Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गुणवत्तेचा लातूर पॅटर्न ते शिक्षणाचे बाजारीकरण

गुणवत्तेचा लातूर पॅटर्न ते शिक्षणाचे बाजारीकरण

राठवाड्याच्या मागसलेपणात किंवा प्रादेशिक असमतोलामागे शिक्षण हा घटक महत्त्वाच्या कारणांपैकी एक आहे. निजामाच्या राजवटीखाली असलेल्या मराठवाड्यात ब्रिटिश कालखंडातलं आधुनिक शिक्षण त्यामानाने उशीराने पोहचलं.

उर्वरित महाराष्ट्र ब्रिटिशांच्या राजकीय गुलामगिरीखाली असला तरी तिथे आधुनिकतेचे वारे लवकर आले. त्या तुलनेत निजामांनी मराठवाड्याला आधुनिकतेचा स्पर्श होऊ दिला नाही.

निजामकाळात खाजगी शिक्षणसंस्था काढण्यास परवानगी नव्हती आणि निजामशासित शाळांमधील शिक्षण ऊर्दू भाषेतून होतं. अशा वातावरणातही हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या कालखंडात काही स्वातंत्र्यसैनिकांनी, आर्यसमाजाच्या विचारातून तयार झालेल्यांनी शाळा सुरू करण्याचं धैर्य दाखवलं. जुन्या उस्मानाबाद जिल्ह्यात बाबासाहेब परांजपे, देवीसिंह चौहान गुरूजी आदींनी त्यात पुढाकार घेतलेला दिसतो.

परंतु लातूर (जुना उस्मानाबाद जिल्हा) किंवा एकूणच मराठवाड्यात शिक्षणाचा खरा प्रसार-विस्तार निजामी राजवट संपुष्टात आल्यानंतरच सुरू झाला. विशेषतः मारवाडी समाजातील नेतृत्व याकामी आघाडीवर होतं. त्यांच्या प्रयत्नांस स्थानिक मारवाडी, मराठा आणि लिंगायत समाजातील दानशूर व्यापारी आणि स्थानिक राजकीय नेतृत्वाने मदत केली. सर्व समाजघटकांना शिक्षण मिळालं पाहिजे, हा त्यांच्या समोरील ध्येयवाद होता. जिल्हानिर्मितीपर्यंत प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या चांगल्या सोयी अस्तित्वात होत्या. परंतु उच्चशिक्षणासाठी हैद्राबाद, औरंगाबादला जावं लागत असे. नंतर हा ओढा पुण्याकडे वळला. परभणी, राहुरी, अंबेजोगाई, परळी, उमरगा येथेही विद्यार्थी जात असत.

शिक्षणाचा 'लातूर पॅटर्न'

सुरुवातीस ध्येयवेड्या शिक्षणप्रेमींनी ज्या शिक्षणसंस्था सुरु केल्या त्यातच 'लातूर पॅटर्न' ची बीजं होती. त्यास जिल्हानिर्मितीनंतर बाळसं आलं. जिल्हानिर्मितीनंतर पाच वर्षांतच येथील विद्यार्थी दहावी-बारावी परीक्षेत राज्यात पहिले-दुसरे येऊ लागले. राज्याची अर्धी मेरिट लिस्ट जिल्ह्याने काबीज केली. १९८८ साली गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना तेव्हाचे शिक्षणमंत्री विलासराव देशमुख म्हणाले, 'आमचा प्रगतीचा हा लातूर पॅटर्न आहे.' तेव्हापासून 'लातूर पॅटर्न' हा शब्द प्रचलित झाला. गुणवत्तेची परंपरा दरवर्षी सातत्याने सुरू राहिली. लातूरसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पुणे-मुंबई-नाशिकची परंपरा मोडीत काढली. काही लोक या यशाकडे संशयाने पाहू लागले. शिक्षणमंत्री लातूरचे असल्याने लातूरचे विद्यार्थी सातत्याने मेरिटमध्ये येतात, असंही म्हटलं गेलं. पुढे विलासरावांचं खातं बदललं, १९९५ साली ते पराभूतही झाले. परंतु लातूरची मेरिटची परंपरा मात्र कायम राहिली. प्रा. जनार्दन वाघमारे म्हणाले होते त्याप्रमाणे, 'शिक्षणातील मागासलेपणाच्या मानसिकतेतून लातूर पॅटर्नचा जन्म झाला होता.'

