Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मराठीसाठी काम करत राहीन

मराठीसाठी काम करत राहीन

"मी मराठी शाळांची सदिच्छादूत आहे. म्हणजे शुद्ध मराठीत ब्रॅण्ड ॲम्बेसेडर"... पालकसभांमध्ये किंवा संमेलनामध्ये हमखास खसखस पिकवणारं किंवा टाळ्या मिळवणारं माझं हे वाक्य आहे.

गेल्या सहा-सात वर्षांपासून मी मराठी शाळांसाठी काम करणाऱ्या मुंबईतल्या एका संस्थेशी जोडले गेले आहे. निमित्त झालं ते सायनच्या डी. एस. विद्यालयात झालेल्या माझ्या मुलाखतीचं. त्या विद्यालयात 'मराठीप्रेमी पालक संमेलन' होतं. संमेलनाच्या एका सत्रात 'अभिनय क्षेत्रात काम करणारी, आपल्या पाल्यांना मराठी माध्यमात धाडणारी एक आई' म्हणून माझी मुलाखत होती. माझ्या जोडीला नीलम गोऱ्हे (नेत्या), मीना कर्णिक (प्रकाशिका, लेखिक), रेखा ठाकूर (सामाजिक कार्यकर्ती) या पालकही होत्या. 'वयम' मासिकाची संपादिका आणि चतुरस्र पत्रकार शुभदा चौकरने ही मुलाखत घेतली होती.

माझ्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालणं हे माझ्यासाठी अतिशय स्वाभाविक होतं. त्यात मी काही जगावेगळं केलं आहे असं मला मुळीच वाटत नाही. आमच्या पहिल्या मुलाला, नीरदला मराठी शाळेत घालायचं ठरवलं तेव्हा माझ्या सासू-सासऱ्यांना थोडी काळजी वाटली होती खरी; पण चर्चेने मी ती दूर केली. माझी आई मानसशास्त्राची प्राध्यापिका आणि वडील निवृत्त भा.प्र.से. अधिकारी. दोघंही मराठी माध्यमात शिकलेले. त्यांचंही या निर्णयात योगदान, सहभाग आणि मत होतं. सुमीत इंग्रजी माध्यमात शिकलेला असला तरीही तो पूर्ण विचाराअंती मनापासून या निर्णयात माझ्याबरोबर राहिला.

नीरद बालवाडीत गेला तेव्हा आम्ही कांदिवलीत होतो. जवळ 'पायोनियर' अशा इंग्रजी नावाच्या पण छान मराठी शाळेत आम्ही त्याला दाखल केलं. बाळ भारी खुषीत होतं. आम्ही भरपूर कविता पाठ करायचो, म्हणायचो. शाळेतल्या गमतीजमती तो घरी येऊन रंगवून, रंगवून सांगायचा...खूपच छान दिवस होते. कालांतराने दिया आयुष्यात आली. आम्ही पार्ल्यात आलो. 'पार्ले टिळक विद्यालय' या शाळेत नीरदला प्रवेशासाठी घेऊन गेलो तेव्हा छातीत धडधडत होतं. पहिलीच्या पाच तुकड्या आणि प्रत्येक तुकडीत सरासरी 60 मुलं. प्रवेश मिळणं सहज नसे; पण तो त्याला मिळाला. तीनच वर्षांनी दियाच्या प्रवेशाच्या वेळी वर्गांची आणि मुलांचीही संख्या जरा रोडावली होती. आता प्रत्येक वर्गाच्या जेमतेम दोन-तीन तुकड्या आणि सरासरी विद्यार्थिसंख्या अर्ध्यावर आली होती.

2017 साली सायनच्या विद्यालयात पालक संमेलनाला जाईतोवर मराठी शाळांना ही अशी अवकळा आली आहे, ही स्थिती मला इतकी प्रकर्षाने जाणवली नव्हती; पण त्याबद्दल कळल्यावर मी खूपच अस्वस्थ झाले. त्या मुलाखतीदरम्यान मी जे बोलले त्याची एक ध्वनिचित्रफित 'यूट्युब'वर प्रसारित झाली आणि ती अक्षरशः लाखभर लोकांनी पाहिली. खूप पालकांनी समाजमाध्यमांवर माझ्याशी संपर्क साधला. आपल्या पाल्याच्या माध्यमनिवडीत माझं मत विचारलं, ग्राह्य धरलं, मला मदत करायची संधी दिली. पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना मी दिलेली उत्तरं स्वानुभवातूनच आलेली होती, म्हणूनच कदाचित त्यांना वेगळी विश्वासाहर्ता होती.

त्या मुलाखतीच्या आयोजनात 'मराठी भाषा अभ्यास केंद्रा'चा पुढाकार होता. त्या निमित्ताने अभ्यासकेंद्राचे प्रा. डॉ. दीपक पवार, प्रकाश परब, प्रा. वीणा सानेकर, आनंद भंडारे, साधना गोरे या साऱ्या तळमळीने काम करणाऱ्या, जाणकार लोकांशी जवळून ओळख झाली. आपापले उद्योग सांभाळून, शिवाय वर पदरमोड

करून ही मंडळी मराठीच्या प्रश्नांसाठी निरनिराळ्या कृतिगटांतून, संशोधनांतून, चर्चांमधून निरनिराळ्या क्षेत्रांत (संगणकीय मराठी, शासनातला मराठी भाषा व्यवहार, मराठी शाळा इ.) सातत्याने काम करत आहेत. मला त्यांच्या कामाची महत्ता आणि महत्व दोन्ही जाणवलं. मी त्यांच्या बैठकांना जाऊ लागले. आणि अशाच एका बैठकीत मी 'मराठी शाळांची सदिच्छादूत' म्हणून काम करावं असं ठरलं.

माझ्या कामाचं निश्चित असं स्वरूप नव्हतं, पण मला सोबतीची एक प्रकारची खात्रीही होती. संस्था दरवर्षी मुंबईत दोन दिवसांचं पालक संमेलन भरवते. महाराष्ट्रातल्या सर्व प्रयोगशील शाळांना तिथे आमंत्रित केलं जातं. निरनिराळ्या उपक्रमांची एकमेकांना माहिती करून देणं; मराठी माध्यमात शिकून उच्चपदी पोहोचलेल्या, निराळ्या वाटा धुंडाळणाऱ्या, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या मुलाखती; सादरीकरणं असे अनेक सुंदर कार्यक्रम निरनिराळ्या सत्रांत आयोजले जातात. त्या निमित्ताने मराठी शाळांची सद्यःस्थिती आणि भविष्य याबद्दलच्या विचारांचं आदानप्रदान होतं, कृती आराखडा ठरतो.

मी आधीही निरनिराळ्या शिक्षणसंस्थांमध्ये वाङ्मयमंडळ किंवा कलामंडळाची उद्घाटक म्हणून, तर कधी स्नेहसंमेलनांची प्रमुख पाहुणी म्हणून जात होतेच. पण आता शाळांमधून खास निमंत्रणं येऊ लागली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या शाळांना भेटी देता आल्या. त्यातून मुलं, पालक, संस्थाचालक यांचे वेगवेगळे विचार, प्रवृत्ती जवळून बघता आल्या.

नुकतीच मी संगमेश्वरनजीकच्या कडवई गावातल्या एका गोड मराठी शाळेत गेले होते- 'भाईशा घोसाळकर शाळा'. शाळेतल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होता. शाळेतले उदंड उत्साही शिक्षक आशिष सरमोकादम यांनी मला या कार्यक्रमाचं निमंत्रण धाडलं, आणि मी ते तत्काळ स्वीकारलं. तिथे पोचले तर एन.सी.सी.च्या पथकाने (त्यात मुलीही होत्या) लयदार, शिस्तबद्ध स्वागत केलं. भव्य पटांगण, लक्ष वेधून घेणारा रंगमंच (हा माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून उभा राहिला आहे.) आणि छान कौलारू शाळा... शाळेच्या कचेरीत मुख्याध्यापक आणि शाळेच्या संचालक समितीतले ज्येष्ठ मस्त हास्यविनोद करत होते. मीही त्यात सामील झाले. मुख्याध्यापक अवघडे सर म्हणाले, "इथे आम्ही सगळे मिळून काम करतो. मी आदेश देणार, मग त्याची अंमलबजावणी, मग मी त्याचा पाठपुरावा करणार, अशी पद्धतच नाही... कुणाची तरी एखादी चांगली संकल्पना असते. मग आम्ही सगळे मिळून ती साकार करतो. प्रत्येकजण आपलं शंभर टक्के योगदान देणारच. संचालक पण नेहमी प्रोत्साहन देतात, आमच्याबरोबर असतात." संस्थेचे अध्यक्ष डॉ. यळगुडकर आल्यावर आम्ही डिजिटल वर्गाचं उद्घाटन केलं. (हा वर्ग यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आर्थिक योगदानातून निर्माण झाला आहे.)

