Dailyhunt
बीडमध्ये भीषण अपघात! तहसीलदार राकेश गिड्डे यांचे निधन, जिल्ह्यात शोककळा

बीडमध्ये भीषण अपघात! तहसीलदार राकेश गिड्डे यांचे निधन, जिल्ह्यात शोककळा

बीड/केज: बीड जिल्ह्याच्या महसूल प्रशासनातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण रस्ते अपघातात निधन झाले आहे. लातूर-अंबाजोगाई महामार्गावर रेणापूर फाट्याजवळ हा काळाचा घाला घातला.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश गिड्डे हे आपल्या खाजगी कारने प्रवास करत होते. लातूर-अंबाजोगाई मार्गावर जात असताना, त्यांच्या कारवरील नियंत्रण अचानक सुटले आणि वाहन वेगाने उलटून भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला.

महसूल विभागात हळहळ

राकेश गिड्डे हे त्यांच्या कार्यक्षम आणि मनमिळावू स्वभावासाठी ओळखले जात होते. केज तालुक्यात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण बीड जिल्ह्यासह महसूल विभागात मोठी शोककळा पसरली आहे. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, परंतु दुर्दैवाने त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. सध्या पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi