होम
पाकिस्तान नरमले; नव्या भूमिकेचे भारताकडून स्वागत

नवी दिल्ली- भारताच्या तिबेट सीमेवर चीनने माघार घेण्यास सुरुवात केल्यानंतर पाकिस्ताननेही भारताबरोबर शांतता प्रस्थापित करण्याची भाषा सुरु केली आहे. पाकिस्तानच्या या भूमिकेचे भारताने स्वागत केले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डॉक्टर मोईद यूसुफ यांनी शांततेशिवाय सुरक्षित अर्थव्यवस्था शक्य नसल्याचे नमूद करत सर्वांसोबत शांततेचे संबंध हेच पंतप्रधान इम्रान खान यांचे लक्ष्य असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कायम भारताच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानची आता शांततेची आणि अर्थव्यवस्था सुरळीत करण्याची भाषा एक सकारात्मक घडामोड असल्याचे मानले जात आहे.
याआधी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनीही सर्वच क्षेत्रात मैत्रीचा हात देण्याची भूमिका मांडली होती. बाजवा म्हणाले होते, भारत आणि पाकिस्तानने जम्मू काश्मीरचा मुद्दा शांततेने सोडवला पाहिजे. भारत सरकारनेही जनरल बाजवा यांच्या भूमिकेचे स्वागत केले होते.
देशाच्या सीमांवर सध्याच्या घडीला सुरु असणारी परिस्थिती आणि एकंदर वातावरण पाहता लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी गुरुवारी देशाची आक्रमकता आणखी बळावण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. अमेरिकेतील सत्तांतर, चीनची माघार या गेल्या दिवसांतील घडमोडी जागतिक वातावरणात बदलाचे संकेत देत आहेत. भारताच्या विरोधात जर चीन माघार घेत असेल तर आपण जास्त धाडस करणे उपयोगाचे नाही अशी उपरती पाकिस्तानला झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेच संकेत या सगळ्यांतून मिळत आहेत.