Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
CJP चं दिल्लीत आंदोलन! जे. पी नड्डांसोबत बैठकीत चर्चा, नड्डांकडे दिलं मागण्यांचं पत्र

CJP चं दिल्लीत आंदोलन! जे. पी नड्डांसोबत बैठकीत चर्चा, नड्डांकडे दिलं मागण्यांचं पत्र

दिल्लीमध्ये CJPच्या नेतृत्वाखालील सुरू असलेल्या आंदोलनाने वेगळं वळण घेतलं आहे. सोनम वांगचुक यांच्या सुटकेसह NEET पेपरफुटी प्रकरणावर कारवाई आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.

दरम्यान, CJP शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

दिल्लीमध्ये सध्या कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन सुरू आहे. शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटीचे प्रकार थांबवणे आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुटकेच्या मागणीसाठी सीजेपीने संसद मार्चची घोषणा केली होती. या आवाहनानंतर देशभरातून आंदोलक दिल्लीमध्ये दाखल झाले असून, हजारो आंदोलकांनी संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

दिल्लीतील काही भागांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले असून, काही ठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच सीजेपीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. सीजेपीचे प्रतिनिधी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी नड्डा यांच्यासोबत चर्चा केली. ही बैठक जवळपास दहा मिनिटे चालली. बैठकीनंतर सौरभ दास यांनी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, तब्बल दोन महिन्यांच्या प्रयत्नानंतर ही भेट झाली. मात्र, चर्चा केवळ दहा मिनिटांचीच झाली. या बैठकीत सीजेपीच्या शिष्टमंडळाने आपल्या प्रमुख मागण्यांचे निवेदन जे. पी. नड्डा यांच्याकडे सादर केले.

सरकारकडून या मागण्यांवर अंतर्गत चर्चा केली जाईल, असे आश्वासन नड्डा यांनी दिल्याचे सौरभ दास यांनी सांगितले. सीजेपीच्या प्रमुख मागण्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची तातडीने सुटका करावी, नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, यांचा समावेश आहे. दुसरीकडे, आंदोलकांनी कोणत्याही परिस्थितीत संसदेकडे मोर्चा नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे आता सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेणार आणि आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Aamir Khan : सलमान खाननंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर? सोशल मीडियावर खळबळ

Uddhav Thackeray : पेपरफुटीवरून उद्धव ठाकरेंनी सरकारला सुनावलं, अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला दिला पाठिंबा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra