Monday, 13 Jul, 5.09 pm TV9 मराठी

महाराष्ट्र
वाईन शॉपची तुलना विद्यापीठांशी कशाला? परीक्षा घेऊ शकत नाही, ठाकरे सरकारची रोखठोक भूमिका

मुंबई : 'अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत राज्य सरकारची भूमिका कायम (Education Minister Uday Samant On Final Year Exam) आहे. महाराष्ट्रात परीक्षा घेणं शक्य नाही. त्यामुळे केंद्रानेही या भूमिकेला समर्थन द्यावे,' असे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले. तसेच वाईन शॉप आणि विद्यापीठांची तुलना योग्य नाही. येत्या दोन महिन्यात परीक्षा घेणं अशक्य आहे,' असेही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून अंतिम वर्षाच्या परीक्षेवरुन राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असे चित्र पाहायला मिळत आहे. यूजीसीच्या पत्रानंतर काय निर्णय घ्यायचा यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. त्यात उदय सामंत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. 'अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत राज्य सरकारची भूमिका कायम आहे. त्यामुळे परीक्षा घेणं शक्य नाही. ज्यांना परीक्षा द्यायची आहे. त्यांनाही संधी देऊ,' असे उदय सामंत म्हणाले.

'जी भूमिका आम्ही यापूर्वी घेतली होती, ती कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. परीक्षांबाबत आपत्ती व्यवस्थापनाची यापूर्वी झालेली बैठक आणि आताची बैठक या कालावधीत कोरोनाची स्थितीत आणखी वाढली आहे. राज्यात 12 हजारपेक्षा जास्त कंटेन्मेंट झोन आहेत. तिथे 1 कोटीपेक्षा जास्त लोक आढळले आहेत. कोरोनाची आकडेवारी बघितली आणि कुणाचा आग्रह असेल तर ते विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही,' असे उदय सामंत म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

वाईन शॉप सुरु करा. मग परीक्षांना बंदी का, असे यूजीसीचे उपाध्यक्ष पटवर्धन यांनी सांगितले होते. मात्र 'वाईन शॉप आणि विद्यापीठांची तुलना अयोग्य आहे. वाईन शॉपमध्ये जाणं बंधनकारक नाही. पण इथे तुम्ही बंधनकारक करताय,' असेही उदय सामंत म्हणाले.

विद्यार्थ्यांना कोरोना झाला तर यूजीसी जबाबदारी घेणार का?

'बंगळुरुमध्ये 50-100 विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली होती. त्यातील निम्मे कोरोना बाधित झाले. जर महाराष्ट्रात परीक्षा घेतली आणि विद्यार्थ्यांना कोरोना झाला तर याची जबाबदारी यूजीसी घेणार का,' असा प्रश्न उदय सामंत यांनी उपस्थित केला.

'महाराष्ट्रात परीक्षा घेण्यास विद्यार्थी आणि पालकांचाही विरोध आहे. राज्यातील प्राध्यापकही परीक्षा घेण्यास तयार नाहीत. राज्य सरकार सद्यस्थितीत परीक्षा घेण्यास असमर्थ आहे. कोरोना गेल्यानंतर परीक्षा घेण्यास सरकार आजही तयार आहे,' असेही उदय सामंतांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी अभ्यास करायलाच हवा

'विद्यार्थ्यांना अभ्यास करु नका, असा सल्ला राज्य सरकारने कधीही दिला नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आहे. माणूस हा शेवटपर्यंत शिकतच असतो. परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी अभ्यास बंद करा, असा सल्ला मी देणार नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायलाच हवा,' असेही उदय सामंत (Education Minister Uday Samant On Final Year Exam) म्हणाले.

'ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊन चांगले गुण मिळतील असं वाटतं, त्यांच्यासाठी आम्ही परीक्षा घेणार आहोत. परीक्षा अजिबात घेणार नाही, अशी आमची भूमिका नाही. ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांना देण्याची मुभा ठेवली आहे. मला यूजीसी, गृहमंत्री, पंतप्रधानांना पुन्हा विनंती करायची आहे की या परीक्षा आम्ही घेऊ शकत नाही, ते विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही,' असेही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

'आम्ही कोरोनाच्या स्थितीत परीक्षा घेऊ शकत नाही. अनेक कॉलेज हे क्वारंटाईन सेंटरमध्ये रुपांतरीत करण्यात आली आहेत. यूजीसीने परीक्षा घेण्याबाबत दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी आम्ही करु शकत नाही. एटीकेटीबाबतही यापूर्वी झालेला निर्णय कायम ठेवणार,' असे उदय सामंत यांनी सांगितले.

:

'माझ्या पोरांच्या परीक्षेचा तिडो लवकरात लवकर सुटू दि रे महाराजा.' मंत्री उदय सामंतांचं गाऱ्हाणं

Corona | गणेशोत्सवात चाकरमान्यांना 'कोकणबंदी' नाही, विनायक राऊतांचे स्पष्टीकरण

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: TV9 Marathi
Top