Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मासळी व्यापाराची अनोळखी वाट : दीपक गद्रे

मासळी व्यापाराची अनोळखी वाट : दीपक गद्रे

कोकणी माणूस समुद्राची गाज ऐकत जन्माला येतो आणि समुद्रातले मासे खातच लहानाचा मोठा होतो. पण एक कोळी समाज सोडला तर बाकी कुणी माशांच्या व्यापारात फारसं उतरत नाही. या बाबतीतला मोठा अपवाद म्हणजे दीपक गद्रे.

दीपक गद्रे यांची ‌'गद्रे मरीन' ही कंपनी म्हणजे मासळी व्यापार, मासळी निर्यात आणि सीफुड स्नॅक्स क्षेत्रातलं एक प्रमुख नाव. आज १५०० कोटींची उलाढाल असलेल्या या व्यवसायाची सुरुवात झाली ती अगदी योगायोगानेच.

दीपक गद्रे यांचे पणजोबा हरी पांडुरंग गद्रे यांचं देवरुख इथे किराणा मालाचं दुकान होतं. आजोबा दामोदर यांनी बंधू शिवराम यांच्यासोबत ‌'दामोदर शिवराम' या नावाने संगमेश्वर इथे व्यवसायाचा विस्तार केला. पुढे दीपक यांच्या वडिलांनीही किरकोळ आणि घाऊक स्वरूपाच्या व्यवसायात रत्नागिरी जिल्ह्यातच संगमेश्वर आणि इतर तालुक्यांत जम बसवला. या पार्श्वभूमीवर दीपक मुंबईच्या सिडनेहॅम महाविद्यालयातून बी. कॉम. झाले तेव्हा त्यांच्यासमोर दोन पर्याय होते. मुंबईत एखाद्या बँकेत नाही तर कंपनीत नोकरी करणं किंवा गावी येऊन वडिलांच्या व्यवसायात काम करणं. मात्र, घरात लहानपणापासून पाहिलेल्या वातावरणामुळे असेल, पण कोणत्याही द्विधा मनःस्थितीत न सापडता ते मुंबईहून संगमेश्वरला आले आणि वडिलांसोबत काम करू लागले.

व्यवसायाच्या निमित्ताने गद्रेंचा मुंबईच्या ‌'टाटा ऑइल मिल' या कंपनीशी सतत संपर्क असायचा. ही कंपनी रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या कोळ्यांकडून मासे विकत घेत असे आणि मुंबईत नेऊन त्यावर प्रक्रिया करून त्यांची निर्यात करत असे. दीपक यांच्यातल्या उद्योजकाला यामध्ये व्यवसायाची संधी दिसली. प्रक्रिया केलेले मासे आपणच मुंबईत ‌'टाटा' कंपनीला पोचवावेत असं त्यांना वाटलं. वडिलांशी सल्लामसलत झाल्यानंतर त्यांनी ‌'टाटा'च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्या कंपनीलाही ही ऑफर रास्त वाटली. पुढच्या काळात विश्वव्यापी ठरलेल्या दीपक यांच्या माशांच्या व्यवसायाची सुरुवात ही अशी झाली.

दीपक यांना माशांच्या व्यवसायात यावंसं वाटण्यामागे आणखी एक कारण होतं. त्या काळी गद्रे कुटुंबाकडे एस्सो कंपनीची डिझेलची एजन्सी होती. रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या मासेमारी करणाऱ्या बोटींना त्यांच्यामार्फतच डिझेल पुरवलं जात असे. त्या संदर्भात दीपक अनेकदा समुद्रावर जात असत, कोळ्यांना भेटत असत. तिथे किती मासे पकडले, किती रुपयांना विकले, किती रुपये फायदा झाला, इथपासून सध्या जगातली माशांची बाजारपेठ कशी आहे या सगळ्यांविषयीच्या चर्चा त्यांच्या कानावर पडत. कोकणाला विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे आणि माशांच्या व्यापाराला मोठी संधी आहे हे दीपक यांनी तेव्हाच हेरलं होतं. या व्यवसायाची अधिक माहिती घ्यावी म्हणून त्यांनी काही पुस्तकंही वाचली होती. पण स्वत: काम केल्याशिवाय याबद्दलचं परिपूर्ण ज्ञान मिळणार नाही या विचाराने ते मुंबई ससून डॉकमध्ये पोहोचले. ससून डॉक म्हणजे जागतिक मासळी बाजाराचं प्रमुख केंद्र. तिथे त्यांनी तांडेल फिशरीज नावाच्या कंपनीत प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. ट्रकमधून आलेली मासळी उतरवून घेण्यापासून ते गोठवलेली मासळी जहाजावर चढवण्यापर्यंत सगळी कामं त्यांनी केली. गोरागोमटा दिसणारा हा सुशिक्षित तरुण अशी कामं करताना पाहून लोकांना आश्चर्य वाटे. पण दीपक यांना मात्र क्षितिजापलीकडची बाजारपेठ खुणावत होती. याच दरम्यान त्यांनी एका मित्राच्या मदतीने दहा टन मासळी निर्यात केली; पण माहिती आणि अनुभवाच्या अभावी त्यांना आर्थिक तोटा झाला. म्हणून काही काळ कंत्राटी पद्धतीने काम करावं असं त्यांनी ठरवलं. त्यातूनच ‌'टाटा ऑइल मिल'सोबतच्या कामाला सुरुवात झाली.

हेही वाचा - सुहासिनी आणि यतिन शहा : सोलापूरचे जागतिक उद्योजक

१९७३-७८ अशी पाच वर्षं दीपक यांनी मासळी व्यापाराच्या क्षेत्रात कंत्राटी पद्धतीने काम केलं. एका चित्पावन कुटुंबातल्या तरुणाने असला व्यवसाय करावा हे त्या काळात मोठं धाडसाचं होतं. साहजिकच त्यांना विरोधाला तोंड द्यावं लागलं. शिवाय फार पूर्वी गद्रे कुटुंबीयांपैकी एका सदस्याने माशांचा व्यवसाय सुरू केला होता, पण त्यात त्यांना अपयश आलं होतं, हे आणखी एक कारण होतं. थोडक्यात, दीपक यांची औद्योगिक वाटचाल अनोळखी पायवाटेवरून सुरू झाली होती.

'टाटां'साठी मासळीवर प्रक्रिया करण्यासाठी शीतगृहाची गरज होती. त्या काळी उपलब्ध शीतगृहांची संख्या आजच्यापेक्षा खूपच कमी होती. ही गरज लक्षात घेऊन मासळी निर्यातीच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने काही योजना आखल्या होत्या. त्या योजनेचा लाभ घेत रत्नागिरीमध्येही सहकारी सोसायट्या स्थापन झाल्या होत्या. त्यातल्या एका सोसायटीचं शीतगृह दीपक यांनी भाडेतत्त्वावर घेतलं. शीतगृहापासून जवळच एका पत्र्याच्या शेडमध्ये मासळी स्वच्छ करण्याचं काम सुरू केलं. स्थानिक पातळीवर नियमित वीजपुरवठा नसण्यापासून अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी हे काम निगुतीने करायला सुरुवात केली. त्यातून टाटा कंपनीचे अधिकारी खूष झालेच, पण पुढे ‌'रॅलीज' आणि ‌'विमको'सारख्या कंपन्यांची कामंही त्यांना मिळाली.

एकीकडे दीपक मुंबईतली बाजारपेठ आणि रत्नागिरीच्या समुद्रातली माशांची उपलब्धता यांचा सतत अभ्यास करत होते. केवळ कंत्राटी काम करत बसण्यापेक्षा माशांच्या व्यापारात उतरलं पाहिजे असं त्यांना वाटू लागलं.

मच्छीमारांच्या दृष्टीने फारशी किंमत नसलेल्या ‌'माकूळ' (स्क्विड) माशाला मुंबईत चांगली मागणी असल्याचं त्यांना दिसलं. ही व्यवसायाची संधी साधत त्यांनी मुंबईतून ऑर्डर्स मिळवल्या आणि रत्नागिरीत ‌'माकूळ'ची खरेदी करून ते मुंबईत विकायला सुरुवात केली.

