Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबईतील घटनेनंतर ठाणे महापालिका अलर्ट! २ लाख मॅनहोलच्या तपासणीला सुरुवात

मुंबईतील घटनेनंतर ठाणे महापालिका अलर्ट! २ लाख मॅनहोलच्या तपासणीला सुरुवात

मुंबईतील साकीनाका मॅनहोल दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका सतर्क झाली आहे. शहरातील २ लाखांहून अधिक मॅनहोलची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण राज्यातील महापालिका प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उघडे किंवा धोकादायक मॅनहोल नागरिकांसाठी मोठा धोका ठरू शकतात, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. या घटनेनंतर ठाणे महापालिकेनेही तातडीने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. साकीनाका परिसरात मॅनहोलवर संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू असताना एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण प्रशासन हादरले असून, संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

निष्काळजीपणाबाबत जबाबदारी निश्चित करत संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले असून, पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने शहरातील सर्व मॅनहोलची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी संरक्षणासाठी जाळ्या नाहीत, झाकण खराब आहे किंवा तातडीच्या दुरुस्तीची गरज आहे, अशा सर्व ठिकाणांचा स्वतंत्र अहवाल तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात ड्रेनेज आणि गटारांशी संबंधित दोन लाखांहून अधिक मॅनहोल असल्याने ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. प्रत्येक प्रभागातील अभियंते आणि संबंधित अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून धोकादायक ठिकाणांची माहिती गोळा करत आहेत.

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती आणि संरक्षक उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे मॅनहोल दिसणे कठीण होते आणि अशा वेळी अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली असून, नागरिकांनाही पावसाच्या काळात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईतील या दुर्दैवी घटनेनंतर ठाणे महापालिका अलर्ट मोडवर आली असून, शहरातील मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

SC Subcategorisation | राज्याच्या राजकारणात मोठा बदल? जाणून घ्या उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय

Sachin Ahir lettet to Uddhav Thackeray: उपसभापतीपदाचा अर्ज भरताच सचिन अहिर यांचे उद्धव ठाकरेंना पत्र

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra