Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबईत जेन-झी आणि जेन-अल्फाला टीबीचा विळखा?

मुंबईत जेन-झी आणि जेन-अल्फाला टीबीचा विळखा?

लोकसंख्येचा महापूर आणि दाटीवाटीने राहणारी जनता यामुळे टीबी अनेक वर्षांपासून मुंबईला पोखरत आहे. मागील काही दशकांमध्ये औषधाला न जुमानणारे एमडीआर, एक्सडीआर असे टीबीचे गंभीर प्रकार तर फोफावले आहेतच, पण औषधांना दाद देणाऱ्या ड्रग सेन्सेटिव्ह (डीएस) टीबीचं स्वरूपही चिंताजनकरीत्या बदलत आहे.

सर्वसाधारणपणे डीएस टीबी एकतर फुफ्फुस किंवा फुफ्फुसाव्यतिरिक्त अन्य एका अवयवाला बाधित करतो, असं दिसून आलं होतं. परंतु गेल्या काही वर्षांत टीबीचे सूक्ष्मजंतू रक्तप्रवाहाद्वारे किंवा लसिका संस्थेच्या (लिम्फ सिस्टीम) माध्यमातून मज्जासंस्था, पोट, बोन मॅरो, लिम्फ नोड्स अशा इतर अवयवांमध्ये झपाट्याने पसरत असल्याचं डॉक्टरांनी नोंदवलं आहे. शरीराच्या विविध अवयवांमध्ये पसरणाऱ्या (डेसिमिनिटेड) टीबीचं प्रमाण मुंबईतील जेन-झी आणि जेन-अल्फांमध्ये सर्वाधिक आढळून आलं आहे.

फुफ्फुसाला बाधित करणाऱ्या टीबीला पल्मनरी, तर फुफ्फुसाव्यतिरिक्त शरीराच्या अन्य अवयवांमध्ये दिसून येणाऱ्या टीबीली एक्स्ट्रापल्मनरी टीबी म्हणतात. गेल्या काही वर्षांत रुग्णांमध्ये टीबीचा संसर्ग शरीराच्या अन्य अवयवांमध्येही झपाट्याने पसरत असल्याचं चेंबूर येथील शताब्दी रुग्णालयातील फुफ्फुसविकार तज्ज्ञ आणि टीबीविषयक राष्ट्रीय तांत्रिक तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉ. विकास ओसवाल यांनी नोंदवलं आहे. डीएस टीबीमध्ये साधारणपणे ७० टक्के पल्मनरी, तर ३० टक्के एक्स्ट्रा पल्मनरीचं प्रमाण होते. परंतु आता हे प्रमाण जवळपास समान म्हणजे ५० टक्क्यांवर आलं आहे.

हेही वाचा - पीपीएसए सेवा बंद झाल्याने खासगी आरोग्यसेवेतील टीबीचे रुग्ण वाऱ्यावर

डीएस टीबी सहा महिन्यांपर्यत औषधं घेतल्यानंतर पूर्णपणे बरा होतो. परंतु आता इतर अवयवांमध्येही हा टीबी पसरत असल्याने सहा महिन्यांची औषधं पुरेशी ठरत नाहीयत. एक वर्ष किंवा काही रुग्णांमध्ये त्याहून अधिक काळ ही औषधं घ्यावी लागत असल्याचं डॉक्टरांचं निरीक्षण आहे. डेसिमिनेटेड टीबी हा प्रामुख्याने एचआयव्ही, लहान बालक, वयोवृद्ध किंवा रोगप्रतिकारशक्ती अतिशय क्षीण असलेल्या व्यक्तींमध्ये आढळतो, असं आजवरचं संशोधन होतं. परंतु आता या टीबीचं प्रमाण पौगंडाअवस्थेतील बालकांपासून ते ३० वर्षांपर्यंतच्या तरुणांमध्ये वाढत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. इतर कोणत्याही आजाराची पार्श्वभूमी नसतानाही त्यांना टीबीची लागण झाल्याचं दिसन येतं आहे. तसंच या बालकांना किंवा तरुणांना पहिल्यांदाच थेट डेसिमिनेटेड टीबीची लागण झाल्याचंही आढळून येत आहे.

डेसिमिनेटेड टीबी पौगंडावस्थेतील मुलींमध्ये सर्वाधिक

साधारण नऊ ते १५ वयोगटातील मुलींमध्ये मिलिरी टीबीचं प्रमाण चिंताजनकरीत्या वाढल्याचं दिसून येत आहे, असं मुंबईतील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनमधील संसर्गजन्य आजार विभागाच्या प्रमुख डॉ. इरा शाह यांनी सांगितलं. मिलरी टीबी हा डेसिमिनेटेड टीबीचा दुर्मिळ प्रकार असून सर्वसाधारणपणे यामध्ये बाजरीच्या आकाराच्या अनेक गाठी दिसून येतात. डॉ. शाह सांगतात, हा टीबी आत्तापर्यत एक वर्षाहून कमी वयाच्या बालकांमध्ये आढळत असे. परंतु मागील सहा महिन्यांत पौगंडाअवस्थेतील मुलींमध्ये याचं प्रमाण दिसून येत आहे. वाडिया हॉस्पिटलमध्ये मार्च २०२६ मध्ये चार मुलींमध्ये फुफ्फुसासह केंद्रीय मज्जासंस्थेमध्ये हा टीबी पसरल्याचं आढळून आलं आहे. एका मुलीमध्ये तर कोणतीही लक्षणं नसताना आधीच्या रुग्णांच्या पॅटर्नवरून शंका आल्याने डॉक्टरांनी तपासणी केली असता तिच्या केंद्रीय मज्जासंस्थेमध्ये टीबीची बाधा झाल्याचं आढळलं. त्यानंतर असे अनेक रुग्ण आढळू लागले असल्याचं डॉ. शाह यांनी नोंदवलं आहे. मुलींमध्येच हे प्रमाण जास्त का आहे, याचा अभ्यास होणं गरजेचं असून या सर्व मुली कुपोषित असल्याचंही डॉ. शाह यांनी सांगितलं.