मुंबईत व्यापाऱ्यांची एक भक्कम फळी होती आणि रत्नागिरीत मच्छीमारी करणाऱ्या व्यावसायिकांची लॉबी होती. दीपक मात्र दोन्हींकडे उपरे होते. त्यामुळे दोन्ही ठिकाणी व्यवहार करणं अवघड होतं, पण शिरकाव तर करायचा होता. वेळेत आणि चांगले मासे मिळावेत म्हणून त्यांनी मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांना उचल द्यायला सुरुवात केली. आगाऊ रक्कम मिळाल्यामुळे ते जरा नीट सहकार्य करतील अशी आशा त्यामागे होती; पण अनेकांनी वेळ उलटून गेल्यावरही मासे दिले नाहीत. त्यातल्या काहींनी घेतलेले पैसेही परत दिले नाहीत. परिणामी, दीपक बरेच अडचणीत आले. त्या काळची देशाची अर्थव्यवस्था पाहता बँकांकडून कर्ज मिळणंही कठीण होतं. मग भांडवल आणणार कुठून? भांडवलच नसेल तर व्यवसाय करणार तरी कसा? कोणत्याही उद्योजकाला चेकमेट करणारे असे प्रश्न व्यवसायाच्या प्रत्येक वळणावर उभे असतात. यावरचा तोडगा ज्याचा त्यालाच काढावा लागतो. बराच विचार करून दीपक यांनी त्यावर मार्ग काढला. मुंबईत ज्या कंपन्यांना ते माल विकत होते त्यांच्याकडूनच त्यांनी ॲडव्हान्स रक्कम घ्यायला सुरुवात केली. यामुळे भांडवलाचा प्रश्न काही प्रमाणात सुटला. ‌'व्होल्टाज' या मोठ्या कंपनीची ऑर्डर मिळाल्यामुळेही थोडं स्थैर्य लाभलं.

हेही वाचा - चॉकलेट जायंट चंद्रकांत मोरडे

व्यवसाय जरा सुरळीत चालू आहे असं वाटत असतानाच एक वेगळाच प्रश्न उपस्थित झाला. मासळीच्या कंत्राटी व्यवसायात इतर अनेक उद्योजक शिरले. त्यामुळे साहजिकच स्पर्धेच्या नियमाप्रमाणे सगळ्यांचेच दर खाली आले. त्याचा परिणाम नफ्यावर झाला. शिवाय मुंबईत कितीही माल विकला तरी त्यातून मिळणाऱ्या नफ्याला मर्यादा होत्या. खरी मलई मुंबईतला निर्यातदार मिळवत होता. त्यावर उपाय म्हणून स्वत: निर्यातदार बनणं हाच मार्ग होता. दीपक यांनी त्या दिशेने पावलं टाकली. जपानमधून एक मोठी ऑर्डर मिळवली आणि पूर्ण केली. ‌'गद्रे मरीन एक्सपोर्ट' या कंपनीची ती पहिली ऑर्डर ठरली. साल होतं १९७८.

तो काळ पाहता ही जपानची ऑर्डर मोठी महत्त्वाची होती. सगळा सुशिक्षित मध्यमवर्ग बँक-शाळा-महाविद्यालय किंवा सरकारी नोकरीत स्वत:चं भवितव्य पाहत असताना उत्तम डिग्री हातात असलेले दीपक मात्र खवळलेल्या समुद्राइतकं ‌'असुरक्षित' करियर घडवण्यासाठी राबत होते. दुसरी गोष्ट म्हणजे सध्याच्या झूम कॉल, व्हॉट्सॲप आणि ई-मेलसारखी संपर्कव्यवस्था त्या काळी नव्हती. जपानला साधा फोन लावायचा असेल तरी ते रत्नागिरीहून रात्रीच्या एसटीने मुंबईला जायचे. तिथे ट्रंककॉल लावून वाट पाहत बसायचे. तीन-चार तासांनी फोन लागला की कामाचं बोलून, पुढची एस.टी. पकडून रत्नागिरीला परतायचे.

व्यवसाय करताना सतत संशोधन करण्याचा गद्रे यांचा पहिल्यापासूनचा पिंड. पापलेट, बांगडा, शेवंड किंवा कोळंबी या माशांची नियमित निर्यात सुरू असतानाच ते इतर देशांमधल्या मासळी व्यवसायाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करायचे. त्यासाठी परदेशांतली मासिकं मिळवून वाचायचे. त्या वाचनादरम्यान एकदा त्यांच्या लक्षात आलं की रिबन फिश नावाच्या माशाला चीनमध्ये खूप मागणी आहे. तो थायलंडमध्ये विकत घेतला जातो आणि हाँगकाँगमार्गे चीनमध्ये पोचतो. हा मासा रत्नागिरीच्या समुद्रात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होता; पण त्याला इथे मागणी नसल्यामुळे तो किनाऱ्यावर फेकून दिला जायचा. दीपक यांनी थायलंडमधून ऑर्डर मिळवली आणि रिबन फिश निर्यात केला. खरेदी किंमत अतिशय कमी असल्यामुळे त्यांना नफाही चांगला मिळाला. पण कंत्राटी व्यवसायाप्रमाणेच इथेही झालं. अनेकजण रिबन फिश निर्यात करू लागले आणि त्यातल्या नफ्याचं प्रमाण कमी कमी होत गेलं.