मुख्य कार्यक्रम एका मोठ्या वर्गात होता. कुंभार सर शैलीदार सूत्रसंचालन करत होते. मोजक्या मुला-मुलींनी आपली मनोगतं व्यक्त केली. काहीजणांनी इंग्लिशमध्येही भाषणं केली. एरवी मिश्कील, खट्याळ भासणारी पोरं माइकसमोर आली की हळुवार होत होती. मलाच कित्येकदा भरून येत होतं. मिलिंद कडवई सरांनी शिक्षकांतर्फे आपलं हृद्य मनोगत सादर केलं. त्यानंतर मला भाषण करायचं होतं. भाषण, व्याख्यान वगैरे दूर सारून मी चक्क गप्पाच ठोकल्या तासभर. मुलं इतकी छान प्रतिसाद देत होती. शिक्षकही. माझ्यानंतर अवघडे सर बोलले. तेही सदिच्छेचं भाषण होतं. मार्गदर्शन, 'नीट ऐका' वगैरे काही नाही.. तळमळीने बोलले. अध्यक्षीय समारोपात डॉक्टरांनीही अतिशय प्रॅक्टिकल गोष्टी मुलांना सांगितल्या. बोलताना त्यांचा स्वर घरातल्या वडीलधाऱ्यांसारखा मायाळू होता.

मी माझ्या बोलण्यात मुलांनी मला प्रश्न विचारलेले खूप आवडतात, असं सांगितलं होतं. कार्यक्रमादरम्यान नाही, पण नंतर काही मुलींनी छान प्रश्न विचारले. (मुलांनी नाहीच विचारले.) मी बोलताना सांगितलं होतं, आठवड्यात निदान एका तरी अनोळखी माणसाशी संवाद साधायचा मी प्रयत्न करते. मनश्री नावाच्या मुलीने विचारलं, "समोरची व्यक्ती आपल्या विचारसरणीची नसेल तरीही संवाद साधायचा?" मी म्हणाले, "मग तर आवर्जून साधायचा. त्यातून तुम्हाला दुसरी बाजूही कळते. आपला विचार आपल्याशीच पडताळून बघता येतो. आणि इतर विचारसरणीची माणसं असतात, त्यांचाही आपल्याला आदर बाळगता येतो, त्यांच्यासमवेत राहता येतं हेही कळतं." 'प्राणी आवडतात का?', 'मालिकेत परत कधी काम करणार?', 'मला प्रश्न नाही विचारायचाय, सांगायचंय. तुमचं काम आवडतं मला.'- मुली लखलख डोळे घेऊन चिवचिवत होत्या. मुलं पाठिंबा देत असल्यासारखी मागे राहून आमचं बोलणं ऐकत होती... खूप दिवसांनी 'सेल्फी'पेक्षा 'स्वाक्षरी'त रस असणारे विद्यार्थी भेटले. मस्त सामोसे, कुल्फी असा अल्पोपाहार होता. अवघडे सर म्हणाले, "ताई, टीव्हीवरचं कुणी येणार म्हणून टेन्शनच आलं होतं जरा, पण तुम्हाला भेटून वाटलंच नाही तुम्हाला पहिल्यांदा भेटलो असं." मलाही तिथे पहिल्यांदा गेल्यासारखं वाटत नव्हतं.

बहुतांश शिक्षक हे शाळेचेच माजी विद्यार्थी आहेत. तिशीच्या आतबाहेरचे आहेत. ते मुलांशी मोठ्या दादांसारखे वागतात. दहावीच्या निरोप समारंभाला त्यांच्या शाळेतले नववीचे वर्ग हजर होते. दहावीतील त्यांची मोठी भावंडं शाळेतला शेवटचा कार्यक्रम अनुभवत असताना त्यांची साथसोबत करायला पाठच्यांनी असायला हवं, असा शाळेचा विचार. इथे मुलं पाचवीत जातात तेव्हा मोठ्या वर्गातले ताई-दादा मुख्य प्रवेशद्वारापासून शाळेच्या दारापर्यंत दुतर्फा उभे राहून बँडच्या संगीतावर त्यांचं स्वागत करतात. प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी, पालक यांची शाळेतली भावनिक गुंतवणूक मला पदोपदी जाणवत होती.

