Dailyhunt
कर्जमाफीचा निर्णय फसवा; शशिकांत शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल

कर्जमाफीचा निर्णय फसवा; शशिकांत शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार आहे. अजित दादांच्या निधनानंतर आमच्या पक्षाने त्या ठिकाणी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणी काँग्रेस उमेदवार देणार असल्याचे समजते आहे.

याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करणार असून, या दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या असल्याने चर्चा करून निर्णय घेऊ. राज्यसभेच्या वेळीही अनेक जण इच्छुक असतात, तेव्हा आम्ही चर्चा करून मार्ग काढतो. यावेळीही चर्चा करून मार्ग काढू, असे शशिकांत शिंदे यांनी बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीबद्दल बोलताना सांगितले.

पुढे राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाबद्दल बोलताना ते म्हणाले, 'अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. आकस्मिक निधी व मदत-पुनर्वसन निधीमध्ये तरतूद कमी करण्यात आली आहे. या सरकारच्या धोरणाला आम्ही विधिमंडळात आक्षेप घेतला होता. दुर्दैवाने शासनाकडून अनेक बाबी लपवल्या जात आहेत. केंद्र सरकारकडून मिळणारी २५ हजार कोटी रुपयांची मदत मिळाली नाही. तरीही राज्य सरकार मदत दिल्याचे सांगत आहे.विमा कंपन्यांवर आमचा आक्षेप असून, वेळेवर पंचनामे होत नाहीत. केंद्रीय पथकही सर्व काही संपल्यानंतर येते, ही दुर्दैवी बाब आहे. तात्काळ मदत जाहीर करणे गरजेचे आहे; पंचनामे नंतर करा. कर्जमाफीचा निर्णय फसवा आहे. निवडणुकीत मते घेतली जातात आणि नंतर सौरऊर्जा व इतर अटी लादल्या जातात. ज्याच्याकडे घर आणि गाडी आहे त्याला कर्जमाफी मिळणार नाही, अशी माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा एल्गार पाहायला मिळेल.' असा इशारा त्यांनी दिला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra