Dailyhunt
Ritu Tawde : सत्र न्यायालयाकडून रितू तावडेंना पासपोर्ट नूतनीकरणास परवानगी

Ritu Tawde : सत्र न्यायालयाकडून रितू तावडेंना पासपोर्ट नूतनीकरणास परवानगी

रितू तावडे यांच्यावर सुमारे नऊ वर्षांपूर्वी सांताक्रूझमधील महानगरपालिकेच्या उर्दू शाळेत शिक्षकांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अलीकडे मुंबई सत्र कोर्टाने त्यांना या खटल्यातून आरोपमुक्त करण्यास नकार दिला, त्यामुळे प्रकरण अद्याप सुरू आहे.

दरम्यान, न्यायालयाने त्यांना पासपोर्ट नूतनीकरणाची परवानगी दिली आहे. मात्र, न्यायालयाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय परदेशात प्रवास करता येणार नाही, अशी अटही घालण्यात आली आहे.

रितू तावडे यांच्याशी संबंधित सुमारे नऊ वर्षांपूर्वीचे एक प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सांताक्रूझमधील महानगरपालिकेच्या उर्दू माध्यमिक शाळेत एका कर्करोगग्रस्त शिक्षिकेची अचानक बदली करण्यात आल्यामुळे स्थानिक पातळीवर नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर रितू तावडे या आपल्या सहकाऱ्यांसह शाळेत गेल्या होत्या. सुरुवातीला तावडे निषेध नोंदवण्यासाठी आणि प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी गेल्या, मात्र परिस्थिती तणावपूर्ण झाली. शाळेतील व्यवस्थापन आणि रितू तावडे यांच्या गटामध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हिंसाचारात झाले, असा आरोप आहे.

तक्रारीनुसार, काही शाळेतील काही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली आणि दोन शिक्षकांना मारहाणही करण्यात आली. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाने वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार तावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणात तावडे यांनी सुरुवातीपासूनच आरोप फेटाळले आहेत. रितू तावडे यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून स्वतःला या खटल्यातून मुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र, मुंबई सत्र कोर्टाने अलीकडेच त्यांचा आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला. न्यायालयाने प्राथमिकदृष्ट्या आरोप गंभीर असल्याचे मान्य केले आणि सुनावणी पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असून, तावडे यांना पुढील कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पासपोर्ट नूतनीकरण. तावडे यांचा पासपोर्ट मे २०२५ मध्ये कालबाह्य झाला होता. त्यांनी पासपोर्ट नूतनीकरणासाठी न्यायालयाची परवानगी मागितली. यावर सुनावणी करताना न्यायालयाने असे नमूद केले की, पासपोर्ट नूतनीकरण केल्याने खटल्याच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर केला. तथापि, न्यायालयाने या परवानगीसोबत एक महत्त्वाची अट घातली आहे. तावडे यांना न्यायालयाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय देशाबाहेर प्रवास करता येणार नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra