राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील त्यांच्या दरेगाव येथील निवासस्थानी आले असताना आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी देशभर गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली.
यावेळी त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भूमिका, उद्धव ठाकरे यांची टीका आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या राजकारणावर जोरदार निशाणा साधला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, नीट परीक्षा पेपरफुटी ही लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता स्वाभाविक आहे. विद्यार्थ्यांचा आक्रोश योग्य असला तरी काही राजकीय पक्ष या आंदोलनाचा वापर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी करत आहेत, ही बाब अधिक गंभीर असल्याची टीका त्यांनी केली. ते म्हणाले, एनडीएच्या बैठकीतही या विषयावर सविस्तर चर्चा झाली असून विद्यार्थ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये, अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. या गैरप्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. "पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाही दोषीला सोडणार नाहीत. सर्व संबंधितांवर कठोर कारवाई होईल," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या दहा-बारा वर्षांत नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेत मोठी क्रांती घडवून आणली असून युवकांना शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचे काम केंद्र सरकार सातत्याने करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारताचा युवा हा देशाची सर्वात मोठी ताकद असून त्याला सक्षम करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचे शिंदे म्हणाले.
दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनावर बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर थेट टीका केली. पंतप्रधानांच्या अतिसंवेदनशील निवासस्थानासमोर आंदोलनासाठी लोकांना आवाहन करणे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे असल्याचे त्यांनी म्हटले. देशाने यापूर्वी दोन पंतप्रधान गमावले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांचे निवासस्थान हे देशातील सर्वाधिक सुरक्षा असलेले ठिकाण आहे. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जमवून आंदोलन करण्यामागचा उद्देश काय होता? पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर नेमके काय घडवून आणायचे होते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राहुल गांधी यांनी नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेतील आंदोलनांची उदाहरणे देत भारतातही तसेच वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे का, अशी शंका उपस्थित करत देशात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. यावेळी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. "उद्धव ठाकरे यांना दुसरे काहीच काम उरलेले नाही. मुख्यमंत्री असताना ते अवघ्या दोन वेळाच मंत्रालयात गेले. आता मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जाऊन त्यांना भडकवण्याचे काम करत आहेत," असा टोला त्यांनी लगावला.
जनतेने ज्यांना नाकारले, तेच आता विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन सरकारविरोधी वातावरण निर्माण करत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर उपाय सुचवण्याऐवजी "सरकार बदलले पाहिजे" अशा घोषणा देत २०२९ च्या राजकारणाची तयारी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. विरोधकांना सभागृहात या विषयावर विधायक चर्चा करायची नाही. त्याऐवजी आंदोलनाच्या माध्यमातून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित विषयांवर राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले.
देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळावा, परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, हीच केंद्र सरकारची भूमिका असल्याचा पुनरुच्चार करत, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगाव येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
CJP चं दिल्लीत आंदोलन! जे. पी नड्डांसोबत बैठकीत चर्चा, नड्डांकडे दिलं मागण्यांचं पत्रतुमची FD आहे का? मग ITR भरताना 'ही' चूक अजिबात करू नका, ITR चे नियम नक्की वाचा
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील त्यांच्या दरेगाव येथील निवासस्थानी आले असताना आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी देशभर गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भूमिका, उद्धव ठाकरे यांची टीका आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या राजकारणावर जोरदार निशाणा साधला.