१९७८ ते १९९० या काळात त्यांना वारंवार अशा प्रकारच्या तीव्र स्पर्धेला तोंड द्यावं लागलं. एकीकडे पायाभूत सुविधा जवळजवळ नव्हत्याच. भांडवल उभारण्यासाठी बँकांबरोबर संघर्ष करण्यात भरपूर शक्ती जात होती. गद्रे आडनावाचा कोकणस्थ ब्राह्मण माशांचा व्यवसाय करू शकतो हे समाजाच्या पचनी पडत नव्हतं. त्यामुळेही संघर्ष अटीतटीचा बनत होता. पण १९९० साली मात्र त्यांच्या व्यवसायात एक टर्निंग पॉइंट आला.

तोपर्यंत दीपक यांची जगभर भ्रमंती सुरू झाली होती. अशा भ्रमंतीदरम्यान एकदा त्यांना जपानमधल्या ‌'सुरिमी' नावाच्या लोकप्रिय खाद्यप्रकाराबद्दल समजलं. जरा कुतूहल वाटलं म्हणून त्यांनी खोलात जाऊन त्याची माहिती घेतली. जपानमध्ये थंडीच्या दिवसांत मासे उपलब्ध नसतात. त्या दिवसांतली बेगमी म्हणून भरपूर मासे उपलब्ध असण्याच्या काळात माशांच्या अंगावरचे काटे आणि इतर अनावश्यक भाग काढून त्यातला मांसल भाग एकत्र केला जातो आणि त्याचा लगदा बनवून फ्रिजमध्ये साठवला जातो. थंडीच्या दिवसांत त्याचे तुकडे तळून किंवा भाजून खाल्ले जातात. यालाच जपानी भाषेमध्ये ‌'सुरिमी' असं म्हणतात.

झालं! एवढी माहिती समजल्यानंतर दीपक यांनी भराभर पुढच्या हालचाली सुरू केल्या. कोरियामध्ये ‌'सुरिमी' बनवण्याचा प्लँट उपलब्ध आहे आणि त्याची किंमत एक कोटी रुपयांच्या आसपास आहे, अशी माहिती त्यांनी मिळवली. ‌'सुरिमी'मध्ये भरपूर नफा मिळणार आणि व्यवसायाची भरभराट होणार याची त्यांना खात्री होती; पण ‌'सुरिमी'च्या प्लँट उभारणीसाठी भांडवल उभं करणं हा पहिला यक्षप्रश्न होता.

हेही वाचा - व्यवस्थेला आव्हान देणारी शेतकरी महिला

प्लँटची किंमत आणि उभारणीचा खर्च जमेस धरता दीपक यांना दीड कोटी रुपये कर्ज हवं होतं. तेव्हाच्या युनायटेड वेस्टर्न बँकेकडे त्यांनी कर्जाची मागणी केली. या बँकेने दीपक यांना सुरुवातीपासून साथ दिली होती. एक काळ तर असा आला होता की दीपक यांच्यावर (तेव्हाच्या) ६० लाख रुपयांचं कर्ज झालं होतं. त्याही परिस्थितीत बँकेने त्यांच्यावर विश्वास दाखवला होता, आणि सर्वच्या सर्व पैसे परत करून दीपक यांनी तो विश्वास सार्थ ठरवला होता. मात्र आता निराळाच प्रश्न होता. बँकेतल्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा संचालकांना ‌'सुरिमी'चा व्यवसाय म्हणजे काय हे कळत नव्हतं. त्याला जपानमधून नेमकी किती मागणी असू शकते याचाही अंदाज नव्हता. त्यांनी कर्ज द्यायला नकार दिला नाही, पण कर्जमंजुरीसाठी प्रस्तावाच्या बाजूने बोलणारा कोणी तरी जाणकार हवा होता. असा जाणकार मिळवण्याची जबाबदारी अर्थातच दीपक यांची होती.

