महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये रस्त्यांवर पाणी साचले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार आगमन केले असून, राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरात दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले, वाहतूक मंदावली आणि रेल्वे सेवेलाही फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून, नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्याची पावसाची परिस्थिती अपेक्षेपेक्षा अधिक गंभीर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, येत्या काही दिवसांतही पावसाचा जोर कायम राहू शकतो, अशी माहिती त्यांनी दिली. प्रशासनाकडून नियमितपणे परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, आवश्यक त्या ठिकाणी वेळोवेळी अलर्ट जारी केले जात आहेत. मुंबई आणि ठाण्यासह काही भागांतील शाळांना खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने नागरिकांनी शक्य असल्यास अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना हवामान विभाग आणि प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या प्रत्येक सूचनेचे पालन करण्याचे आवाहन केले. जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणतीही अफवा न पसरवता अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई-पुणे मार्गावरील कनेक्टिंग लिंकवर आढळलेल्या खड्ड्यांवरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, संपूर्ण प्रकल्पात समस्या नसून केवळ काही ठिकाणी तांत्रिक बाबी आढळल्या आहेत. अशा त्रुटी वेळेत दुरुस्त केल्या जातील आणि संबंधित यंत्रणा त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे राज्यावर पावसाचे संकट गडद होत असताना, दुसरीकडे प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी युद्धपातळीवर काम करत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हवामानाच्या प्रत्येक अपडेटकडे लक्ष ठेवणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे, हेच नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे.
Sachin Ahir : ठाकरेंना धक्का, सचिन अहिरांनी शिवसेनेकडून भरला उपसभापतीपदाचा अर्ज
हिंजवडीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी PMRDAचा मोठा निर्णय; ४ जोडरस्ते नव्याने होणार

