सांगली जिल्ह्यात भोंदूबाबांकडून अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तिघांविरोधात पोक्सो आणि जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणानंतर राज्यभर अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार पुन्हा चर्चेत आले असतानाच सांगली जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रद्धा आणि अंधविश्वासाचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप तीन भोंदूबाबांवर करण्यात आला आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून महेश मोहन बाबर, संकेत संदीप निकम व सूरज उपाध्याय या तिघांवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला आरोग्याचा त्रास असल्याने तिच्या कुटुंबीयांनी काही व्यक्तींवर विश्वास ठेवला. आरोपींनी संकेत निकम हा विविध देवतांचा अवतार असल्याचा दावा करत पूजा आणि हवन करण्यासाठी कुटुंबीयांना प्रवृत्त केले. त्यानंतर उपचाराच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणात पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर विटा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वीही संबंधित आरोपींवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले होते आणि त्यांना अटक करण्यात आली होती. आता नव्या आरोपांमुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, संबंधित आरोपींना पुन्हा अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे अंधश्रद्धा, भोंदूबाबांवरचा आंधळा विश्वास आणि समाजातील जागरूकतेचा अभाव यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईसोबतच जनजागृतीची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
Sara Tendulkar : "तुम्ही अत्यंत घाणेरडे…", व्हायरल पोस्टवर संतापली सारा तेंडुलकर, नेमकं काय घडलं?