मराठी शाळांवर लोभ जडतो तो याचमुळे. कित्येक शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून निरनिराळे शैक्षणिक प्रकल्प सुरू आहेत. मेधाताईंच्या 'जीवनशाळे'तले शिक्षक अहोरात्र मुलांचा विकास हा ध्यास उराशी बाळगून कार्यरत आहेत. 'ओंकार बालवाडी'सारखी संस्था मराठवाड्यात बत्तीस मराठी शाळा चालवत आहे. रमेश पानसे, प्रा. अमृते यांच्यासारखे विद्वान 'ग्राममंगल'द्वारे सातत्याने मराठी शाळांसाठी नवनव्या प्रकल्पांची निर्मिती, शिक्षकांचं शिक्षण यासाठी प्रयत्न करत आहेत.

जिल्हा परिषद शाळांमधले शिक्षकही अतिशय तळमळीने शाळा चालवतात. आमच्या एका बैठकीत एक जि.प. शिक्षिका म्हणाल्या, "आम्हाला रोजच्या रोज इतके तपशील अधिकाऱ्यांना कळवावे लागतात, की ती माहिती कधी लिहीत बसणार आणि मुलांच्या पाठासाठी तयारी आणि उत्साह कुठून आणणार असं वाटतं." अशाही परिस्थितीत काही लोक शाळा तगवण्यासाठी, वाढवण्यासाठी मनापासून झटत आहेत. गरज आहे प्रबोधनाची, कृतिशील दबावगट निर्माण करण्याची.

आमच्या एका पालक संमेलनात नागराज मंजुळे प्रमुख पाहुणे होते. ते बोलताना म्हणाले, "ज्या विहिरीला उपसा जास्त तिला जास्त पाणी, उपसा नसेल तर ती शेवाळेल. भाषेचंही तसंच आहे. जितकी वापराल तितकी वाढेल, जगेल..."

विनोबा शालेय शिक्षणाबाबत बोलताना 'घर शाळेत घुसलं पाहिजे आणि शाळा घरात' असं म्हणाले होते. आई-बाबांच्या, ताई-दादांच्या सुरांत आणि भाषेत बोलणारे शिक्षक आणि शिक्षण लहान लेकरांना किती आपलंसं वाटतं याची उदाहरणं अगदी माझ्या घरापासून मला मिळाली आहेत. नीरदने एकदा 'बाईंच्या साडीला सेम तुझ्यासारखा छान वास येतो' असं सांगितलं होतं. म्हणजे बाई त्याला मायेने जवळ घेत असणार...

पार्ले टिळक विद्यालयात पालक 'इंग्रजी संभाषण' शिकवायला येतात. 'अस्मिता' या जोगेश्वरीच्या शाळेत प्रयोगशील शिक्षणासाठी लागणारी साधनं आणि उपकरणं शाळेतच तयार केली जातात. त्यासाठीची यंत्रसामग्री शाळा उपलब्ध करून देते. ही उपकरणं तयार करणारेही शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यातले काही भारंभार गुण न मिळवलेले पण तंत्रज्ञान विकसित करू शकणारे असे आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी हा उपक्रम केला. ही आणि अशी अनेक उदाहरणं बघितली की फार आश्वासक वाटतं.

माझं मराठी शाळांचं सदिच्छादूत असणं आमच्या चळवळीला काय मदत करतं ठाऊक नाही, पण ते मला मात्र खऱ्या अर्थी समृद्ध करत चाललं आहे हे नक्की. मराठी शाळांच्या प्रसार आणि प्रचारासाठी मिळेल तो मंच वापरायचा असं मी ठरवलं आहे. या संकल्पाचा अतिरेक म्हणा हवं तर, मी लग्नाला गेले की पाकिटात चिठ्ठी ठेवते, 'मुलं व्हायलाच पाहिजेत असं नाही. आई-बाप होण्यासाठी मुलाला आपणच जन्म द्यायला हवा असंही नाही; पण जर आपण ही पालकत्वाची जबाबदारी आनंदाने घेणार असाल, तर जन्म दिलेल्या अथवा दत्तक पाल्याला मराठी शाळेतच घाला.'

