Dailyhunt
Sunetra Pawar : 'बारामती दादांसाठी आईसारखी होती, बारामती म्हणजे दादांचा श्वास होता', राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सुनेत्रा पवार भावुक

Sunetra Pawar : 'बारामती दादांसाठी आईसारखी होती, बारामती म्हणजे दादांचा श्वास होता', राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सुनेत्रा पवार भावुक

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात नेत्यांनी दिवंगत अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. बारामतीची प्रतिष्ठा कमी होऊ देणार नाही, असा विश्वास यावेळी सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात दमदार भाषण केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात सर्वच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. नेत्यांनी दिवंगत अजित पवारांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. दोन महिन्यांपूर्वी आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्याचं निधन झाल्याची आठवण करून देताना सुनेत्रा पवारांनी मनातील वेदना व्यक्त केल्या. ही पोटनिवडणूक होईल, असा विचारही कधी मनात आला नव्हता, असं सांगताना त्यांनी 'दादा' अजूनही आपल्या सोबतच असल्याची भावना व्यक्त केली. बारामती आणि दादांमधील नातं अत्यंत जिव्हाळ्याचं होतं, असं सांगताना सुनेत्रा पवारांनी बारामतीला अजित पवारांसाठी आईसमान स्थान असल्याचं नमूद केलं.

सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या की, प्रत्येक नागरिक अजित पवारांसाठी 'पांडुरंग' होता आणि लोकसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे, हा त्यांचा दृढ विश्वास होता. बारामतीतील प्रत्येक रस्ता, झाडं, शाळा आणि इमारतीत अजित पवारांचा स्पर्श असल्याचं सांगताना त्यांचा कंठ दाटून आला आणि त्या क्षणी संपूर्ण वातावरण भावनिक झालं. स्वतःच्या दु:खाला बाजूला ठेवून बारामतीच्या विकासासाठी पुढे येण्याचा निर्धार सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षांत दादांना बारामतीकरांनी दिलेल्या भरघोस पाठिंब्याची आठवण करून देत, ही निवडणूक केवळ राजकीय लढत नसून दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी असल्याचं त्यांनी सांगितलं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Time Maharashtra