Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सफर कोपनहेगनची

सफर कोपनहेगनची

'युरोपियन सायन्स एजुकेशन रिसर्च असोसिएशन'ची (ESERA) परिषद दर दोन वर्षांनी युरोपमधील एखाद्या देशात होते. २५ ते २९ ऑगस्ट २०२५ यादरम्यान डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन इथे झालेल्या सोळाव्या परिषदेत आमचा एक शोधनिबंध निवडला गेला.

परिषदेच्या आधी निवडक ५० सहभागींना चार दिवसांच्या शिबिरात भाग घेण्याची संधी मिळणार होती. या शिबिरात डेन्मार्कमधील शाळा, शैक्षणिक संस्था इत्यादी बघायला मिळणार होते. त्यासाठीही माझी निवड झाली. पण अशा परिषदांना येणारा खर्च, व्हिसा, वगैरे सर्व व्यवस्था करणं सोपं नसतं. तरीही या परिषदेला जाण्याची आणि कोपेनहेगन शहर बघायची फार इच्छा होती.

आधी कोपनहेगनबद्दलची माझी उत्सुकता कुठून निर्माण झाली ते सांगते. 'कोपनहेगन' याच नावाचं मायकल फ्रायन यांचं एक नाटक आहे. कोल्हापूरच्या 'प्रत्यय' या हौशी नाट्यसंस्थेने काही वर्षांपूर्वी हे नाटक मराठीत केलं होतं. नाटक दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान घडतं. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरवातीलाच डेन्मार्कने तटस्थ भूमिका जाहीर केली होती. पण युद्ध सुरू झाल्यावर वर्षभराच्या आतच म्हणजे १९४० साली या छोट्याशा देशावर जर्मनीने हल्ला केला. जर्मनीच्या तुलनेत खूपच कमी मिलिटरी असणारा डेन्मार्क थोड्या चकमकीनंतर जर्मनीला शरण गेला, तो युद्ध संपेपर्यंत जर्मनीच्याच ताब्यात होता. या काळात नील्स बोहर हे नोबेल पारितोषिकविजेते प्रसिद्ध डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ कोपनहेगन विद्यापीठात कार्यरत होते. त्यांचा एकेकाळचा विद्यार्थी आणि आता नोबेल पारितोषिक मिळवून स्वतःही प्रथितयश शास्त्रज्ञ झालेला हायझेनबर्ग जर्मन होता. तो जर्मनीच्या अणुबॉम्ब प्रकल्पात सहभागी होता. हायझेनबर्ग १९४१ साली बोहर यांना भेटायला कोपनहेगनमधील त्यांच्या घरी गेला होता. ही वैयक्तिक भेट असल्याने या भेटीत काय चर्चा झाली हे अर्थातच कोणालाच माहीत नाही. पण काय चर्चा झाली असू शकेल असा विचार करून हे नाटक लिहिलेलं आहे. त्याकाळचं राजकारण, विज्ञान आणि या दोन संशोधकांमधील मनोबंध यांचा मेळ असलेलं हे नाटक मोठं मनोरंजक आहे. त्यामुळे कोपेनहेगन या शहराबद्दल मनाच्या एका कोपऱ्यात एक जागा तयार झाली होती. त्यात अलीकडे हे शहर तेथील शाश्वत विकासाच्या प्रयत्नांसाठी प्रसिद्धीस आलं आहे. त्यामुळे हे शहर बघायला मिळावं असं फार मनात होतं.

कोपेनहेगन हे राहण्याच्या आणि खाण्याच्या दृष्टीने महाग शहरांपैकी एक आहे. सुदैवाने आम्हाला परिषदेच्या आयोजकांकडून काही साहाय्य्य मिळाले. मला परिषदेची नोंदणी फी (साधारण ५० हजार रुपये) भरावी लागणार नव्हती. तसंच माझी राहण्याची आणि दुपारच्या जेवणाची सोय परिषदेकडून झाली होती. भारतासारख्या प्रगतिशील देशातील संशोधकांना अनेकदा अशा महागड्या परिषदांना जाणं जमत नाही हे लक्षात घेऊन आयोजकांनी काही आर्थिक तरतूद ठेवलेली असते, त्याचा आम्हा भारतातील संशोधकांना लाभ झाला. मला वसुंधरा वासुदेव नानिवडेकर यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या देणगीतून आर्थिक मदत मिळाली हे कृतज्ञतापूर्वक नमूद करते. काही खर्च मी स्वतः केला. असं मिळून प्रवासखर्चाची सोय झाली. शिबीर आणि परिषद या दोन्हीला हजेरी लावण्यासाठी मी २० ते ३० ऑगस्ट या दरम्यान कोपनहेगनमध्ये होते. या काळात कोपनहेगन शहर आणि तेथील शिक्षणव्यवस्था हे थोडंफार बघता आलं. त्याबद्दलचं हे वर्णन.

मी, माझे एक सहकारी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे आमचे दोन विद्यार्थी असा आमचा चार भारतीयांचा चमू होता. आमचे चौघांचे मिळून दोन शोधनिबंध आणि एक वर्कशॉप, अशी तीन सादरीकरणं होती. निरनिराळ्या कारणांमुळे आम्ही स्वतंत्रपणे प्रवास केला. मी मुंबईहून २० तारखेला सकाळी ७ वाजताच्या विमानाने निघाले आणि पोलंडच्या वॉर्सामार्गे त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता कोपनहेगनला पोचले. कोपनहेगन समुद्राकाठी वसलं आहे. विमान उतरत असताना आपल्याला समुद्रात उभ्या केलेल्या भव्य पवनचक्यांचे विस्तीर्ण फार्म्स दिसतात. निळ्याशार सागरावर संथपणे फिरणारी ती अवाढव्य सफेद पाती बघितली की अचानक आपण एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमात आलो की काय असा भास होतो. कोपनहेगन हे जगातील इको फ्रेंडली आणि शाश्वत विकास घडवून आणणाऱ्या शहरांमध्ये अव्वल मानलं जातं. त्याचा प्रत्यय हा असा तिथे पाऊल टाकायच्या आधीपासूनच येऊ लागतो. परिषदेची स्थानिक आयोजन समिती कोपनहेगन विद्यापीठातील प्राध्यापक मंडळींची असल्यामुळे त्यांनी परिषदही शाश्वत विकासाच्या मूल्यांना धरून होईल असं आधीच सांगितलं होतं. त्यांच्या या संकल्पाचा प्रत्ययही लगेचच आला. स्थानिक आयोजकांनी परिषदेसाठी येणाऱ्या सहभागींना एक लिंक पाठवून तिथल्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीला चालेल असा परवाना डाउनलोड करून घ्यायची सोय केली होती. सहभागींनी त्यांना हव्या त्या तारखांनुसार आपापला परवाना आणावा व जिथे तपासला जाईल तिथे दाखवावा अशी सूचना होती. इतर अनेक प्रगत देशांप्रमाणे कोपनहेगनमध्येही सार्वजनिक वाहतूक उत्तम आहे. बस, ट्रेन, मेट्रो आणि बोटी असे चार प्रकार आहेत. गंमत म्हणजे माझ्या १० दिवसांच्या मुक्कामात आम्ही या चारही प्रकारे प्रवास केला, तरीही आमच्यापैकी एकाचाही परवाना एकदाही तपासला गेला नाही. इतकं सारं काम विश्वासावर चालतं. मात्र कोणी पकडलं गेलं तर जबर दंड बसतो हे ही खरंच.

हेही वाचा - फिनलंड: एक आगळा अनुभव

माझी राहण्याची सोय नेक्स्ट हाऊस या हॉस्टेलमध्ये होती. एअरपोर्टवरून बस घेऊन थेट या हॉस्टेलला पोचले. तिथे एका खोलीत ४ किंवा ६ बेड्स, अशा एकेक मजल्यावर शंभर खोल्या होत्या. असे पाच मजले! म्हणजे त्या हॉस्टेलमध्ये साधारण चारएक हजार लोकांची रहायची सोय होती. त्यात हा युरोपातील सुट्ट्यांचा काळ असल्यामुळे सर्व खोल्या भरलेल्या होत्या. खोल्यांची रचना ट्रेनच्या कंपार्टमेंटसारखी होती व त्यात दोन किंवा तीन बंक बेड्स आणि एक टॉयलेट व एक बाथरूम होतं. मला एक वरचा बेड मिळाला होता. खोलीला एकच खिडकी, तीही थोडीच उघडत होती. बेडवर आडवी झाले, आणि थोड्याच वेळात प्रवासाच्या थकव्याने झोप लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघून बसने कोपनहेगन विद्यापीठाच्या विज्ञान शिक्षण विभागात पोचले. या आधुनिक पद्धतीच्या, ग्रे काचांचं बाह्यांग असलेल्या भव्य इमारतीला नील्स बोहर या डॅनिश शास्त्रज्ञाचं नाव दिलं आहे. आमच्या शिबिराचा बेस इथेच असणार होता. साडे आठ वाजता, शिक्षणात डॉक्टरेट करणारी एक रशियन विद्यार्थिनी, आधी शिक्षक असलेला आणि आता पदव्युत्तर शिक्षण घेणारा एक तैवानचा विद्यार्थी आणि मी असा आमचा ३ जणांचा गट व आमची गाईड, जुलिया (जी मुळात ग्रीक आहे आणि आता कोपनहेगनमध्ये राहते आहे) ओस्टब्रो एलिमेंटरी स्कूलला निघालो. चालत ९ वाजता पोचलो. डेन्मार्कमधील बऱ्याचशा शाळा सरकारी आहेत, पण काही शाळा खाजगीही आहेत. आम्ही गेलो ते ओस्टब्रो एलिमेंटरी स्कूल खाजगी शाळांपैकी एक होतं. आम्ही तिथे पोचल्यावर शाळेच्या मुख्याध्यापिका आमच्याशी थोडक्यात बोलल्या. त्यांच्या सांगण्याप्रमाणे या शाळेत विषय शिक्षणाबरोबरच नैतिक शिक्षण, कला इत्यादींना भरपूर वाव दिला जातो, जो सरकारी शाळांमध्ये असेलच असं नाही. या शाळेला फी असल्यामुळे इथे उच्च आर्थिक वर्गातली मुलं येतात असंही कळलं. त्यानंतर विज्ञान शिक्षक आम्हाला आठवीच्या वर्गात घेऊन गेले. वर्गात २५ मुलं होती आणि दोन विज्ञान शिक्षक! मुलांना गणवेष नव्हता. वर्गातलं वातावरण अत्यंत अनौपचारिक आणि मोकळेपणाचं होतं. मुलं शिक्षकांना नावाने संबोधत होती. प्रत्येक मुलाकडे लॅपटॉप होता आणि काही मुलं त्यात नोट्स लिहीत होती. एक मुलगी तर शिक्षकांच्या सूचना ऐकता ऐकता लोकरीचं विणकाम करत होती.

आमची ओळख करून दिल्यावर तेरा मुलांना एक शिक्षक शेजारीच असणाऱ्या प्रयोगशाळेत घेऊन गेले. उरलेली १२ मुलं दुसऱ्या विज्ञान शिक्षिकेबरोबर वर्गातच राहिली. आम्हीही प्रयोगशाळेत गेलो. प्रयोगशाळा सुसज्ज होती. शिक्षकांनी मुलांना चार गटात विभागून घ्यायला सांगितलं. मुलांनी आपल्या पसंतीचे गट केले. पाण्याच्या विद्युत विघटनाचा प्रयोग करायचा होता. त्याची माहिती मुलांना लॅपटॉपवर पाठवली होती. मुलं ते बघून आपलं आपण साहित्य घेऊन आली आणि दिलेल्या सूचनांप्रमाणे जोडणी करून प्रयोग करू लागली. कुठलं साहित्य कुठे ठेवलं आहे, प्रयोगशाळेत काय काळजी घ्यायची हे सर्व मुलांना चांगलं माहित असलेलं जाणवलं. चौकशी केल्यावर मुलं साधारण महिन्यातून दोनदा, प्रत्येक वेळी दोन तास, प्रयोगशाळा वापरतात असं कळलं. काही मुलं जास्त उत्साहाने प्रयोग करत होती, तर काही शेजारी उभी राहून नुसतीच बघत होती. पण शिक्षक 'तू का करत नाहीयेस?', 'सर्वांना संधी द्या' इत्यादी हस्तक्षेप बिलकुल करत नव्हते. प्रयोग झाल्यावर शिक्षकांनी मुलांशी थोडी चर्चा केली आणि त्यांना पाण्याच्या रेणूची रचना समजावून सांगितली. मुलांनी काही न सांगता आपलं आपण सर्व आवरून ठेवलं आणि साधारण दीड तासाने ती वर्गात परत गेली. मग वर्गात ज्या दुसऱ्या तरुण शिक्षिका होत्या त्यांनी पूर्ण वर्गाला मिळून साधारण अर्धा तास शिकवलं. मुलांची स्वयंशिस्त आणि स्वावलंबित्व वाखाणण्यासारखं होतं.

तास झाल्यावर पुन्हा आम्ही मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे जेवणासाठी सँडविच आणून ठेवलेली होती. ती खाता खाता गप्पा झाल्या. प्रयोगशाळेत प्रत्येक मुलाने प्रयोग करायच्या वेळी प्लास्टिकचे ग्लोव्हज घातले आणि प्रयोग झाल्यावर ते काढून फेकून दिले, हे मला खटकलं होतं. मी त्यांना त्याबद्दल विचारलं- आपण मुलांना करायला देतो ते प्रयोग क्वचितच त्वचेसाठी धोकादायक असतात, मग प्रत्येक प्रयोगाला ग्लोव्हज वापरायची गरज आहे का? मुख्याध्यापक आणि अनुभवी विज्ञान शिक्षक विचारात पडले. त्यांनी विचारलं, तुम्ही तुमच्या देशात काय करता? मी म्हटलं, आमची मुलं काही ग्लोव्हज वगैरे वापरत नाहीत. (मुळात आमच्या मुलांना क्वचितच प्रयोग करायला मिळतात ही गोष्ट काही मी उघड केली नाही.) तरुण शिक्षिकेला मात्र हे अतर्क्यच वाटलं. तिच्या मते तो प्रयोगशाळेच्या प्रोटोकॉलचा भाग होता.

अशा आणखीही काही गोष्टी पुढच्या आठवड्याभरात नजरेस पडल्या. उदा. टिशू पेपर आणि पेपर टॉवेलचा वारेमाप वापर. प्लास्टिकचा एकंदर वापर आपल्यापेक्षा बराच कमी असला तरी बऱ्यापैकी होता. तेव्हा वाटलं, की या गोष्टी त्यांच्या जीवनशैलीचा इतका अविभाज्य भाग झाल्या आहेत की त्या त्यांना दिसतच नसाव्यात! शिवाय कचऱ्याची इको-फ्रेंडली पद्धतीने विल्हेवाट लावायची जबाबदारी शासनाने घेतली असल्यामुळे वैयक्तिक पातळीवर आपण काही करायला हवं असं लोकांना वाटत नसावं. याला एक अपवाद म्हणजे सायकलींचा वापर! फिनलँडमध्ये बघितलं होतं त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणावर कोपनहेगनमध्ये सायकलींचा वापर होतो. सर्वत्र सायकलचे बाईक पाथ आणि पार्किंग तर आहेतच, पण मेट्रो किंवा तत्सम सार्वजनिक वाहनांमधून सायकली घेऊन जायची सोयही आहे. लहान मुलांना पुढ्यात बसवून घेऊन जायच्या, सामान घेऊन जायच्या अशा निरनिराळ्या प्रकारच्या सायकलीही रस्त्यात बऱ्याच दिसतात.

आता परत शाळेत येऊ. शाळेतील सर्व मुलं गोऱ्या वंशाची होती त्याबद्दलही मी मुख्याध्यापकांना विचारलं. त्या म्हणाल्या, एकंदर डेन्मार्कमध्ये वांशिक विविधता कमीच आहे, पण या शाळेत विशेष कमी आहे. ही गोष्ट फार चांगली आहे असं वाटत नसलं तरी त्यांनी स्वीकारली होती असं दिसलं. पण मुळात, स्तुतीपर मुद्द्यांबरोबरच टीकात्मक मुद्दे मांडण्याचा मोकळेपणा तिथे होता. ते मुद्दे ऐकून घेऊन त्यावर त्यांनी सारवासारव न करता खुलेपणाने विचार केला, कबुली दिली याचं मला कौतुक वाटलं. दुपारी निरनिराळ्या शाळा पाहून झाल्यावर शिबिरासाठी आलेले सर्वजण एकत्र जमले आणि त्यांनी काय पाहिलं यावर चर्चा झाली. तिथल्या शाळांमध्ये असलेलं मोकळं वातावारण इतर पश्चिमी देशांच्या तुलनेतही जास्तच असल्याचं या चर्चेतून लक्षात आलं.

त्यादिवशी दुपारी वेळ होता म्हणून मी राऊंड टॉवर हे प्रेक्षणीय स्थळ बघून आले. पूर्वी ही वेधशाळा होती. हा पूर्ण भाग वाहनांना बंद आहे, तिथे फक्त पायी चालता येतं. जाताना बरीच फुलांची दुकानं, सुविनयर्सचे स्टॉल्स, रेस्टोरंट्स वगैरे लागली. जत्रेसारखं वातावरण होतं. गंमत म्हणजे वेधशाळेला गोल जिना नसून चांगला रुंद चढच गोलाकारात वळवत साधारण सात मजले उंचीपर्यंत नेला आहे. शेवटच्या मजल्यावर मात्र गोल जिना आहे आणि तो अगदीच अरुंद आहे. वर गेल्यावर गॅलरीतून शहराचा उत्तम नजर दिसतो.

माझे भारतीय सहकारी अजून आले नव्हते. त्यामुळे संध्याकाळी मी एकटीच हॉस्टेलजवळच्या भागात पायी चक्कर मारून आले. हॉस्टेल अगदी मध्यवर्ती भागातच होतं आणि त्याचा पाठीमागेच कोपनहेगनची खासियत असलेल्या कॅनॉल्सपैकी एक कालवा होता. त्याच्या शेजारी चालण्यासाठीचा रस्ता आणि ऑटम ऋतूतील फॉल रंगानी नटलेली झाडं होती. जवळच डॅनिश आर्किटेक्चर सेंटर आहे, तिथे बाहेर गाण्याचा कार्यक्रम सुरू होता. तिथे थोडा वेळ थांबले. तिथून निरनिराळ्या म्युसिअम्सच्या, दुकानांच्या इमारती बघत एका हमरस्त्याने या भागातील सर्वात मोठ्या इमारतीपाशी, सिटी हॉलपाशी येऊन पोचले. त्याच्यासमोर मोठा फरसबंदी चौक आहे. काही शिल्पं आणि एक कारंजा आहे. सिटी हॉलची मुख्य दगडी इमारत चार मजली आहे आणि एका बाजूला मोठा टॉवर आहे. एकंदर शहरात खूप उंच इमारती नाहीतच. हे शहर म्हणजे जुन्या दगडी आणि नव्या काँक्रिटच्या इमारतींचं कोलाज आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता आम्ही सर्व शिबिरार्थी नील्स बोहर बिल्डिंगमधून लाईफ कॅम्पसला जायला निघालो. हे गावापासून थोडं दूर होतं, पण आम्ही सार्वजनिक बससेवेचाच वापर केला. लाईफ फाउंडेशन ही विना-नफा तत्वावर चालवलेली खाजगी संस्था आहे. कोपनहेगनजवळ त्यांचं मोठं कॅम्पस आहे. डेन्मार्कच्या इतर भागांमध्येही छोटी केंद्रं आहेत. दुर्गम भागातील मुलांसाठी त्यांच्या मोबाइल बसेसही आहेत. तिथे मुलांना जीवशास्त्र शिकण्यासाठी निरनिराळ्या ऍक्टिव्हिटीज तयार केल्या आहेत. शाळा आधी संपर्क करून मुलांना वेळोवेळी तिथे घेऊन येतात. 'शाळांसाठी ही काही सक्ती नाही, पण शिक्षकांचं काम जरा हलकं होतं आणि यासाठी शाळेला कोणताही जास्तीचा खर्च येत नाही. त्यामुळे अनेक शाळा आनंदाने येतात,' असं लाईफ कॅम्पसच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. आम्हाला या कॅम्पसची टूर दिली तेव्हा काही प्रयोगशाळांमध्ये मुलं काम करत असलेली दिसली, तर काही मुलांना बाहेर नेण्यात आलं आहे असं कळलं. त्यानंतर आम्हा शिबिरार्थींचेही गट करण्यात आले. काही गट बाहेर निसर्गाच्या निरीक्षणासाठी गेले. त्यांना किडे, पक्षी, वनस्पती असे विषय वाटून देण्यात आले होते व त्या त्या गटाला उपयुक्त अशी कार्ड्स दिली होती. मी प्रयोग करायला आत राहिलेल्या एका गटात होते.