मराठी शाळा म्हणजे मराठी भाषेचा कणा आहेत. ही भाषा टिकायची असेल, समृद्ध व्हायची असेल तर मराठी शाळा बंद पडता कामा नयेत. पण सभोवतालचा समाज अतिशय दुटप्पी वागतो आहे. एकीकडे पुन्हा एकदा कर्मकांडाचं, रीतिरिवाजांचं, धार्मिक उत्सवांचं जोरदार प्रदर्शन करून त्याद्वारे संस्कृती-संरक्षण करत असल्याचा भाव जोपासला जातो आहे आणि संस्कृतीची वाहक म्हणजे भाषा, तिला मात्र कवडीमोल ठरवलं जातं आहे.

जे समाजाचं तेच शासनाचं. महाराष्ट्रात सरकार कोणाचंही येवो, मराठीबद्दल, खासकरून मराठी शाळांबद्दल कधीच कुणी, कुठलंही ठोस धोरण आखलं नाही. मुंबईतल्या महानगरपालिकेच्या शाळांना रंगरंगोटी करून त्यांचं 'मुंबई पब्लिक स्कूल' असं गोंडस नामकरण केलं गेलं. तिथे सी.बी.एस.ई.चा इंग्रजी अभ्यासक्रम मोफत शिकवण्यात येणार, अशा जाहिराती मुख्यमंत्र्याच्या फोटोनिशी वर्तमानपत्रांत झळकल्या. या शाळा इंग्रजीच करायच्या होत्या, तर राज्याच्या शैक्षणिक बोर्डाच्या (एस.एस.सी.) तरी कराव्यात, पण नाही. राज्य सरकारचा स्वतःवर, स्वतःच्या प्रादेशिक भाषेवर, राज्याच्या शिक्षणप्रणालीवर, शिक्षणतज्ज्ञांवर, कुणावरच विश्वास नाही. मराठी शाळा स्वतःचा उत्कर्ष स्वतः साधेल किंवा मरेल, असाच साधा हिशोब आहे.

इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमात शिकणं या दोन पूर्णतः भिन्न गोष्टी आहेत हेच मुळात समजून घेण्याची गरज आहे. जे मुंबईत आणि उच्च मध्यमवर्गात होतं तेच झिरपत झिरपत ग्रामीण स्तरावर आणि कनिष्ठ आर्थिक स्तरातल्या नागरिकांपर्यंत पोहोचतं. आज अनेक आदिवासी पाड्यांजवळ, जिथे शहरी लोकांनी 'सेकंड होम्स' वसवली आहेत तिथे गॅरेजमध्ये 'ऑक्सफर्ड' आणि 'केंब्रिज' अशा नावांच्या 'नर्सऱ्या' चालू होत आहेत. का नाही होणार? इंग्रजीत शिकलं की आपला 'विकास' होणार हे आपण शहरी लोकांनी इतकं स्वीकारलं आहे, त्याचंच तिथे अनुकरण होत आहे.

एकदा सरकारने मराठी शाळांसाठी 'बृहद् आराखडा' आखला, अनामत रकमा घेतल्या, अनेक संस्थांनी दहा हजार रुपये भरून स्वबळावर, गावकऱ्यांच्या सहभागाने आपल्या शाळा सुरू केल्या. त्यांना आशा होती, की बृहद् आराखड्यात कालांतराने आपला समावेश होईल आणि आपण चांगलं काम करू. पण अचानक सरकारला ही योजना निरर्थक वाटली. त्यांनी पर्यायी योजना लवकरच जाहीर करू असं सांगून हा आराखडा रद्द केला. अनामत रक्कम म्हणून दीड कोटी रुपये जमले होते, त्यांचा परतावाही अजून झालेला नाही. योजनेच्या आशेने सुरुवात झालेल्या काही शाळा कशाबशा चालू आहेत, कित्येक बंद झाल्या आहेत. नोकऱ्यांसाठी चाचण्या घेऊन दीडशे मराठी शिक्षकांना निवडलं गेलं, पण नंतर त्यांच्या नियुक्त्या झाल्याच नाहीत. त्यांचाही संघर्ष कित्येक दिवसांपासून चालू आहे. या आणि अशा अनेक प्रश्नांसाठी मी मराठी अभ्यासकेंद्रातल्या ज्येष्ठांबरोबर एक सामान्य कार्यकर्ती म्हणून लढत असते.

