Sunday, 21 Apr, 11.15 am महाराष्ट्र विश्व न्यूज

होम
मुलांच्या शैक्षणिक विकासासोबत मूल्य विकासासाठी स्नेहालय येथे प्रशिक्षण सुरू

महाराष्ट्र विश्व न्यूज, (अहमदनगर) - जिल्ह्यातील 'स्नेहालय इंग्लिश मेडीअम स्कूल' येथे मुलांच्या शैक्षणिक विकासासोबत मूल्य विकास व्हावा यासाठी प्रशिक्षण सुरू झाले आहे. यात मुख्यतः शिक्षकांसोबत काम करणे हा प्रमुख भाग असेल. हेच प्रशिक्षित शिक्षक पुढे मुलांसाठी विविध उपक्रम राबवतील. पुण्यातील 'व्होवेल्स ऑफ दि पीपल्स असोसिएशन' (वोपा) या संस्थेमार्फत हे प्रशिक्षण सुरु आहे.

हे प्रशिक्षण नगर जिल्ह्यातील स्नेहालय संस्थेत शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या 'स्नेहालय इंग्लिश मेडीअम स्कूल' या शैक्षणिक संस्थेतील शिक्षकांसाठी आहे. गेली अनेक वर्षे ही शाळा समाजातील अतिशय गरजू विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. शालेय शिक्षकांना प्रशिक्षित करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे हा या मागील मुख्य उद्देश्य आहे. पुढील तीन वर्षे महिन्यातून ४ दिवस असे हे शिक्षक प्रशिक्षण चालू राहील. या प्रशिक्षणात मुंबई येथील अध्ययन संस्थेचे श्री.वर्तक सर् तसेच लंडन येथील शिक्षणतज्ञ श्रीमती.सारा जोन्स यांचाही सक्रीय सहभाग असेल.

या प्रशिक्षणाविषयी बोलताना स्नेहालय संस्थेचे पदाधीकारी श्री.अनिल गावडे म्हणाले, ''कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण हा अतिशय महत्वाचा भाग असतो परंतु बहुतांश प्रशिक्षक हे पुणे मुंबई अशा शहरी भागात काम करतात. या भागात येऊन काम करण्यास हे प्रशिक्षक सहसा तयार नसतात किंवा त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही. या परिस्थितीत वोपा ही संस्था या भागात कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाचे महत्वाचे काम करत आहे ही अतिशय समाधानकारक व आशादायी बाब आहे. या प्रशिक्षणाची इतर संस्थानादेखील गरज आहे.'' या कामामध्ये प्रशिक्षक म्हणून प्रफुल्ल शशिकांत, अश्विन भोंडवे, आकाश भोर आणि ऋतुजा जेवे हे प्रामुख्याने सहभागी आहेत.

''या प्रशिक्षणातून तळागाळात काम करणारे शिक्षक आणि कार्यकर्ते प्रभावीपणे काम करण्यास तयार होतील. याचा उपयोग या भागातील अनेक विद्यार्थी आणि संबंधित घटकांना होईल. सकारात्मक बदलाच्या दिशेने उचललेले हे पाऊल असेच पुढे वाढत राहील'' असा विश्वास संस्थेचे एक संचालक प्रफुल्ल शशिकांत यांनी व्यक्त केला.

वोपा ही संस्था काय काम करते?

व्होवेल्स ऑफ दि पीपल्स असोसिएशन (वोपा) ही संस्था सामाजिक संस्थांच्या सक्षमीकरणाचे काम करत आहे. तसेच सामाजिक काम करू इच्छिणाऱ्या दुर्बल घटकातील तरुणांमध्ये वैचारिक स्पष्टता व संविधानिक मुल्ये यांची रुजवणूक करणे हा देखील संस्थेच्या कामाचा महत्वाचा भाग आहे. त्याबद्दल अधिक माहिती व्ही.ओ.पी.ए.डॉट.कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रशिक्षणाचे मुख्य वैशिष्ट्य

या प्रशिक्षणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सध्या असलेल्या शाळेच्या गरजा नेमकेपणाने शोधून त्यावर शास्त्रीय पद्धतीने काम करणे आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाबरोबर प्रशिक्षणार्थी सदस्यांना चर्चांमध्ये सहभागी करून घेणे. प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने शाळेचे व्यवस्थापन कसे असावे, मूल्यमापन पध्दती, प्रभावी पाठ नियोजन, मुलांना समजून घेणे, शिकण्याच्या व शिकवण्याच्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण पद्धती, कल्पकतेचे वास्तवात रुपांतर, लिंगभाव समजून घेणे, लोकशाही व संविधानिक मुल्यांचा शालेय शिक्षणाशी असलेला संबंध, बदलते जग आणि शिक्षकांपुढील आव्हाने, मानवी व संविधानिक मूल्यांचे महत्व इत्यादी विषयांचा समावेश आहे.

BKS Legal- भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेस कायद्याने कसे लढावे याबाबत कायदेतज्ञांचे मराठी मार्गदर्शनपर लेख वाचण्यासाठी क्लिक करा!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Vishva News
Top