मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत आणखी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या निवडणुकीतील उमेदवार निलम शिर्के यांनी या निवडणुकीतून माघार घेतली असून त्यांनी वर्षा उसगावकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
निलम शिर्केंच्या उमेदवारीवरून का झाला वाद?
मराठी अभिनेते विजय पाटकर यांनी राजकीय दबावामुळे आपल्याला या निवडणुकीचा उमेदवारी अर्जच भरू दिला गेला नाही, असा आरोप केला होता. विजय पाटकर यांच्या आरोपानंतर कलाक्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या या निवडणुकीत ६० अर्ज दाखल करण्यात आले असून, यातील १७ जणांची संचालक मंडळावर निवड होणार होती.
या निवडणुकीसाठी अभिनेते विजय पाटकर यांनीदेखील अर्ज भरून तो कोल्हापूरला पाठवला होता. मात्र काही राजकीय लोकांनी त्यांच्यावर दबाव टाकला व अर्ज प्रक्रियेतून रोखलं, असा आरोप त्यांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणात एका मंत्र्याचा राजकीय दबाव असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला होता. "एका मंत्र्याचा OSD काही दिवसांपासून कोल्हापुरात तळ ठोकून बसला असून निवडणूक प्रक्रियेत दबावतंत्राचा वापर करत आहे," असे विजय पाटकर म्हणाले.
त्यामुळे या महामंडळाच्या निवडणुकीत थेट राजकीय हस्तक्षेप होतोय का, हा गंभीर प्रश्न सध्या निर्माण होत आहे. या निवडणुकीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी निलम शिर्के यादेखील निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यामुळे त्यांच्यासाठीच तर निवडणुकीची वाट मोकळी करण्यात येत नाही ना, असा आरोप त्यांच्यावर होत होता.

