मुंबईकरांच्या कराच्या पैशाचा वापर नेमका कुठे होतोय? सामान्य नागरिक खड्डे, पावसाचे पाणी, तुंबलेली गटारे आणि अपुऱ्या सुविधांशी झुंज देत असताना, भायखळ्यातील महापौरांच्या अधिकृत निवासस्थानाच्या खर्चावरून पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे.
कारण, या बंगल्यावर आधीच कोट्यवधी रुपये खर्च झाल्यानंतर आता पुन्हा जवळपास २ कोटी ८९ लाख रुपयांची नवीन निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे हा खर्च नेमका कोणासाठी आणि कोणत्या कामांसाठी केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापौर राहण्यापूर्वी या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे ७५ लाख रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर एप्रिल २०२६ मध्ये बंगल्याच्या नूतनीकरणासाठी सुमारे ३ कोटी ४० लाख रुपयांची कामे मंजूर झाली. या कामांमध्ये संपूर्ण इंटिरिअरचे नूतनीकरण, आधुनिक स्वच्छतागृहे, अतिरिक्त बेडरूम, नवीन टॉयलेट, आधुनिक किचन, ग्राउंड फ्लोअरवर इटालियन मार्बल फ्लोअरिंग, अँटिक झुंबर आणि ऑडिटोरियमचे मीटिंग रूममध्ये रूपांतर अशा अनेक सुविधा उभारण्यात आल्या.
इतक्यावरच हा खर्च थांबला नाही. आता पुन्हा बाह्य परिसरातील विविध सुविधांसाठी २ कोटी ८९ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. या प्रस्तावित कामांमध्ये नॉईज बॅरिअर, सांडपाणी आणि पर्जन्यजल वाहिन्या, इंटरलॉकिंग काँक्रीट पेव्हर्स, भूमिगत सेवा वाहिन्या तसेच भूमिगत आणि उंचावरील पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम यांचा समावेश आहे. म्हणजेच आतापर्यंतचा आणि प्रस्तावित खर्च मिळून हा आकडा सुमारे ७ कोटी १४ लाख रुपयांपर्यंत पोहोचतो. मात्र, या सर्व प्रकरणात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे पालिकेचे स्पष्टीकरण. बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, ही निविदा महापौरांच्या निवासस्थानासाठी नसून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय परिसरातील विकासकामांसाठी आहे. महापौरांनी या कामांची मागणी केलेली नाही आणि या निविदेशी त्यांचा काहीही संबंध नाही, असेही पालिकेने म्हटले आहे.
पण यानंतरच नवा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण संबंधित निविदेच्या शीर्षकात "Upgradation of premises of Heritage Bungalow situated in VJBB Udyan & Zoo" असा स्पष्ट उल्लेख असल्याचे समोर आले आहे. तसेच सुरक्षा कक्ष, सेवक निवास, कॉन्फरन्स हॉल, पाण्याच्या टाक्या, नॉईज बॅरिअर आणि परिसराशी संबंधित विविध कामांचाही उल्लेख निविदेत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ही कामे नेमकी हेरिटेज बंगल्यासाठी आहेत की संपूर्ण प्राणिसंग्रहालय परिसरासाठी, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याच ठिकाणी सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. जर ही कामे महापौर बंगल्याशी संबंधित नसतील, तर निविदेच्या शीर्षकात हेरिटेज बंगल्याचा उल्लेख का आहे? आणि जर कामांचा काही भाग त्या परिसराशी संबंधित असेल, तर त्यातील प्रत्येक कामाचा खर्च स्वतंत्रपणे जाहीर का केला जात नाही?
पालिकेचे म्हणणे एकीकडे आहे, तर निविदेतील माहिती दुसरीकडे वेगळे संकेत देत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात पूर्ण पारदर्शकता आवश्यक असल्याची मागणी होत आहे. कोणत्या कामासाठी किती खर्च होणार? कोणत्या विभागाने तो मंजूर केला? कोणत्या जागेवर ही कामे होणार? आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ कोणाला होणार? या सर्व प्रश्नांची स्पष्ट, अधिकृत आणि तपशीलवार उत्तरे सार्वजनिक करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. या प्रकरणात अंतिम निष्कर्ष काढण्यापूर्वी संबंधित निविदेतील प्रत्येक कामाचा अधिकृत तपशील, त्याची व्याप्ती आणि खर्च याबाबत संपूर्ण माहिती समोर येणे महत्त्वाचे आहे. तोपर्यंत हा वाद कायम राहण्याची शक्यता आहे.
Weather Update : महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, IMD चा अलर्टPF काढणे झाले सोपे! EPFO च्या नव्या नियमांचा कर्मचाऱ्यांना मोठा फायदा
मुंबईकरांच्या कराच्या पैशाचा वापर नेमका कुठे होतोय? सामान्य नागरिक खड्डे, पावसाचे पाणी, तुंबलेली गटारे आणि अपुऱ्या सुविधांशी झुंज देत असताना, भायखळ्यातील महापौरांच्या अधिकृत निवासस्थानाच्या खर्चावरून पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण, या बंगल्यावर आधीच कोट्यवधी रुपये खर्च झाल्यानंतर आता पुन्हा जवळपास २ कोटी ८९ लाख रुपयांची नवीन निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे हा खर्च नेमका कोणासाठी आणि कोणत्या कामांसाठी केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