हुक्कासेवनाचं (व्हेपिंगचं) वाढतं प्रमाण घातक

१२ ते ३० वयोगटातील तरुणांमध्येही टीबीची लागण वाढलेली असून याचं प्रमुख कारण व्हेपिंग आणि दारुचं सेवन असावं, असं प्रथम दर्शनी दिसून येत असल्याचं डॉ. ओसवाल यांनी सांगितलं. मित्रांसोबत विविध फ्लेवरचं व्हेपिंग करण्याचं प्रमाण वाढलं आहे. एखाद्याला टीबी असल्यास तोच हुक्का ओढणाऱ्या इतरांमध्ये त्याचा प्रसार झपाट्याने होतो. हुक्क्यामुळे किंवा सिगारेटमुळे खोकला येतो अशा समजुतीने ही मुले अनेक दिवस डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. तब्बेत अधिक खालवल्यावर ते डॉक्टरांकडे येतात. अशा वेळी एक्सरेसह अन्य चाचण्या केल्यावर फुफ्फुसातून टीबीचे जंतू शरीराच्या अन्य भागात पसरल्याचं दिसून येते, असं डॉ. ओसवाल म्हणाले. या तरुणांमध्ये अतिप्रमाणात खोकला, ताप यासह डोकेदुखी, पोटदुखी अशी लक्षणं प्रामुख्याने दिसून येतात, असंही त्यांनी सांगितलं.

मुंबईतील टीबी तज्ज्ञांनुसार, डीएस टीबीच्या या बदलत्या स्वरूपाबाबत अद्याप काही संशोधनात्मक अभ्या, प्रसिद्ध झालेले नाहीत. रुग्णांची माहिती संकलित करून संशोधन प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं या डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा - २०२५ साल आलं; 'क्षयरोगमुक्त भारता'च्या घोषणेचं काय झालं?

जन्मल्यानंतर दिली जाणारी बीसीजी लस साधारण १५ वर्षांपर्यंत डेसीमिनेटेड टीबीपासून संरक्षण देते. परंतु अशारितीने डेसिमिनेटेड टीबीचं प्रमाण वाढत असेल तर याबाबत अधिक अभ्यास होणं गरजेचे आहे. टीबीच्या रुग्णांची सीबीनॅट चाचणी करून रिफॅम्पिन या औषधाला दाद देणारा टीबी आहे का हे तपासलं जातं. यावरून डीएस की डीआर यावर शिक्कामोर्तब होत असतं. परंतु या डेसिमिनेटेड टीबीमध्ये इतर औषधांबाबत प्रतिरोध नाही ना हे तपासणंही गरजेचे असल्याचं टीबी संशोधक आणि डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील फाऊंडेशन वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. स्वाती कृष्णा यांनी सांगितलं. डेसिमिनेटेड टीबीच्या रुग्णांबाबत अशी ठोस आकडेवारी भारतामध्ये उपलब्ध नाही.

डेसिमिनेटेड टीबी घातक का?

डीएस टीबीमध्ये जर पल्मनरी टीबी असेल तर सहा महिन्यांपर्यंत औषधं घ्यावी लागतात आणि एक्स्ट्रा पल्मनरी असेल तर आजारानुसार एक वर्षापर्यंत औषधं दिली जातात. परंतु आता डेसिमिनेटेड टीबीमध्ये पल्मनरी आणि एक्स्ट्रा पल्मनरी दोन्ही प्रकार असल्याने उपचारांमध्ये विशेष काळजी घ्यावी लागते. रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाचा अशक्तपणा असून आहारावर विशेष लक्ष न दिल्यास आजाराची तीव्रता वाढण्याची शक्यता असते. महत्त्वाचं म्हणजे या मुलींमध्ये टीबीची लागण पहिल्यांदाच झाली असूनही इतक्या झपाट्याने फुप्फुसांमधून टीबी केंद्रीय मज्जासंस्थेपर्यत पसरत आहे. त्यामुळे औषधांचा प्रभावीपणा, दुष्परिणाम यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचं झालं आहे, असं डॉ. शाह सांगतात. अशा प्रकारच्या टीबीचं निदान करणं सोपं नाही. त्यात ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण वैद्यकीय मदत घेण्यास एक महिन्यापेक्षा जास्त काळ विलंब करतात. बालकांमध्ये निदान करणं अधिक कठीण असते, कारण त्यांच्यातील आजाराची लक्षणं अस्पष्ट असतात. टीबीच्या निदानासाठीच्या चाचण्या खर्चिक असल्याने या आजाराच्या उपचारासोबतच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक भारही वाढतो.

पण डीएस टीबीला साधा टाबी समजून दुर्लक्ष करणं परवडणारं नाही. डीएस टीबीसाठी अधिक जागरुकपणे तपासणी आणि उपचारांमध्येही दक्षता घेणं अत्यावश्यक आहे. जेन-झी किंवा झेन-अल्फा या पिढीचं आरोग्य देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांच्याभोवतीचा टीबीचा विळखा दूर करणं हे टीबी निर्मूलनाच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल ठरेल.

शैलजा तिवले | shailajatiwale@gmail

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: yunik phichars