Saturday, 13 Feb, 11.38 am WORLD मराठी न्यूज

होम
100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी

मुंबई - कोविड- 19 च्या परिस्थितीचा विचार करता यंदाची शिवजयंती 100 व्यक्‍तींच्या उपस्थितीत साजरी करावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. यावर्षी शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी, 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड - 19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे. दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम, रक्तदान शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे करोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी, असे सरकारच्या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: World Marathi
Top