जो व्यवसाय भारतासाठी नवीन आहे आणि त्याच्या निर्यातीविषयी कोणाला सांगोवांगीही माहिती नाही अशा विषयातला जाणकार शोधायचा कसा? त्यांनी बराच विचार केला, अनेकांशी चर्चा केली. पाय दुखेपर्यंत पायपीट केली. या सगळ्या भीमप्रयासादरम्यान त्यांना कोणी तरी ‌'नाबार्ड'च्या अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितलं. ‌'नाबार्ड' ही केंद्र सरकारची ग्रामीण आणि शेतीविषयक विकासासाठी स्थापन झालेली बँक. दीपक यांनी ‌'नाबार्ड'च्या अधिकाऱ्यांना त्यांचा प्रस्ताव समजून सांगितला. त्यांच्या मान्यतेनंतर युनायटेड वेस्टर्न बँकेने कर्ज दिलं. मग त्यांनी कोरियातून यंत्रसामग्री मागवून रत्नागिरीमध्ये प्लँट उभा केला. अशाप्रकारे ‌'सुरिमी' बनवून निर्यात करणारे ते पहिले भारतीय ठरले. मात्र या सगळ्यात बऱ्यापैकी वेळ गेला. ‌'सुरिमी'चं पहिलं जहाज मुंबईहून निघालं तेव्हा १९९४ साल उजाडलं होतं.

'गद्रे मरीन एक्सपोर्ट'चा त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा १९९९ साली आला. त्या वर्षी दीपक आणि मीना गद्रे यांचे चिरंजीव अर्जुन हे इंग्लंडमधून शिक्षण घेऊन भारतात परतले. त्यांनी स्वत:हून वडिलांच्या व्यवसायातच काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे दीपकना घरातला आणि हक्काचा साथी मिळाला. दोघांनी मिळून अनेक पटींनी व्यवसायाचा विस्तार केला; 'सुरिमी'चं मूल्यवर्धन करत क्रॅबस्टिक, क्रॅबक्लॉज, लॉब्स्टर टेल्स, श्रीम्प टेल्स, क्रॅब फ्लेक्स, क्रॅब ब्राइट्स किंवा स्कालॉप्ससारखे अनेक ‌'रेडी टु कुक' पदार्थ तयार केले. जपानमधल्या सर्व मोठ्या मॉल्समध्ये ‌'गद्रे' या ब्रँडनेमखाली या पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. शिवाय युरोप आणि अमेरिकेतही या पदार्थांना मागणी आहे. गोठवलेल्या मासळीच्या निर्यातीमध्ये ‌'गद्रे मरिन प्रायव्हेट लिमिटेड' ही देशातली सर्वांत मोठी कंपनी आहे. सध्या अर्जुन हे व्यवसायाची संपूर्ण धुरा सांभाळत आहेत. उत्तम पद्धतीने व्यवसायाचा जगभर विस्तार करत आहेत.

सध्या ‌'गद्रे मरीन एक्स्पोर्ट'ची वार्षिक उलाढाल १५०० कोटी रुपयांची आहे. रत्नागिरीप्रमाणेच चोरावाड (गुजरात), उडुपी (कर्नाटक) आणि ओरिसामध्येही त्यांचे प्लँट्स आहेत. भारताबाहेरच्या व्यवसायासाठी हाँगकाँग, हॉलंड आणि अमेरिकेत लॉस एंजेलिसला कार्यालयं आहेत. सर्व ठिकाणचे कर्मचारी आणि अप्रत्यक्ष रोजगार लक्षात घेता गद्रे कुटुंबाच्या या व्यवसायामुळे आजमितीला दहा हजार जणांच्या रोजीरोटीची सोय होते.

आज भारताच्याच नव्हे तर जगाच्या मत्स्य व्यवसायात ‌'गद्रे' या नावाला मानाचं स्थान आहे. आजवर त्यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत. देशपातळीवरच्या महत्त्वाच्या उद्योजक संघटकांचे ते सदस्य आहेत.

