रायगड (राजधानीचा गड)
'गडांचा राजा आणि राजांचा गड' अशी रायगडाची ओळख आहे. हे मराठा साम्राज्याचे राजधानीचे ठिकाण होते. तसेच गडावर गेल्यानंतर आजही शिवछत्रपतींच्या स्वराज्याची भव्यता डोळ्यासमोर उभी राहते. रायगड हा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा किल्ला आहे. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक याच गडावर झाला. तसेच इथली हवा आजही स्वराज्याच्या आठवणींनी भारलेली आहे.
विशेष आकर्षण: गडावरील भव्य राजसदर, शिवरायांची समाधी, जगदीश्वर मंदिर, नगारखाना आणि उंच कडा असलेला 'टोकमाक टोक', कुशावर्त तलाव
राजगड (स्वराज्याची पहिली राजधानी)
पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात असलेला हा किल्ला शिवरायांच्या राजकीय हालचालींचे मुख्य केंद्र होता. महाराजांनी सर्वाधिक काळ याच गडावर वास्तव्य केले. पुणे जिल्ह्यात असलेला हा किल्ला त्याच्या अवाढव्य विस्तारामुळे आणि कठीण बांधणीमुळे ओळखला जातो. हा किल्ला गिर्यारोहकांसाठी (Trekkers) पंढरी मानला जातो.
विशेष आकर्षण: पद्मावती माची, सुवेळा माची, संजीवनी माची आणि बालेकिल्ला, बालेकिल्ल्यावरून दिसणारा सभोवतालचा परिसर मंत्रमुग्ध करणारा असतो.
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला
प्रतापगड (जावळीचे खोरे)
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळ असलेला हा किल्ला अफझलखानाच्या वधाच्या ऐतिहासिक घटनेसाठी प्रसिद्ध आहे. गडावरून सभोवतालचे जावळीचे घनदाट जंगल आणि निसर्ग सौंदर्य मनाला भुरळ घालते.
विशेष आकर्षण: शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, भवानी माता मंदिर आणि अफझलखानाचा कोथळा बाहेर काढलेला तो ऐतिहासिक बुरूज,
सिंधुदुर्ग (जलदुर्ग)
मालवणच्या समुद्रात शिवरायांनी बांधलेला हा एक अभेद्य जलदुर्ग आहे. समुद्रातील लाटांशी झुंज देत हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे. समुद्रमार्गे होडीने किल्ल्यावर जाण्याचा अनुभव रोमांचक असतो.तसेच समुद्राच्या मध्यभागी असूनही गडावरील विहिरींना 'गोड पाणी' लागते, हे स्थापत्यशास्त्राचे आश्चर्य आहे.
विशेष आकर्षण: किल्ल्याचे भक्कम प्रवेशद्वार, शिवरायांच्या हाताच्या आणि पायाच्या ठशांचे मंदिर आणि गोड्या पाण्याचे विहिरी , गडाचे मुख्य प्रवेशद्वार जे शोधूनही लवकर सापडत नाही.
पन्हाळगड (कोल्हापूरचा मानबिंदू)
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील महत्त्वाचा किल्ला आहे. 'पावनखिंडीचा लढा' आणि बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान या गडाशी जोडलेले आहे. हा गड पर्यटनासाठी अतिशय सोयीचा असून निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.
विशेष आकर्षण: तीन दरवाजा, सज्जा कोठी, धान्य साठवण्याचा अंबरखाना आणि बाजीप्रभूंचा पुतळा.

