मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केला, तर सुळे यांनी हा दावा खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील आंदोलनाची तयारी करत असताना, दुसरीकडे ओबीसी नेत्यांकडून या मागणीला विरोध होत आहे. अशातच काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना आमदार विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील अनेक मोठ्या मराठा नेत्यांकडे आधीपासूनच ओबीसी जातप्रमाणपत्रे असल्याचा दावा केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडेही ओबीसी प्रमाणपत्र असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा समाजातील मोठ्या संख्येने लोकांकडे ओबीसी प्रमाणपत्रे असल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला आणि ही प्रमाणपत्रे नेमकी कधी काढण्यात आली, असा सवाल उपस्थित केला. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. जर प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबांकडे आधीपासूनच ओबीसी किंवा कुणबी प्रमाणपत्रे असतील, तर सर्वसामान्य मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा नेमका प्रश्न काय आहे, असा मुद्दा या निमित्ताने पुढे आला आहे. मात्र, वडेट्टीवार यांनी केलेल्या या दाव्यांची अधिकृत कागदपत्रांद्वारे स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी वडेट्टीवार यांच्या दाव्यावर तीव्र आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा खोटा असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. माझ्याबाबत असं वक्तव्य करण्यापूर्वी माझ्याशी चर्चा करायला हवी होती, असंही त्यांनी म्हटलं. या प्रकरणावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता वडेट्टीवार यांच्या दाव्यावर काँग्रेस पक्षांतर्गत काय चर्चा होते आणि या कथित प्रमाणपत्राबाबत कोणते पुरावे समोर येतात, याकडे लक्ष लागलं आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे ओबीसी नेते कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याला विरोध करत आहेत. अशा परिस्थितीत वडेट्टीवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील या दाव्या-प्रतिदाव्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्याला नवं राजकीय वळण मिळालं आहे.
लग्न जुळवण्यासाठी बनली बनावट RPF अधिकारी! जळगाव स्थानकावर तोतया महिलेला अटक