मला विषाद वाटतो तो माझ्याच मित्रमंडळी, आप्तस्वकीयांबद्दल... मराठी अभिनेते, शिक्षक, लेखक, कवी, अधिकारी, नेते हे कुणीच हल्ली आपल्या

मुलांना मराठी शाळांत पाठवताना दिसत नाहीत. त्याची कारणंही फार मनोहर असतात... 'हल्ली चांगलं मराठी बोलणारे शिक्षक कुठे आहेत? सगळे आनि-पानी करतात.' असं म्हणणाऱ्यांनी गेल्या 10 वर्षांत एकही मराठी शाळा बघितलेली नाही हे लगेच लक्षात येतं... 'आनि-पानी'चं कारण देऊन 'शुद्ध वा अशुद्ध' अशी कुठलीही मराठी कानी पडणार नाही अशा इंग्रजी शाळेत मुलांना पाठवायचं, हा तर्क माझ्या बुद्धीला झेपत नाही. (आनि-पानी म्हणजे अशुद्ध असा शिक्का मारणं योग्य आहे का, हा मुद्दा वेगळाच.)

'मुलांना महाविद्यालयीन शिक्षण कठीण होईल, त्यांच्या मनावर ताण येईल. तो येऊ नये म्हणून इंग्रजीत टाकलं' हा आणखी एक युक्तिवाद. पण महाविद्यालयीन वयात मुलांचं शरीर, मन तो ताण घ्यायला तयार झालेलं असतं. तोपर्यंतच्या शिक्षणाने त्यांना त्यातून मार्ग काढायची क्ऌप्ती शिकवलेली असते. पण यावर विश्वास न ठेवता, अडीच-तीन वर्षांचं मूल अनोळखी भाषेत, अनोळखी वातावरणात ढकलताना, चौथ्या वर्षापासून त्याला शिकवण्यांमध्ये अडकवताना त्याच्यावर या गोष्टींचा किती ताण येत असेल, याचा विचारच होत नाही. शिक्षण हे त्या लेकरासाठी सहज, तणावरहित आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे आनंददायी असावं याकडे सपशेल दुर्लक्ष केलं जातं.

आपल्या मुलांसाठी मल्टिनॅशनल्समधली मोठी पॅकेजेस मिळण्याची, मूल डॉक्टर-इंजिनियर होण्याची स्वप्नं पाहिली जातात. पण मुलं मोठेपणी विख्यात गायक, चित्रकार, संगीतकार, तत्त्वज्ञ, लेखक, कवीही होऊ शकतातच की. त्यासाठी गरज असते आपलं सांस्कृतिक वैभव, वारसा माहीत असण्याची. आणि त्यासाठी गरज आहे मातृभाषेबद्दल आदर असायची, माया असायची, तिच्यावर विश्वास असायची...

कधी कधी आम्ही सगळे कार्यकर्ते उदास होतो, थकतो, तरीही एकमेकांना हुरूप देतो आणि नेटाने पुढची आखणी करतो.. हे काम करत असताना आनंद आणि विषाद यांमध्ये मनाची सतत आंदोलनं सुरू असतात. आपण मराठी शाळेशी आयुष्यभरासाठी जोडले गेलो आहोत ही भावना फार सुखद आहे, पण त्याच वेळी माझ्या महाराष्ट्रात मराठी शाळांचं अस्तित्व नामशेष होऊ नये म्हणून संघर्ष करावा लागतोय हे दुर्दैवी आहे. पण मी दुर्दम्य आशावादी बाई आहे, आणि विवेकवादीही... शुभ-अशुभ काही मानत नाही. पण सदिच्छा आणि प्रयत्न दोहोंवर विश्वास आहे माझा... तेव्हा मराठीसाठी काम करत राहीन, संवाद साधत राहीन.

(अनुभव, एप्रिल 2023च्या अंकातून साभार)

चिन्मयी सुमित

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: yunik phichars