आमच्या चारजणांच्या गटाला सहा छोट्या ट्यूब्समध्ये पारदर्शक रसायनं दिली होती. यांपैकी पाच ट्यूब्समध्ये जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सापडणाऱ्या पाच प्रकारच्या सापांची विषं होती व एकात पाणी होतं. (आम्हाला नंतर सांगण्यात आलं, की ही विषं सापांपासून मिळवली नसून सिन्थेटिक होती, पण त्यांचं केमिकल कॉम्पोझिशन तंतोतंत खऱ्या विषासारखंच होतं). सहा छोट्या वाट्यांमध्ये माणसाचं रक्त दिलं होतं. सापाच्या विषामुळे माणसाच्या रक्तावर काय परिणाम होतात हे पाहायचं होतं. खरं म्हणजे डेन्मार्कमध्ये एकाच जातीचा साप आढळतो, तोही बिनविषारी. तरी एका महत्त्वाच्या जागतिक प्रश्नाची मुलांना समज असावी व त्याबद्दल पद्धतशीरपणे अभ्यास करून तो समजून घेता यावा या हेतूने ही ऍक्टिव्हिटी तयार केल्याचं तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. आम्ही छोट्या ट्यूब्जमधील विषाचे थेंब रक्तात मिसळले. दोन वाट्यांमधल्या रक्तात गुठळ्या झाल्या, दोन वाट्यांमधल्या रक्तावर फेस आला आणि दोन वाट्यांमधील रक्त तसंच राहिलं. तशाच राहिलेल्या रक्तापैकी एकात पाणी मिसळलं होतं, त्यामुळे ते साहजिकच होतं. पण दुसऱ्या वाटीतील रक्तात कोरल सापाचं विष मिसळलं होतं. वर वर बघता हे विष तितकं जहाल नाही असा निष्कर्ष कोणी काढू शकेल; पण हे विष neurotoxin प्रकारचं आहे. ते मज्जासंस्थेवर परिणाम करतं. त्यामुळे रक्तात काही फरक दिसला नाही तरी मज्जातंतू काम करेनासे झाले की स्नायू शिथिल होतात, शरीर श्वासोछ्वास वगैरे अत्यावश्यक कार्यं करेनासं होतं आणि साधारण १२ तासांत मृत्यू येतो.

मी कित्येकदा साप जवळून पाहिला आहे. माझ्या माहितीच्या काही लोकांना सर्पदंशही झाला आहे. पण साप चावल्यावर नेमकं काय होतं हे मला माहित नव्हतं. त्यामुळे मला तरी ही ऍक्टिव्हिटी फारच उद्बोधक वाटली. पण मुलं यातून आणखी काय काय शिकतील? रसायनं कशी हाताळावेत वगैरे तर आलंच. त्याशिवाय, पाणी आपल्यासाठी विषारी नसतं, त्यामुळे पाणी घालून ढवळलं तर जे परिणाम दिसतील त्याच्या तुलनेत आपण विषाचे परिणाम पाहायचे आहेत. म्हणजे पाणी हे आपण कंट्रोल कंडिशन म्हणून वापरू शकतो, हे मुलांना कळेल. विषाचा प्रभाव बघण्यासाठी सर्व विषं साधारण सारख्या प्रमाणात मिसळली पाहिजेत, ती नीट मिसळावीत यासाठी त्यांना ढवळलं पाहिजे, पण तेही सारख्या प्रमाणात. म्हणजे विष हे एक व्हेरिएबल वगळता बाकी व्हेरिएबल्स बदलता कामा नयेत. वैज्ञानिक पद्धतीची ही दोन महत्त्वाची तत्त्वं जाता जाता शिकतील की मुलं. शिवाय, कोरल सापाच्या neurotoxin च्या निरीक्षणातून, एखाद्या व्हेरिएबलचा परिणाम तशाच दिसणाऱ्या दुसऱ्या व्हेरिएबलपेक्षा अगदी वेगळा असू शकतो, त्यामुळे निष्कर्ष काढण्याची घाई करू नये, हा सहसा पुस्तकात न सापडणारा धडाही शिकतील.

लाईफ कॅम्पसहून आम्ही बसमधून परत येत असताना वाटेत हॉस्टेलजवळच टुरिस्ट इन्फॉर्मशन सेंटर दिसलं होतं. संध्याकाळी परत आल्यावर ते शोधायला बाहेर पडले. किती वेळ शोधलं तरी ते सापडेना. पण मेट्रोचं सेंट्रल स्टेशन सापडलं. तिथून जवळच सिटी हॉलची मोठी इमारत दिसते तिकडे निघाले, तर टुरिस्ट इन्फॉर्मशन सेंटर सापडलं. तिथे कोपनहेगनमधली प्रेक्षणीय स्थळं ठळकपाणे दाखवलेला नकाशा मिळाला. महानगरपालिकेच्या पायी फिरण्याच्या फ्री सिटी टूरची माहिती मिळाली. बुकिंग कुठल्या वेबसाईटवर करायचं तेही कळलं. टुरिस्ट इन्फॉर्मशन सेंटरच्या समोरच टिओलि अम्युझमेंट पार्क आहे. त्याचं तिकीट किती आहे ते बघायला म्हणून गेले तर दारातच लेगोचं मुख्य दुकान दिसलं. 'लेगो' ही डॅनिश कंपनी आहे. माझ्या अकरा वर्षांच्या मुलाने मला कोपनहेगनहून लेगो घेऊन यायला सांगितलं होतं. दुकानात बराच वेळ घालवला, पण लेगोचे लहान-मोठे कुठलेही सेट्स फारच महाग होते. त्यामुळे काहीच खरेदी न करता बाहेर पडले.