हेही वाचा - आता तरी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबतील?

शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्या कष्टातून-सहकार्यातून व संवादातून लातूर पॅटर्न विकसित झाला. शिक्षकांनी शिकवण्याचा वेळ वाढवला, तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा वेळ वाढवला. वैयक्तिक लक्ष, अधिक सराव, दर्जेदार नोट्स, टीम वर्क, खाजगी शिकवणीचा अभाव, राजकीय हस्तक्षेपाचा अभाव ही त्याची वैशिष्ट्यं. यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि गुणवत्ता वाढीस लागली. लातूर पॅटर्न उभारणीत प्राचार्य ना. य. डोळे, प्रा. जनार्दन वाघमारे, प्रा. के. एच. पुरोहित, प्रा. अनिरूद्ध जाधव, प्रा. शिवाजीराव पाटील, प्रा. व्ही. व्ही. ढोबळे, प्रा. शिवराज नाकाडे, प्रा. नागोराव कुंभार, प्रा. आर. एल. कावळे, प्रा. एम. एस. देशमुख, प्रा. मधुकर मुंडे, डॉ. एन. ए. मोटे इत्यादींचे विचार आणि संघटन-प्रशासन महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या प्रयत्नांस पुरणमलजी लाहोटी-बियाणी-बाजपेयी-राठी कुटुंब, केशवराव-माणिकराव-अरविंद सोनवणे कुटुंब, शिवप्पा पटणे गुरुजी, अॅड. नारायणराव पाटील, अॅड. किशनराव सावरीकर, अॅड. विष्णुपंत गोरे, अॅड. सांबप्पा गिरवलकर, अॅड. विजयकुमार शेटे, शिवशरणअप्पा चितकोटे, कापसेअप्पा, लोखंडेअप्पा, शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, डॉ. गोपाळराव पाटील, वसंतराव काळे, किशनराव देशमुख, दिलीपराव देशमुख ,विक्रम काळे इत्यादींनी हातभार लावला.

शिक्षणसंस्थांची साथ

राजर्षी शाहू, दयानंद, म. बसवेश्वर, म. गांधी, मा. दीनानाथ मंगेशकर, कुमारस्वामी, उदयगिरी, शिवाजी, म. फुले ही महाविद्यालयं आणि केशवराज, देशीकेंद्र, गोदावरी, राजस्थान, लालबहादूर शास्त्री, गुजराती, सदानंद, परिमल, बंकटलाल, जिजामाता, ज्ञानेश्वर, यशवंत, सरस्वती, व्यंकटेश ही विद्यालयं, या शिक्षणसंस्थांनी लातूर पॅटर्न घडवण्यात आणि टिकवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. लातूर शहराबरोबरच अहमदपूर, उदगीर आणि इतर तालुक्यातही शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. लातूर पॅटर्नमुळे ग्रामीण भागात शिक्षणाचं महत्त्व आणि शिक्षणाविषयी जागृती वाढली. खेड्यापाड्यातील पालकही आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी लातूर-अहमदपूरमध्ये ठेवू लागले. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतूनही असंख्य विद्यार्थी लातूर-अहमदपूरमध्ये प्रवेश घेऊ लागले. 'लातूर पॅटर्न'चं अनुकरण इतरत्र होऊ लागलं. महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर लातूरचं नाव अग्रक्रमाने येऊ लागलं. पुढे शालान्त परिक्षांची गुणवत्ता यादी प्रकाशित करणं बंद झालं, परंतु मेडिकल-इंजिनिअरिंगच्या सीईटीमध्ये लातूरचा दबदबा कायम राहिला. तो आजही तसाच कायम दिसतो.

