सलमान खानच्या 'मातृभूमी' या आगामी चित्रपटातील 'मैं हूं' हे भावनिक गाणं ईदच्या निमित्ताने रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात सलमान खान आणि चित्रांगदा सिंह दिसत असून, गाण्याला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
सलमान खानचा बहुचर्चित आगामी चित्रपट 'मातृभूमी' सध्या प्रेक्षकांच्या विशेष चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र काही कारणांमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून, आता प्रेक्षकांना त्याची अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे. तरीदेखील सोशल मीडियावर या चित्रपटाची क्रेझ कायम असून, सलमानचे चाहते सतत या चित्रपटाच्या अपडेट्सची वाट पाहत आहेत.
दरम्यान, ईदच्या खास निमित्ताने 'मातृभूमी' या चित्रपटातील 'मैं हूं' हे नवीन गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. सलमान खानने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या गाण्याचा टीझर आणि व्हिडीओ शेअर केला असून, त्याला प्रेक्षकांकडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पोस्टसोबत त्याने दिलेले खास कॅप्शनही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ईदच्या मुहूर्तावर हे गाणे रिलीज झाल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या गाण्यात सलमान खानसोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह दिसत आहे. हे गाणे पारंपरिक रोमँटिक किंवा पार्टी साँग नसून अधिक भावनिक, गंभीर आणि दु:खद छटा असलेले आहे. गाण्याच्या दृश्यांमध्ये प्रेम, विरह आणि एकमेकांपासून दूर राहण्याची तीव्र तळमळ प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. संपूर्ण व्हिडीओ ब्लॅक अँड व्हाईट शैलीत शूट करण्यात आला असून त्यामुळे त्यातील भावनिकता अधिक गडद झाली आहे.
या गाण्याच्या मूळ कथानकात एका सैनिकाच्या कुटुंबाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. देशसेवेच्या कर्तव्यामुळे कुटुंबापासून दूर राहावे लागणाऱ्या सैनिकाचे दुःख, तसेच कुटुंबीयांच्या भावना यात अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. आनंदाचे क्षण आणि विरहाचे दुःख यांचा सुंदर समतोल या गाण्यात दिसून येतो, ज्यामुळे प्रेक्षक भावनिक होतात. हे गाणे सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि अयानलाल यांच्या आवाजात सादर करण्यात आले आहे. त्यांच्या गायकीमुळे गाण्याला अधिक भावनिक ताकद मिळाली आहे. सैनिकांच्या त्यागाला आणि त्यांच्या कुटुंबाच्या संघर्षाला सलाम करणारे हे गाणे असल्याचे मानले जात आहे. गाण्याचा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी सलमान खानचे कौतुक करत 'ईद मुबारक भाईजान' अशा शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी या गाण्याला भावनिक आणि मनाला भिडणारे असे वर्णन केले असून, चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढल्याचे दिसत आहे.

