Sunday, 25 Aug, 8.47 am TV9 मराठी

महाराष्ट्र
डॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल

उस्मानाबाद : डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादीचा गड समजल्या जाणाऱ्या उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा येणार नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक सदस्य असलेल्या डॉ. पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. अशावेळी शिवस्वराज्य यात्रेने देखील सोयीस्करपणे मार्ग बदलल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सोमवारी (26 ऑगस्ट) उस्मानाबाद जिल्ह्यात येत आहे. वाशी शहरात सकाळी 10 वाजता ही सभा होणार आहे. सभेनंतर खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अन्य नेते युवकांशी संवाद साधतील. त्यानंतर आमदार राहुल मोटे यांच्या गिरवली निवासस्थानी पाहुणचार घेऊन ते अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडकडे रवाना होतील. या ठिकाणी देखील 26 ऑगस्टला सायंकाळी सभा होणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात 4 विधानसभांपैकी उस्मानाबाद आणि परांडा हे राष्ट्रवादीचे 2 मतदारसंघ आहेत. त्यात डॉ. पाटील आणि त्यांचे नातलग असलेल्या मोटे परिवाराची सत्ता आहे. डॉ. पाटील परिवारात 36 वर्षे, तर मोटे परिवारात 25 वर्षांपासून आमदारकी आहे. पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा या मतदारसंघात होत आहे. अशात बदलत्या समीकरणांमुळे आमदार मोटे यांना पक्षीय स्तरावर बळ देण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. आमदार मोटे यांनी मोदी लाटेतही 2014 साली परंडा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक केली. यावेळी ते विजयी चौकार मारण्यासाठी रिंगणात उतरणार आहेत.

आपण ठरवाल ते धोरण, आपण बांधाल ते तोरण असे लिहिलेले आणि डॉ. पाटील व आमदार राणा यांचे फोटो असलेले बॅनर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. त्यानंतर आमदार राणा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट न केल्याने कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत. पक्ष प्रवेशाच्या मुद्यावरून होणारा कौटुंबिक कलह, कार्यकर्त्यांकडून न मिळणारा अपेक्षित प्रतिसाद आणि ठोस निर्णय क्षमतेच्या अभावामुळे संभाव्य पक्षांतराचे तोरण बांधण्यास उशीर होत असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा जिल्ह्यात येत असताना उस्मानाबादमधील राष्ट्रवादी भवनात मात्र शुकशुकाट होता. जिल्हाध्यक्ष असलेले आमदार राणा नॉट रिचेबल होते. त्यामुळे त्यांची यावर प्रतिक्रिया मिळाली नाही.

नव्या स्वराज्याचा नवा लढा

आमदार राहुल मोटे यांच्या समर्थकांनी फेसबुकसह इतर सोशल मीडियावर शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागत जाहिरातीत डॉ. पद्मसिंह पाटील आणि जिल्हाध्यक्ष व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या फोटोला स्थान दिलेले नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे. मोटे गटाने 'नव्या स्वराज्याचा नवा लढा' असा नारा देत डॉ. पाटील परिवाराला बॅनरवरून वगळले आहे. दुसरीकडे पक्षाच्या कार्यक्रमाच्या आयोजनाचे रिमोट हाती ठेवणारे पाटील कुटुंब यावेळी मात्र अलिप्तच असताना दिसत आहे .

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top