दोन्ही दिवशी बसने नील्स बोहर बिल्डिंगला ये-जा केल्याने आणि माझ्या हॉस्टेलच्या परिसरात बरेचदा पायी फिरल्याने एव्हाना माझ्या डोक्यात त्या भागाचा नकाशा तयार झाला होता आणि कुठून कुठली बस पकडता येते हा ही अंदाज आला होता. त्यामुळे तिसऱ्या दिवशी मी नवा बस रूट घेतला आणि गावाचा नवा भाग बघत नील्स बोहर बिल्डिंगला पोचले. त्या दिवशी आम्हाला आणखी दूर समुद्रकिनाऱ्यापाशी नेचर सेन्टरला जायचं होतं. त्यामुळे आम्ही मेट्रो घेतली. मुलांना निसर्गाची गोडी लावणं हे नेचर सेंटरचं काम आहे. विज्ञान, कला, खेळ सर्व माध्यमांमधून मुलांनी निसर्ग समजून घ्यावा, त्याच्याशी नातं जुळवावं, हा मुख्य उद्देश आहे. तिथे पोचल्यावर आम्हाला तीन गटांत विभागण्यात आलं. आमचं सेशन सी-वीडवर होतं. सी-वीडचं सर्व ज्ञानेद्रियांच्या साहाय्याने निरीक्षण करणं, त्यांचं रेखाटन व टिपण करणं वगैरे सेशनचा भाग होता. ही सेशन पहिली ते तिसरीच्या मुलांसाठी बनवली आहेत, त्यामुळे योग्य वाटली.

हेही वाचा - शांतता- जनातली, मनातली, पर्यटनातली

दुपारी कोपनहेगन युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थिनीचं 'नेचर कनेक्टेडनेस' या विषयावर भाषण होतं. ती आधी प्राथमिक शाळेत शिक्षिका होती आणि आता नेचर सेंटरबरोबर काम करत होती. तिने भाषणात आधी झालेल्या संशोधनाचा आढावा घेतला, त्यातल्या दोन गोष्टी इंटरेस्टिंग वाटल्या:

१. निसर्गाशी जोडलं जाणं मुलांच्या ११ वर्षांपर्यंतच्या अनुभवांवर अवलंबून असतं. पुढच्या अनुभवांचा फारसा उपयोग होत नाही. याचा अर्थ मुलांना जर निसर्गाबद्दल आपुलकी वाटायची असेल तर त्यांना ११ वर्षांच्या आत निसर्गाचा आनंद घेण्याची भरपूर संधी मिळाली पाहिजे. आपल्या इथे शहरात वाढणार्या मुलांना अशी संधी क्वचितच मिळते. लहान मुलांना सहलींना न्यायला शिक्षक आणि पालक दोघंही सुरक्षिततेच्या कारणांमुळे घाबरतात. पण शहरांमध्ये आणि जवळपास नैसर्गिक जागा राखायला हव्यात (सर्वत्र लॉन व फुलझाडं लावलेल्या बागा नव्हे; टेकड्या, तळी, उपवनातून जाणाऱ्या वाटा, इत्यादी) मुलांना तिथे घेऊन जायला हवं. प्राथमिक शिक्षणाचा भाग म्हणून मुलांना छोट्या सहली घडवून आणणं, शक्य असेल तर पक्षी, वनस्पती यांचे अभ्यासक बरोबर घेऊन जाणं, शाळेत बागकाम, शेती इत्यादी संधी देणं हे अनिवार्य आहे. नाहीतर मोठी होऊन ही मुलं झाडं तोडून मोठाले रस्ते बांधणं, टेकड्यांवर अतिक्रमण करून मोठमोठ्या इमारती बांधणं, तळी बुजवून त्यावर पार्किंग लॉट तयार करणं, यातच धन्यता मानणार आहेत. याचे परिणाम आपल्या पर्यावरणावर आणि पर्यायाने आपल्या जीवनशैलीवर, उद्योगधंद्यांवर, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत असतात, हे आपण बघतोच. त्यामुळे, लहान मुलांचे पालक, शिक्षक किंवा लहान मुलांशी संपर्क येणारे कोणीही हा लेख वाचत असतील तर त्यांना मी आव्हान करते, की तुमच्या सान्निध्यात येणाऱ्या मुलांवर निसर्गाचा संस्कार करा. लहान वयात निसर्गाशी जुळलेलं नातं हे आपल्या प्रजातीला तारणार आहे, बाकी कुठल्याही शिक्षणापेक्षा, अनुभवापेक्षा ते महत्त्वाचं आहे.

२. तिने सांगितलेला दुसरा मुद्दा, म्हणजे नेचर कनेक्टेडनेस आणि वैज्ञानिक ज्ञानामध्ये कोणताही संबंध दिसून आलेला नाही. माझा असा समज होता, की निसर्गाचा अभ्यास म्हणजेच विज्ञान; त्यामुळे निसर्गाचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये त्याच्याशी एक नातं जुळत असतं. पण आधुनिक विज्ञान निसर्गाकडे तटस्थपणे, वस्तुनिष्ठपणे बघण्यावर भर देतं. याहीपुढे जाऊन, सृष्टी ही माणसाच्या उपभोगासाठी बनवली आहे, त्यामुळे तिचा जितका उपयोग करून घेता येईल तितका घेण्यातच पुरुषार्थ आहे, असा दृष्टिकोनही दुर्मिळ नाही. मात्र निसर्गाचा अभ्यास जास्त आत्मीयतेने केला पाहिजे, सृष्टी ही देवाने आपल्यासाठी बनवली नसून आपण तिचा भाग आहोत, त्यामुळे वेगळा दृष्टिकोन, वेगळं प्राधान्य असलेलं विज्ञान जोपासलं पाहिजे असा प्रस्ताव अलीकडे तत्वज्ञ, वैज्ञानिक आणि विज्ञान - शिक्षणतज्ज्ञ मांडू लागले आहेत.

भाषणानंतर आम्हाला रबरी बूट आणि त्यांना जोडलेला रेनकोटसारखा प्रकार घालायला दिला गेला. आता समुद्रात जाऊन समुद्री जीव गोळा करायचे होते. ते बादलीत सोडून त्यांचं निरीक्षण करणं, त्यांची संख्या मोजणं आणि निरीक्षण झालं, की पुन्हा त्यांना पाण्यात सोडून देणं असा उपक्रम होता. ही ऍक्टिव्हिटी ते अर्थातच प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर करतात, पण शिबिरार्थींनी सुद्धा उत्साहाने मासे वगैरे पकडले. (बऱ्याचशा शिक्षणतज्ज्ञांनाही असे अनुभव विरळाच मिळत असतील की काय असा विचार मनात येऊन गेला!) पण एकंदर डेन्मार्कच्या शिक्षणव्यवस्थेत विज्ञानाबरोबरच निसर्गाच्या सानिध्यात रमणं, निसर्गातील बारकावे टिपणं, त्याला जपणं याला खूप महत्त्व दिलेलं दिसलं. इथे विद्यापीठं संग्रहालयं, नेचर सेंटर्स, आणि अशा इतर संस्थांबरोबर काम करतात ते खूप महत्त्वाचं वाटलं. काही प्राध्यापकांच्या जॉइंट पोझिशन्स असतात आणि विद्यापीठातून डॉक्टरेट करणारे विद्यार्थी या संस्थांमध्येच कार्यरत असतात.