'लातूर पॅटर्न' ने घडवलेला बदल

'लातूर पॅटर्न' ने काय बदल घडवून आणला, काय साध्य केलं, याचा विचार केला तर-

१. ग्रामीण भागात शिक्षणाचं महत्त्व वाढलं

२. शिक्षण घेणाऱ्या मुलींचं प्रमाण वाढलं

३. ग्रामीण, शोषित-वंचित-बहुजन कुटुंबांतील मुलं डॉक्टर-इंजिनिअर-प्राध्यापक म्हणून पुढे आली

४. विविध स्पर्धापरीक्षांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला

५. मागास समाजघटक अधिक असलेल्या परिसरातील शाळा-महाविद्यालयं, न.पा., जि.प. शाळामधील गुणवत्ता वाढीस लागली. गुणवत्ता यादीत कमी विद्यार्थी आले तरी या शाळांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात शिक्षक यशस्वी झाले.

लातूर पॅटर्नचं खाजगीकरण

दोन दशकं सातत्याने टिकून असलेल्या लातूर पॅटर्नमध्ये हळूहळू दोष निर्माण झाले. काही वाईट प्रवृत्तींनी त्यात प्रवेश केला. नंतरच्या काळात काही महत्त्वाच्या शाळा-महाविद्यालयांत केवळ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळू लागला. सामान्य दर्जाच्या विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजेसची दारं बंद झाली. त्यात इतर जिल्ह्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढल्याने भूमिपुत्रांना प्रवेश मिळणं अवघड झाले. स्थानिक विरुद्ध बाहेरचे हा वाद वाढला. त्यातूनच केंद्रीय प्रवेशप्रक्रिया पुढे आली. काही महाविद्यालयांत केवळ गुणवंत विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळू लागला. गुणवंत विद्यार्थी गुणवत्ता यादीत येणारच, यात मोठं नवल नव्हतं. त्यामुळे अशा संस्थांविषयीचं अप्रूप कमी होऊ लागलं.

सुरुवातीला खाजगी शिकवण्या-ट्यूशनचं प्रमाण कमी होतं. परंतु लातूर पॅटर्नचं प्रस्थ वाढलं तसं खाजगी क्लासेसचं प्रमाणही वाढलं. ज्या संस्थांनी शिक्षकांच्या खाजगी शिकवण्यांवर बंदी घातली त्या संस्थेतील शिक्षक-प्राध्यापकांनी आपल्या नोकऱ्या सोडून खाजगी क्लासेस् सुरू केले. त्यामुळे विद्यार्थी शाळा-महाविद्यालयातल्या शिकवणीऐवजी बाहेरच्या शिकवणीला अधिक महत्त्व देऊ लागले. प्रवेश आणि परीक्षाकेंद्रांपुरताच शाळा-महाविद्यालयांचा वापर होऊ लागला. शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यातील समन्वय कमी होऊ लागला. टीमवर्कची जागा वैयक्तिक श्रेयाने घेतली आणि संस्थाचालकांचा हस्तक्षेपही वाढू लागला. शिवाय ओळख-डोनेशनद्वारे शिक्षक-प्राध्यापक भरती होऊ लागल्याने शिकवण्याचा दर्जा घसरू लागला. गुणवत्तेच्या स्पर्धेमुळे विद्यार्थी केवळ परीक्षाकेंद्री बनू लागले.

अशा परिस्थितीत देखील दहावी-बारावीची गुणवत्ता टिकून आहे. पण त्यात वाटा शाळा-कॉलेजचा, विद्यार्थी-पालकांचा की खाजगी शिकवणी, हा प्रश्नच आहे. 'नीट' आणि 'जेईई'च्या क्लासेसनी कोट्यवधीचं मार्केट उभं केलं. क्लास संस्कृती वाढली आणि कॉलेज ओस पडली. शिक्षणाच्या बाजारीकरणातून शहराचं अर्थकारण बदललं. बाहेरगावहून विद्यार्थी वाढल्याने वसतीगृहं, खानावळी वाढल्या. कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले. तरूणाईत व्यसनांचं, ड्रग्जचं प्रमाण वाढलं. शेवटी क्लासेसच्या स्पर्धेतून पेपर लीक करण्याचं प्रमाण वाढलं. श्रीमंत पालक आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी या रॅकेटचे लाभार्थी बनले.

आज काही क्लासचालक आणि पालकांमुळे लातूरची शैक्षणिक वर्तुळातील प्रतिमा डागाळली आहे. यातून बाहेर येण्याचा मार्ग म्हणजे जुना लातूर पॅटर्न पुनरुज्जीवित करणं होय.

विवेक घोटाळे | 9822578737

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: yunik phichars