बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी पार पडणार आहे. बारामती येथे अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुनेत्रा पवारांनी ही निवडणूक बिनविरोध निवडावी यासाठी महायुतीतील पक्ष तसेच शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटानेदेखील पाठिंबा दर्शवला होता.
परंतु काँग्रेसमधून आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता संपली आहे. यावर आज पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, 'मी शरद पवार यांच्या मताशी सहमत आहे. त्यांनी आयुष्यभर काँग्रेससोबत काम केले असून त्यांची विचारधारा काँग्रेसचीच आहे. त्यामुळे काँग्रेसला ही जागा लढण्याचा अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कौटुंबिक कारणांमुळे निवडणूक लढवत नाही, याचा अर्थ इतरांनी लढू नये असा होत नाही. लोकशाहीत कोणालाही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. अजित पवार यांनीही पिंपरी-चिंचवड पोटनिवडणूक काँग्रेसच्या मदतीने लढवली होती, हा अलीकडचा इतिहास आहे.' असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, 'सुनेत्रा पवारांना महाविकास आघाडीकडून अधिकृत पाठिंबा नाही; मात्र सद्भावना आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हे स्पष्ट झाले. बारामतीची निवडणूक शांततेत पार पडेल. मतदार आपली भूमिका मतपेटीतून मांडतील. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सध्या निवडणुकीपासून दूर आहेत; पण काँग्रेस हा महाविकास आघाडीचा घटक असल्याने त्यांनी उमेदवार दिला आहे.'
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra