वाद मिटवण्यासाठी बैठक घेतली आणि बैठकीतच वाद झाले. हे चित्र दिसले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बैठकीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत नाराजीनाट्य, खडाजंगी व किरकोळ वाद एकदाचाच संपवावा, किमान यावर चर्चा व्हावी यासाठी सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक घेतली.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये तीव्र अविश्वासाचं वातावरण आहे, अशी देखील चर्चा आहे. कारण आता पक्षात फक्त एका नेत्याची ताकद नाही, तर ताकदीचं विकेंद्रीकरण झालेलं आहे. एक नेता दुसऱ्या नेत्याशी मनातलं बोलून दाखवत नाही, कारण कोण कधी कोणाला काय सांगेल याचा भरोसा नाही. पक्षातील वाद, अंतर्गत कलह आणि हे नाराजीनाट्य दूर व्हावं यासाठी पक्षाने सुनेत्रा पवार यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व उपस्थित नेत्यांनी आपल्या अडचणी व आपली मतं मांडायला सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटनांसंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या वेळेस माझ्यावर टीका केली जात होती, माझ्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, त्यावेळी पक्षाने माझी पाठराखण केली नाही, असं सुनिल तटकरे म्हणाले. यावर छगन भुजबळ यांनी, "हा विषय इथे मांडू नका, आधी महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करा," असं सांगितलं. यावर सुनिल तटकरे संतापले. "भुजबळ साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, आपणही माझी बाजू मांडली नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
या धुसफुशीचं एक मोठं कारण म्हणजे पक्षातील ज्येष्ठ नेते व नवनेतृत्वामध्ये सुरू असलेला सौम्य संघर्ष. काही वृत्तांच्या मते, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटात अर्थखात्यावरून रस्सीखेच सुरू आहे. स्व. अजित पवारांच्या निधनापासून हे पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. परंतु एक ज्येष्ठ खासदार आपल्याकडे हे खातं असावं यासाठी आग्रही आहेत. यासंबंधी त्यांनी काही राजकीय भेटी देखील घेतल्या आहेत. दरम्यान, छगन भुजबळ यांची देखील आपलं खातं समीर भुजबळ यांच्याकडे देऊन दिल्लीला जाण्याची तयारी आहे. परंतु कुठल्याही मुद्यावर पक्षाने हिरवा कंदील अद्याप दाखवलेला नाही.

