Saturday, 14 Dec, 11.54 am TV9 मराठी

होम
माझ्या पप्पांचा पगार वाढवा, म्हणजे ते मला वेळ देतील, पहिलीतील चिमुरडीचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : माझ्या पप्पांचा पगार वाढवलात, तर त्यांना ओव्हरटाईम करावा लागणार नाही, म्हणजे ते मला वेळ देतील, अशी निरागस मागणी अवघ्या पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या चिमुरडीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Jalna Girl Letter to CM) यांना केली आहे. 'दमलेल्या बाबाची कहाणी' सांगणारं हे पत्र सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यात राहणाऱ्या श्रेया सचिन हराळे या चिमुकलीने हे पत्र लिहिलं आहे. श्रेया मत्स्योदरी हायस्कूलम्ये पहिल्या इयत्तेत शिकते. मैत्रिणींचे वडील त्यांना सोडायला शाळेत येतात, हे पाहून श्रेयानेही आपल्या बाबांना शाळेत सोडायला येण्याची गळ घातली. त्यावर बाबांनी दिलेलं उत्तर श्रेयाचं भावविश्व ढवळून देणारं होतं.

पगार कमी असल्यामुळे आपल्याला ओव्हरटाईम करावा लागतो. आणि म्हणून तुला वेळ देतात येत नाही, असं केविलवाणं उत्तर बाबांनी श्रेयाला दिलं. सचिन हराळेंची कहाणी ऐकून कोणालाही 'दमलेल्या बाबाची कहाणी' या प्रसिद्ध गाण्याच्या ओळी आठवल्यावाचून राहणार नाहीत. पप्पांचा प्रॉब्लेम सोडवणार कोण, तर ते म्हणजे मुख्यमंत्री, असं श्रेयाच्या मनाने हेरल्याने तिने थेट उद्धव ठाकरेंना पत्र (Jalna Girl Letter to CM) लिहिलं.

काय लिहिलं आहे पत्रात?

आदरणीय मुख्यमंत्री जी,
माझे नाव : श्रेया सचिन हराळे आहे.
मी मत्स्योदरी इंग्लिश स्कूल, अंबडला 1 ली वर्गात शिकते.
पत्रास कारण की, माझे पप्पा खूप दिवसांपासून अंबडच्या बसमध्ये कंडक्‍टरचे काम करतात. माझे पप्पा सकाळी लवकर जातात आणि रात्री उशिरा येतात. मी त्यांना विचारले तर ते मला म्हणतात, 'सोनू बेटा ओव्हर टाईम करावा लागतो. माझा पगार कमी आहे म्हणून'
आदरणीय मुख्यमंत्रीजी माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, मग माझे पप्पा मला शाळेत सोडवायला येतील आणि ओव्हर टायम करणार नाही. माझे पप्पा खूप चांगले आहेत.

From,
Shreya Sachin Harale,
Matsyodari English School,
Ambad. Pin - 431204

श्रेया हराळेच्या गोड मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Jalna Girl Letter to CM) काय उत्तर देतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचा - सेना-भाजपने एकत्र आवाज उठवलेला, आता बांगलादेशी घुसखोरांना मुंबईतून हाकला : सोमय्या

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top