मी हॉस्टेलला परत आले तेव्हा माझे सहकारी व एक विद्यार्थी असे दोघंजण येऊन पोचले होते. हा आमचा विद्यार्थी बिहारच्या लहानशा गावातून मुंबईला शिकायला आलेला. मुंबई हाच त्याच्यासाठी खूप मोठा पल्ला होता. तो खूप मेहनती आहे. त्याचा त्याच्या गाइडबरोबर लिहिलेला पेपर तर परिषदेत सादरीकरणासाठी निवडला गेलाच, पण त्याला परिषदेच्या संयोजकांनी आर्थिक मदतही केली. त्यातून साधारण अर्ध्या खर्चाची तरतूद झाली. बाकी पैसे त्याने इकडून तिकडून मोठ्या सायासाने मिळवले. पहिल्यांदाच परदेशात येत असल्यामुळे त्याच्या उत्साहाला पारावर नव्हता. एवढा मोठा विमान प्रवास करूनही तो लगेच फिरायचा बाहेर पडला. नवं जग बघणारे त्याचे लकाकते डोळे बघणं ही आमच्यासाठी पर्वणी होती. आम्ही तिघं चालत चालत हार्बर एरियात गेलो. इंटरनेटवर कोपनहेगन शोधलं, की रंगीबेरंगी घरं आणि त्यांच्यासमोरच्या कालव्यात नावांमधली झुलती रेस्टोरंट्स असं दृश्य असणारे फोटो येतात, ते याच ठिकाणचे! कोपनहेगनमधलं सर्वात प्रसिद्ध स्थळ बघून झालं.

शिबिराच्या चवथ्या आणि शेवटच्या दिवशी फक्त सकाळचं सेशन होतं. दुसऱ्या दिवशी परिषद सुरू होणार होती, म्हणून संयोजकांना त्याची कामं करायला थोडी उसंत आणि थोडी विश्रांती हवी होती. ते सेशन शिक्षक प्रशिक्षण या विषयावर होतं. सुरुवातीला कोपनहेगन विद्यापीठातील एका संशोधिकेने डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे, फिनलँड आणि जर्मनी या पाच देशांतील शिक्षक प्रशिक्षणाचा आढावा घेतला आणि मग शिबिरार्थींचे लहान गट करून त्यांना त्यांच्या त्यांच्या देशातील शिक्षक प्रशिक्षणाबद्दल एकमेकांना माहिती देऊन चर्चा करायला सांगितली. वेगवेगळ्या समाजांनी किती वेगवेगळ्या प्रकारे शिक्षक प्रशिक्षणाचा विचार केला आहे, तिथे कुठल्या प्रकारचे लोक शिक्षक होऊ इच्छितात, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यावर इतर काही देशांनी काय उपाय केले आहेत इत्यादी चर्चा खूपच मोलाची होती. अशी चर्चा आपली दृष्टी रुंदावायला आणि शिक्षणाविषयीची गृहीतकं, प्रथा-पद्धती, यांचं पुनरावलोकन करण्याच्या दृष्टीने मला फार उपयोगी वाटली.

एव्हाना आमचा चौथा भिडू, म्हणजे आमची आणखी एक विद्यार्थिनीही येऊन पोचली होती. आम्ही सर्वजण सिटी हॉलपाशी जमलो. आम्ही दुपारी तीन वाजताची सिटी टूर बुक केली होती. एका स्थानिक मार्गदर्शकाबरोबर पायी फिरत शहराचा मुख्य भाग बघायचा. महानगरपालिकेची ही फुकट सेवा असली तरी फिरून झाल्यावर आपल्या मर्जीप्रमाणे गाईडला टीप द्यावी अशी अपेक्षा असते. आम्ही साधारण २५ जण होतो. सिटीहॉलसमोरच मोठा कारंजा आहे, शेजारी एका बाजूला, या शहराचा एकेकाळचा रहिवासी, हान्स अँडरसन याचा पुतळा आहे. दुसऱ्या बाजूला एका मोठ्या खांबावर ट्रम्पेट वाजवणारे दोन जण आहेत, त्यांच्याबद्दल लहान लहान किस्से सांगत ते सर्व गाईडने दाखवलं. मग, जुना सिटी हॉल (जिथे आत्ता कोर्ट आहे), त्याच्या समोरचा शिरच्छेद करण्याचा किंवा शिक्षा करण्याचा चौक, शेजारचा बाजाराचा चौक अशी लहान-मोठी ठिकाणं बघून पार्लमेंटपाशी आलो. पार्लमेंटच्या इमारतीमधून पलीकडच्या बाजूला गेलो (पार्लमेंटमधून परदेशी लोकांनाही असं सहज जाता येतं हे विशेष.) आणि तिथून किंग्ज थेटरला वळसा घालून हार्बरला आलो. या सर्व इमारती जुन्या व देखण्या आहेत. बाकी बरंचसं कोपेनहेगन दोनदा मोठ्या आगी लागल्यामुळे नष्ट झालं असलं तरी या इमारती दगडी होत्या म्हणून बऱ्यापैकी शाबूत राहिल्या. त्यांची डागडुजी करून वापरात राहिल्या. तिथून नवं थेटर, कॅनॉलच्या पलीकडचा ऑपेरा हॉल वगैरे आधुनिक डिझाइनप्रमाणे बांधलेल्या इमारती बघत शेवटी आम्ही अमलियनबर्ग राजवाड्यापाशी आलो. दरवाज्यापाशी मोठा कारंजा आहे आणि तिथून आत गेल्यावर एका मोठ्या फरसबंदी चौकाच्या बाजूने गोलाकारात चार मोठे वाडे आहेत.

हेही वाचा - केन झकरमनच्या गावात!

डॅनिश राजेशाही नाममात्र असली तरी तिथली राणी मार्गारेट, जी २०२४ साली निवृत्त झाली आहे, ती बरीच लोकप्रिय असल्याचं कळलं. ती जन्मली तेव्हा डेन्मार्कमध्ये फक्त मुलगेच राज्याचे उत्तराधिकारी होऊ शकत, पण मार्गारेट साधारण १५ वर्षांची असताना तिथे कायदा झाला, की थोरलं अपत्य मुलगी असेल तर तिला राज्य मिळेल. ती वयाच्या बत्तिसाव्या वर्षी राणी झाली. त्याव्यतिरिक्त डिझायनर म्हणून तिची एक स्वतंत्र ओळख आहे. जे. आर. आर. टोलकीन यांच्या कादंबऱ्यांसाठी तिने चित्रं काढली आहेत. फ्रेडरिक हा सध्याचा राजा खेळांना प्रोत्साहन देतो. राजा होण्याआधी मॅरेथॉनमध्ये पळणं, हार्बरसमोरच्या पाण्यात इतर लोकांसोबतच पोहायच्या स्पर्धेत भाग घेणं, आणि इतर खेळ खेळणं इत्यादी तो हौसेने करत असे. (यातून हार्बरसमोरचं पाणी किती स्वच्छ असेल याचीही कल्पना येईल.) सन २००० मध्ये तो ऑलिम्पिकसाठी सिडनीला गेला असताना त्याला त्याची भावी पत्नी भेटली. ती राजवंशातली नसून साध्या घरातून आली आहे असं कळलं. थोडक्यात डेन्मार्कमधली राजेशाही बरीच पुरोगामी विचारांची असावी असं वाटलं.

कोपनहेगनच्या इतिहासाविषयी, डेन्मार्कच्या संस्कृतीविषयी गाईडने बरंच काही सांगितलं. त्यापैकी एक किस्सा मला भावला. दुसऱ्या महायुद्धात डेन्मार्क जर्मनीच्या ताब्यात होता. १९४३ सालच्या सप्टेंबर महिन्यात हिटलर डेन्मार्कमधल्या ज्यू लोकांना अटक व हद्दपारीचा आदेश देणार आहे अशी गुप्त बातमी कळली तेव्हा ज्यू नसलेल्या डॅनिश लोकांनी धोका पत्करून डेन्मार्कमधील ८००० पैकी ७५०० ज्यू लोकांना बोटीत घालून शेजारच्या तटस्थ स्वीडनमध्ये नेऊन सोडलं. युद्ध संपल्यावर जेव्हा ते ज्यू लोक परत आले तेव्हा त्यांची घरं सुरक्षित असलेली त्यांना दिसली. लुटालूट तर सोडाच, अनेक लोकांनी त्यांच्या ज्यू शेजाऱ्यांच्या बागांचीही निगा राखली होती. या गोष्टीचा डॅनिश लोकांना रास्त अभिमान आहे.

टूर संपल्यावर आम्ही आधी तिथून जवळच असलेलं मार्बल चर्च बघायला गेलो. चर्चची वेळ संपून गेल्यामुळे बाहेरूनच पाहिलं. मग चालत चालत समुद्राच्या काठावर चांदणीच्या आकारात बांधलेल्या सीटाडेलवरून पुढे गेलो आणि छोट्या मर्मेडचा सुरेख पुतळा पहिला. हान्स अँडरसनची लिटिल मरमेड ही माझी फार आवडती परीकथा आहे. या कथेने परिकथेची व्याख्याच बदलून टाकली असं मला वाटतं. मर्मेडचं अप्राप्य राजपुत्रासाठी झुरणं, धडपडणं आणि अखेरीस तो मिळायची शक्यता अगदी समोर दिसत असूनही त्यासाठी दुसऱ्या कोणाचा जीव घेण्याचं नाकारत एलिगंटली संपून जाणं, हे एकाच वेळी जितकं मानवी तितकंच अलौकिक आहे. हान्स अँडरसनच्या स्मरणार्थ बनवलेला मर्मेडचा पुतळा लहानसाच पण देखणा आहे आणि मर्मेडचं खंतावणं तिच्या पोजमध्ये निखालसपणे उतरलं आहे.

त्यानंतरचे पाच दिवस तर आम्ही दिवसभर परिषदेत व्यग्र होतो. तिथली सगळी संग्रहालयं साडेपाच वाजता बंद होतात, शिवाय त्यांची एंट्री फी आपल्या दृष्टीने बरीच असते, त्यामुळे ती काही आम्ही पाहू शकलो नाही. पण संध्याकाळी काही ठिकाणं पाहता आली. उदाहरणार्थ, एके संध्याकाळी आम्ही कोपनहीलला गेलो. कोपनहेगनमधून कुठूनही पांढरा धूर ओकणारी एक प्रचंड चिमणी दिसते. जिथे शहरातल्या सगळ्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते त्या इमारतीची म्हणजेच कोपनहीलची ती चिमणी आहे. या सहामजली इमारतीत अशी यंत्रणा आहे की चिमणीतून फक्त कार्बन डाय ऑक्साईड आणि वाफ बाहेर पडते. शिवाय हा कचरा जाळून शहराच्या उष्णतेची बरीचशी गरज भागवली जाते. बाकी कोपनहेगन सपाट आहे म्हणून या प्लान्टला कोपनहील असं नाव दिलं आहे. मोठ्या बिल्डिंगच्या चारही बाजूंनी स्पायरल आकारात स्कीईंग स्लोप बनवला आहे. त्यावर आर्टिफिशियल टर्फसारखं मटेरियल लावलं आहे. वर जायला मात्र लिफ्ट आहे. वरून दृश्य चांगलं आहे. एकीकडे शहर दिसतं आणि एकीकडे समुद्र, आणि त्यात फिरणाऱ्या पवनचक्क्या. कोपनहीलहून परत येताना आम्ही पब्लिक ट्रान्स्पोर्टच्या बोटीचा वापर केला. तिला वॉटर बस म्हणतात.

आणखी एके संध्याकाळी आम्ही रोझेनबर्ग कॅसलच्या इथली किंग्ज गार्डन बघायला गेलो. राजवाड्यात जड-जवाहीर, राज-सिंहासन वगैरेचं प्रदर्शन आहे, पण आम्ही जाईपर्यंत ते बंद झालं होतं. त्यामुळे आम्ही राजवाडा बाहेरूनच बघितला. राजवाड्याच्या बाजूने खंदकात पाणी आहे. समोर मोठाले वृक्ष असलेली मोठी बाग आहे. राजवाड्याला लागून काही गुलाबांचे ताटवे आहेत. आणि वाटांच्या बाजूला काही मूर्ती आहेत. आता तिथे कोणी राहत नाही, त्यामुळे अंधार पडू लागला तसा परिसर सुनसान होऊ लागला. तिन्हीसांजेच्या वेळी दिवे लागले तेव्हा तो वाडा एखाद्या अर्ध्या राहिलेल्या परिकथेतील जादू टाकलेल्या वाड्यासारखा भासला.

