बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. दरम्यान, राहुरीत अक्षय कर्डिले आघाडीवर असून, मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत त्यांची पकड मजबूत होताना दिसत आहे.
सोमवारची सकाळ उजाडताच देशभरात राजकीय हालचालींना वेग आला असून, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये सत्तांतर होणार की विद्यमान सरकार टिकणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. प्रत्येक राज्यात वेगवेगळे राजकीय समीकरणं तयार झाली असून, या निकालांचा राष्ट्रीय राजकारणावरही मोठा प्रभाव पडणार आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या पोटनिवडणुकांकडेही महाराष्ट्राचं विशेष लक्ष लागलं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघ हा राज्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यांच्या अचानक जाण्यामुळे राज्यभरात शोककळा पसरली होती आणि बारामतीत भावनिक वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेत उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आणि बारामती पोटनिवडणुकीत उमेदवारीही दिली. महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न करण्यात आला होता. अनेक मोठ्या विरोधी पक्षांनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही अपक्ष उमेदवारांनी मैदानात उतरून लढत दिली. २३ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणी सुरू झाली असून, सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच सुनेत्रा पवार यांनी मोठी आघाडी घेतली आहे. सध्या त्या तब्बल ३६ हजारांहून अधिक मतांनी पुढे असून, त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. आता त्या किती मोठ्या फरकाने विजय मिळवतात, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

