Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोठी बातमी! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुणे शहरासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

मोठी बातमी! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुणे शहरासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

हाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असून पुणे, सातारा आणि धुळे जिल्ह्यांसह अनेक भागांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाट भागात दरडीचा धोका असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली असून, काही भागांमध्ये अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पूर्व विदर्भात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्याने राज्यातील पावसाची तीव्रता वाढली आहे. पुढील २४ तास राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील भागांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तर पुणे शहरासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातील हवामान तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
घाट परिसरात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, विशेषतः डोंगराळ आणि घाट भागात जाताना काळजी घ्यावी, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, धुळे जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहर आणि ग्रामीण भागातील अनेक सखल परिसरात पाणी साचले आहे. जनजीवनावर याचा परिणाम झाला असून, प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. हवामान विभागाने धुळे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी पावसाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सततच्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील काही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. शिरपूर तालुक्यातील अनेर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, अक्कलपाडा धरणातूनही पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने नागरिकांना नदी-नाले, पूरग्रस्त भाग आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारनंतर राज्यातील पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या नागरिकांनी सतर्क राहणे आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

मुंबईतील तिरंगा रॅलीत उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल, तर राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या लढ्याचे केले कौतुक

विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठं यश! मुंबईत आज ठाकरे बंधूंचा तिरंगा मोर्चा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra