या व्यक्तीकडून त्याला यापूर्वी धमकी मिळाल्याचं कुटुंबाला माहीत होतं. त्यामुळे या धमकीचा हत्येशी काही संबंध आहे का, याचा तपास करण्याची मागणी कुटुंबीयांकडून केली जात आहे. मात्र, या व्यक्तीचा हत्येत सहभाग असल्याचे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हल्लेखोरांचं वय साधारण २१ ते २६ वर्षांच्या दरम्यान असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील काही संशयित तरुणांची माहितीही तपासली जात आहे. अंकितच्या ठिकाणाची माहिती आरोपींपर्यंत कशी पोहोचली, याचा शोध लागल्यास या हत्येमागचं नेमकं कारण आणि कटाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हत्येच्या काही तास आधी अंकितने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळेही चर्चा रंगली आहे. हत्येच्या सुमारे दोन तास आधी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एका गाण्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या गाण्यांमुळे हिंसक आशय असल्याने आता या पोस्टकडेही तपासाच्या दृष्टीने पाहिलं जात आहे. मात्र, या पोस्टचा हत्येशी थेट संबंध असल्याचं अद्याप समोर आलेलं नाही. अंकित बलियान हा शामली जिल्ह्यातील बंटीखेडा गावचा रहिवासी होता. मागील काही वर्षांपासून तो रोहतक आणि सोनीपत येथे गायन आणि अभिनयाचं प्रशिक्षण घेत होता. 'भरी कोर्ट में गोली मारेंगे मेरी जान' या गाण्यामुळे त्याला विशेष ओळख मिळाली होती. २०२३ मध्ये शामलीमधील एका रोड शोमुळेही तो चर्चेत आला होता. आता अंकितच्या हत्येमागचा खरा हेतू काय होता, त्याला धमकी देणाऱ्या व्यक्तीचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का आणि हल्लेखोरांना त्याच्या हालचालींची अचूक माहिती कोणी दिली, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि संशयितांच्या चौकशीतून या पूर्वनियोजित हत्येचा संपूर्ण उलगडा होण्याची शक्यता आहे.

Shravan 2026: श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये? जाणून घ्या सविस्तर

Shravan Puja 2026: श्रावण महिन्यातले व्रत कसे पाळावे? जाणून घ्या सविस्तर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra