Sunday, 19 Jan, 10.47 pm TV9 मराठी

होम
Ind vs Aus : रोहित-विराटची तुफान फटकेबाजी, कांगारुंचा धुव्वा, मालिकाही खिशात

Ind vs Aus बंगळुरु : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि अखेरच्या वन-डे सामन्यात भारताचा दणदणीत विजय (Ind vs Aus) झाला. या विजयसोबत टीम इंडियाने या मालिकेत 2-1 ने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 287 धावांचे लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 3 बाद 289 धावा केल्या. 7 गडी राखून भारताने ऑस्ट्रेलियावर सहज विजय मिळवला. यंदाच्या वर्षात श्रीलंका मालिकेनंतर हा टीम इंडियाचा दुसरा विजय ठरला. बंगळुरुमधील चेन्नास्वामी स्टेडिअमवर हा सामना रंगला.

सलामीवीर रोहित शर्माची शतकी खेळी आणि कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाचा विजय सुकर झाला. रोहित शर्माने 128 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकाराच्या जोरावर 119 धावा केल्या. तर विराटने 91 चेंडून 8 चौकाराच्या मदतीने 89 धावा केल्या. रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या सामन्याची सुरुवातही फार दमदार झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी खेळी केली. लोकेश राहुल बाद झाल्यानंतर विराट आणि रोहितने जोरदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. या फटकेबाजीने कांगारुंच्या नाकीनऊ आणले. या दरम्यान रोहितने आपलं दणदणीत शतकही साजरं केलं. यानंतर काही वेळाने रोहित झॅम्पाच्या गोलंदाजीवर आऊट झाला.

यानंतर विराटने श्रेयस अय्यरच्या साथीने तुफान फटकेबाजी करत भारताला विजयाजवळ आणलं. विराट शतक पूर्ण करणार असं वाटतं असताना तो बाद झाला. यानंतर मनिष पांडे आणि श्रेयस अय्यर यांनी टीम इंडियाला विजय मिळवून (Ind vs Aus) दिला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टीमवर भारतीय गोलंदाज चांगलेच भारी पडले. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला झटपट माघारी परतला. यानंतर कर्णधार फिंचहीलाही माघारी धाडण्यात भारताच्या गोलंदाजांना यश आलं.

यानंतर मैदानात उतरलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि लाबुशेन या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. यात स्मिथने 132 चेंडूत 1 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने 131 धावा केल्या. ही जोडी मोठी धावसंख्या उभी करणार असे असताना जाडेजाने लाबुशेनचा विकेट घेतला. यानंतर यष्टीरक्षक कॅरी आणि स्मिथने मिळून 200 धावांचा टप्पा ओलांडला. यानंतर मात्र कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करण्यात यश आले नाही. ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्स गमावत 286 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने 4, रविंद्र जाडेजाने 2 तर नवदीप सैनी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top