दीपक गद्रे यांच्या रूपाने एका कोकणी माणसाने कोकणात राहूनच जागतिक दर्जाचा व्यवसाय उभा केला आहे. कोकणी माणूस आळशी आहे, फाटक्या तोंडाचा आहे, माणसं जोडणं त्याला जमत नाही, तो विकासविरोधी आहे, असं बरंच बोललं जातं. मात्र, दीपक यांना अशी कुठलीही विधानं मान्य नाहीत. त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांविषयी त्यांचा चांगला अनुभव आहे. आपण कोकणी माणसाशी जसं वागू तसा तो आपल्याशी वागतो, असं त्यांचं मत आहे. तो स्पष्टवक्ता आहे, पण म्हणून त्याला फाटक्या तोंडाचा म्हणता येत नाही. उलट, स्पष्ट बोलल्यामुळे कोणतेही घोळ होत नाहीत. राहता राहिला प्रश्न विकास विरोधाचा. गद्रे यांच्या मते तो विषय नको इतका राजकीय झाला आहे. सामान्य कोकणी माणसाला विकास हवाच आहे.

हेही वाचा - पितांबरी : कोटींच्या उड्डाणाची गोष्ट

दीपक गद्रे यांनी एका पूर्णपणे अनोळखी व्यवसायात झोकून देऊन कोकणी माणसाला विकासाचा असाच एक भक्कम पर्याय उपलब्ध करून दिला. यातच त्यांचं वेगळेपण आहे. जाता जाता आणखी एक गंमत सांगितलीच पाहिजे. २०१२-१३ साली हिंदुस्तान युनिलिव्हरची सी फुडस्‌‍ डिव्हिजन गद्रे यांनी विकत घेतली. पूर्वी त्यांनी जिथे कंत्राटी पद्धतीने काम केलं होतं ती ‌'टाटा ऑइल मिल' एके काळी हिंदुस्तान युनिलिव्हरने विकत घेतलेली. अशा रीतीने एक आवर्तन पूर्ण झालं. दीपक गद्रे यांच्या दृष्टीने मात्र तो व्यवसायविस्ताराचा केवळ एक मार्ग होता. अशाच विविध मार्गांचा त्यांचा शोध यापुढेही चालू राहणार आहे.

अनंत हरी गद्रे यांचा वारसा

दामोदर, शिवराम यांचे तिसरे बंधू म्हणजे अनंत हरी गद्रे. ते ‌'मौज' साप्ताहिकाचे संस्थापक-संपादक होते. आचार्य अत्रे यांचा ‌'झेंडूची फुले' हा कथासंग्रह त्यांनी प्रकाशित केला. तीन अंकी नाटकाची परंपरा त्यांनीच मराठीत आणली आणि ‌'हाऊसफुल्ल' या शब्दाचे जनकही तेच. तसंच, त्यांनी ‌'संदेश'साठी लोकमान्य टिळक यांच्या भारतभरातल्या व्याख्यानांचं आणि कार्यक्रमांचं वार्तांकन केलं. गाडगेमहाराजांकडून प्रेरणा घेऊन अस्पृश्यता निवारणासाठी दलितोद्धाराचे सत्यनारायण घातले.

दीपक आणि अर्जुन गद्रे यांनी त्यांचा हा समाजकार्याचा वारसा पुढे चालवला आहे. त्यांनी ‌'सर्वंकष विद्या मंदिर' या नावाने स्वतंत्र शाळा सुरू केली आहे. २५ एकरांवर पसरलेल्या या शाळेसाठी त्यांनी आजवर करोडो रुपये खर्च केले आहेत. शिवाय रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आणि नगरपरिषदेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी ते सर्व प्रकारची मदत करत असतात. त्याचसोबत ते अनेक स्वयंसेवी संस्थांना आवश्यक ती मदत करतात. अशा मदतीचा ते फारसा गाजावाजा करत नाहीत. उदाहरणच सांगायचं तर ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांनी सुरू केलेल्या ‌'पीपल्स एम्पॉवरिंग मूव्हमेंट्स' या संस्थेच्या पाठीशी ते सर्वार्थाने उभे आहेत. महिला सक्षमीकरण, सार्वजनिक शिक्षण किंवा शेती सुधारणा अशा विविध क्षेत्रांत ही संस्था सध्या काम करते आहे.

(अनुभव, जुलै २०२३च्या अंकातून साभार.)

आनंद अवधानी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: yunik phichars