पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरातील सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आता दूर होणार आहे. PMRDAने हिंजवडी, माण, मारुंजी आणि वाकड भागातील चार महत्त्वाच्या जोड रस्त्यांच्या विकासाला गती दिली आहे.
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात सातत्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी आता काही प्रमाणात सोडवण्याच्या उद्देशाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मोठा निर्णय घेतला आहे. या भागातील चार प्रमुख जोड रस्त्यांच्या कामांना गती दिली जाणार असून, त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होईल आणि नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल. पीएमआरडीएच्या नव्या योजनेनुसार हिंजवडी, माण, मारुंजी आणि वाकड परिसरातील मुख्य मार्गांना जोडणारे रस्ते विकसित करण्याचे काम हाती घेतले गेले आहे.
यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भूसंपादनाचे प्रस्ताव सादर केले गेले असून, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांच्या बांधकामाला सुरुवात होईल, असे मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी यांनी सांगितले. या प्रकल्पांत महत्त्वाच्या चार जोड रस्त्यांचा समावेश आहे. पहिला प्रकल्प महाळुंगे ते हिंजवडी फेज एक रस्ता रुंदीकरण आणि विकासाचा आहे. सध्याची रस्ता रुंदी ७ मीटर आहे, जी २४ मीटरपर्यंत वाढवली जाणार आहे, तर रस्त्याची लांबी २.२ किलोमीटरपर्यंत विकसित केली जाईल. दुसरा जोड रस्ता सूर्या रुग्णालय ठाकर वस्ती ते माण गावठाणला जोडेल. हा रस्ता २४ मीटर रुंद असून, ३.७४ किलोमीटर लांबीचा असेल. या रस्त्यामुळे हिंजवडी आणि आसपासच्या निवासी भागांदरम्यान प्रवास करणाऱ्यांना महत्त्वाचा पर्यायी मार्ग मिळेल.
तिसरा जोड रस्ता मारुंजी ते शनि मंदिर (वाकड) दरम्यान विकसित केला जाणार आहे. हा रस्ता देखील २४ मीटर रुंद असून, ३.२५ किलोमीटर लांबीचा असेल. चौथा जोड रस्ता नांदे ते माण परिसराला जोडेल. या रस्त्याची रुंदी ३६ मीटर असून, १.५ किलोमीटर अंतरापर्यंत विकास करण्यात येणार आहे. या सर्व रस्त्यांच्या विकासामुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सुव्यवस्थित होईल आणि परिसरातील रहिवाशांना व कर्मचारी वर्गाला प्रवासात मोठा आराम मिळेल.