ती परीकथा पूर्ण करायलाच की काय, आम्ही आमच्या उपांत्य संध्याकाळी बॅले पाहायला गेलो. आम्ही रोज येता-जाता भिंतींवर लागलेली बॅले फेस्टिव्हलची मोठाली पोस्टर्स बघत होतो. इंटरनेटवर शोधलं तर जगभरातील पाच नामवंत बॅले कंपन्यांना बोलावून कोपनहेगन मध्ये हा तीन दिवसांचा बॅले फेस्टिवल नियोजित करण्यात आला होता. अशी पर्वणी परत सहजासहजी मिळणार नाही हे लक्षात घेऊन महाग असली तरी आम्ही तिकिटं काढली. शिवाय फेस्टिवल आमच्या हॉस्टेलजवळच टिओलि अम्युझमेंट पार्कपाशीच होता आणि बॅलेचं तिकीट काढलं तर अम्युझमेंट पार्कमधे जाण्यासाठीची वेगळी वर्गणी द्यावी लागणार नव्हती. (प्रत्येक राईडची फी अर्थातच स्वतंत्र असते, पण आम्हाला राईड करण्यात काहीच रस नव्हता). कार्यक्रम ८ वाजता सुरू होणार होता. आम्ही परिषद संपवून जाईपर्यंत साडेसात वाजलेच. आत मात्र काल विराम घेऊन थांबलेली परीकथा एकदम जिवंत झाल्यासारखं वाटलं. संगीताच्या तालावर कारंजे उडत होते, फुलांनी, दिव्यांनी, छोट्या दुकानांनी, आणि निरनिराळ्या शोभिवंत झाडांनी, वस्तूंनी परिसर नटला होता. पाठीमागे भव्य थेटर होतं.

आम्ही कार्यक्रमाचं माहितीपत्रक घेऊन मागे आमच्या जागांवर जाऊन बसलो. पण व्ह्यू उत्तम होता. माहितीपत्रक डॅनिशमध्ये होतं, पण आम्ही गूगलच्या मदतीने नाचांच्या नावांचे अर्थ वगैरे शोधून काढले. तेवढ्यात आर्केस्ट्रा सुरू झाला. पाश्चिमात्य वाद्यवृंद मोठे असतात, बॅलेच्या थेटरमध्ये त्यांची स्टेजच्या समोर खाली बसायची सोय असते आणि संगीत सर्वत्र नीट पोचावं यासाठी उत्तम ध्वनीव्यवस्था केलेली असते. त्या प्रत्यक्ष संगीताचा थरार काही वेगळाच असतो. त्या संगीतावर नर्तक झुलू, फिरू, उडू लागले की गुरुत्त्वाकर्षणाचा नियम काही काळासाठी स्थगित केल्याचा भास होतो! आपल्याला वाटतं, थोडा वेळ तरी आपणही वास्तव पॉज करू शकतो! चालू असलेली परिषद, लांब राहिलेलं घर, आपला देश, तिथली शिक्षणव्यवस्था, राजकारण, जगातली युद्धं सगळं खूप खाली कुठेतरी आहे आणि आपण तरंगत तरंगत एका निळ्या जगात येऊन पोचलो आहोत असं काहीसं वाटतं. हे अवकाश, हा काळ आणि त्यात हा आपला देह, या तीनच गोष्टींच्या अस्तित्वाचा आनंद आपण उपभोगू शकतो; यांच्यातील निरनिराळी नाती, शक्यता पडताळून त्या साजऱ्या करू शकतो; आनंदासाठी, तो साजरा करण्यासाठी आणखी कुठल्याच कारणांची गरज नसावी, याची पुनश्च जाणीव झाली.

हेही वाचा - एक चिमुकलं स्टेशन आणि 'गांधीजी का सब'

पाच बॅले कंपन्यांनी प्रत्येकी १०-१५ मिनिटांचे सहा कार्यक्रम सादर केले. काही अभिजात, तर काही आधुनिक पद्धतींच्या रचना होत्या. त्यानंतर दिवे लागले आणि सर्वजण उठले. आम्हाला वाटलं, कार्यक्रम संपला. पण ते मध्यंतर होते. मध्यंतरानंतर दोन नाच फारच सुरेख झाले! सव्वादहाला आमची पऱ्यांच्या राज्यातली सैर संपवून आम्ही बाहेर पडलो.

परिषदेच्या शेवटच्या दुपारी जनरल असेम्ब्लीची मीटिंग होती. त्यात सर्व मेंबर्सना हिशोब, कुठल्या देशातून किती लोक सहभागी झाले, सोसायटीची इतर कामं, कुठल्या पदावर कोण आहे, आणि काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर त्यासंबंधी थोडी चर्चा किंवा सूचना इत्यादी सांगितलं गेलं. आयोजकांना काही प्रश्नही विचारले गेले. परिषदेचा भाग म्हणून काही लोकांनी गाझाच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मांडून त्याविषयी चर्चा करायला परवानगी मागितली होती. राजकीय चर्चा करायला परवानगी का दिली, त्यामुळे इस्रायलच्या लोकांच्या भावना दुखावल्या, असं काही लोकांचं म्हणणं होतं . ESERA च्या अध्यक्षांनी सांगितलं, की ही राजकीय चर्चा नव्हती (शिक्षणाशी संबंधित होती) आणि ती आम्ही पुढाकार घेऊन घडवून आणली नव्हती, काही लोकांनी परवानगी मागितली आणि आम्हाला त्यांची भूमिका योग्य वाटली म्हणून आम्ही दिली. अध्यक्ष एक बाई होत्या आणि प्रश्न विचारणारे लोक सिनियर होते, पण त्या बाईंनी चांगला जवाब दिला!

शेवटच्या दिवशी परिषद दुपारपर्यंतच होती. त्यामुळे एखादं संग्रहालय बघायला वेळ होता. कोपनहेगनमध्ये बरीच संग्रहालयं आहेत, त्यापैकी आम्ही नॅशनल म्युझिअमला गेलो. तिथे ऑडिओची सोय होती, कुठल्याही एक्झिबिटपाशी गेल्यावर त्याची माहिती हेडफोनमधून ऐकता येत होती. स्कँडिनेव्हियाच्या अगदी प्रागैतिहासिक काळापासून सुरुवात झालेलं हे प्रदर्शन खूपच मोठं आहे आणि आम्हाला बघायला जेमतेम एक तास मिळाला. त्यामुळे थोडाच भाग बघून झाला. काही वस्तूंबरोबर त्यांच्या संदर्भातील दंतकथा, पुराणकथा यांचाही अंर्तभाव केलेला असल्याने प्रदर्शन माहितीपूर्ण आणि मनोरंजकही झालं आहे. शेवटच्या दिवशी या भौगोलिक भागाचा, समाजाचा असा आढावा मिळाला, छानच झालं!

आजकाल लोकांचा एकंदर प्रवास वाढला आहे. सर्वांनी सारखं इकडेतिकडे जाऊन कार्बन फुटप्रिंट वाढवावी का हा प्रश्न रास्तच आहे. त्यामुळे असं कुठेतरी जाताना याची आपल्याला खरंच गरज आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. पण म्हणून जाऊ तेव्हा त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असा विचार मनात असतो. कोपनहेगनमधली परिषद माझ्या कामाच्या दृष्टीने तर महत्त्वाची होतीच, शिवाय अनुभवांची मोठीच पुंजी गाठीला बांधून मी परतले, त्यामुळे या प्रवासाचं तरी समर्थन करता येईल.

डॉ. शमिन् पडळकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: yunik phichars