अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'हैवान'चा बहुप्रतीक्षित टीझर रिलीज झाला आहे. रहस्य, थरार आणि धोकादायक वातावरणाने भरलेल्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली असून, 'हिरो कोण आणि हैवान कोण?' हा सवाल कायम आहे.
पहिल्या लूक पोस्टर्सनंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या 'हैवान' चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर अखेर समोर आला आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या या चित्रपटात अक्षय कुमार आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. टीझर रिलीज होताच चित्रपटाच्या गूढ आणि रहस्यमय कथानकाची चर्चा सुरू झाली आहे. 'हैवान'च्या टीझरमध्ये सुरुवातीपासूनच एक गडद आणि तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळतं. अंधार, रहस्यमय सावल्या आणि काही वेगवान दृश्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना एका अनोख्या जगाची झलक दाखवण्यात आली आहे. मात्र, चित्रपटाची कथा नेमकी काय आहे? याबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणताही मोठा खुलासा केलेला नाही.
टीझर पाहिल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, या कथेत खरा हिरो कोण आणि हैवान कोण? अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांची पात्रं नेमकी कोणत्या भूमिकेत आहेत, हे अद्याप गूढ ठेवण्यात आलं आहे. दोन्ही कलाकार एका धोकादायक परिस्थितीत आमनेसामने येताना दिसत असल्यामुळे त्यांच्या संघर्षाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्यासोबत बोमन इराणी, सैयामी खेर आणि श्रिया पिळगावकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे दमदार कलाकारांची टीम आणि प्रियदर्शन यांची दिग्दर्शनाची शैली यामुळे 'हैवान'कडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.
टीझरने कथेबाबत अनेक प्रश्न निर्माण केले असले तरी त्यांची उत्तरं मिळण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ट्रेलरमध्ये या रहस्यमय दुनियेबद्दल आणखी काही संकेत मिळण्याची शक्यता आहे. KVN Productions आणि Thespian Films यांच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. वेंकट के. नारायण आणि शैलजा देसाई फेन हे निर्माते आहेत. प्रियदर्शन दिग्दर्शित 'हैवान' हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्यामुळे टीझरनंतर आता 'हैवान' प्रेक्षकांच्या अपेक्षांवर किती खरा उतरतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Manoj Jarange Patil : 'मी एकटा पडावा म्हणून सरकारचा कट', मनोज जरांगे पाटील यांचे सरकारवर आरोप
'संप मागे घ्या आणि कामावर रुजू व्हा', डॉक्टरांच्या संपावर मुंबई हायकोर्टाचे कडक आदेश

