Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सार्थ घोरकष्टोद्धारण स्तोत्र

सार्थ घोरकष्टोद्धारण स्तोत्र

सार्थ घोरकष्टोद्धारण स्तोत्र

या स्तोत्राचे फलित त्याच्या 'घोर + कष्ट + उद्धार' या नावामध्येच दडलेले आहे. मानवी जन्म हा पाप आणि पुण्याच्या मिश्रणातून मिळतो. या जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकलेल्या मानवाचे कष्ट आणि त्याची असहायता पाहून, परम दयाळू प.पू. श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये स्वामी) यांनी श्रीपाद श्रीवल्लभ (दत्त महाराज) यांच्या प्रेरणेने या स्तोत्राची रचना केली.

संसारिक अडचणींमुळे माणूस देवाकडे पूर्ण लक्ष देऊ शकत नाही. म्हणूनच, आधी व्यावहारिक संकटे दूर व्हावीत आणि नंतर ईश्वराची प्राप्ती व्हावी, हाच या स्तोत्राचा मुख्य हेतू आहे.

श्लोक १

श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव ।

श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव ॥

भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते ।

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥१॥

अर्थ: हे देवाधिदेवा, प.पू. श्रीपाद श्रीवल्लभा, हे दत्त महाराजा! मी तुम्हाला मनापासून शरण आलो आहे. तुम्ही केवळ भक्तांचा शुद्ध भाव पाहता (भावग्राह्य) आणि त्यांचे सर्व दुःख दूर करता. तुमची कीर्ती त्रिलोकात पसरलेली आहे. कृपया माझा भाव ओळखून माझे सर्व क्लेश (त्रास) दूर करा आणि या घोर संकटातून माझा उद्धार करा. तुम्हाला माझा नमस्कार असो.

श्लोक २

त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं ।

त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् ॥

त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते ।

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥

अर्थ: हे विश्वमूर्ते, हे प्रभो! तुम्हीच माझी माता, तुम्हीच माझे पिता, बंधू आणि स्वामी आहात. आमचे रक्षण करणारे आणि आमचा 'योगक्षेम' (गरजा व सांभाळ) पाहणारे सद्गुरू देखील तुम्हीच आहात. माझे सर्वस्व केवळ तुम्हीच आहात. म्हणूनच, या संसाररूपी भवसागराच्या घोर कष्टांतून मला बाहेर काढा. तुम्हाला माझा नमस्कार असो.

श्लोक ३

पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं ।

भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यम् ॥

त्रातारं नो वीक्षे ईशास्तजूर्ते ।

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥३॥

अर्थ: हे दत्तात्रेया! माझे पाप, त्रिविध ताप (आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक), शारीरिक आजार (व्याधी), मानसिक चिंता (आधी), गरिबी, भीती आणि सर्व क्लेश तुम्ही त्वरित नष्ट करा. या कठीण कलीकाळात तुमच्याशिवाय मला रक्षण करणारा दुसरा कोणीही दिसत नाही. कृपया या घोर कष्टातून मला सोडवा. तुम्हाला माझा नमस्कार असो.

श्लोक ४

नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता ।

त्वत्तो देवं त्वं शरण्योऽपहर्ता ॥

कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते ।

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥४॥

अर्थ: हे अत्रिनंदन (अत्री ऋषींचे पुत्र श्रीदत्त)! तुमच्याशिवाय मला वाचवणारा (त्राता), मला देणारा (दाता) आणि माझे पालनपोषण करणारा (भर्ता) दुसरा कोणीही नाही. तुम्ही शरणागताचे रक्षण करणारे आणि दुःखाचे हरण करणारे आहात. हे पूर्ण काम देवा, माझ्यावर तुमचा पूर्ण अनुग्रह (कृपा) करा आणि या घोर संकटातून माझी सुटका करा. तुम्हाला माझा नमस्कार असो.

श्लोक ५ (स्तोत्राचे मुख्य फलित)

धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं ।

सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ॥

भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते ।

घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥५॥

अर्थ: हे अखंड आनंदाचे प्रतीक असलेल्या दत्त महाराजा! माझ्या व्यावहारिक अडचणी दूर करा, जेणेकरून मला सद्धर्माची ओढ (प्रीती) लागेल, चांगली बुद्धी (सन्मती) मिळेल, ईश्वरभक्ती आणि सत्संगतीचा लाभ होईल. या शरीरात असेपर्यंत सर्व ऐहिक सुखे (भुक्ती) मिळून शेवटी मोक्ष (मुक्ती) मिळावा. म्हणजेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांसह 'भक्ती' या पाचव्या श्रेष्ठ पुरुषार्थाची मला प्राप्ती व्हावी. या घोर कष्टातून माझा उद्धार करा, तुम्हाला माझा नमस्कार असो.

फलश्रुती (श्लोक ६)

श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम् ।

प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥६॥

अर्थ: लोकांचे कल्याण आणि मंगल वाढवणार्‍या या पाच श्लोकांच्या स्तोत्राचे जो कोणी रोज (नियमपूर्वक) आणि भक्तीभावाने पठण करेल, तो भक्त प्रभू श्रीदत्तात्रेयांना अत्यंत प्रिय होतो.

इति श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं घोरकष्टोद्धरण स्तोत्रं सम्पूर्णम् ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Webduniya Marathi