
आळंदी : महान्यूज लाईव्ह
येथील ८ महिन्यापासून रिक्त असलेल्या आळंदी नगरपरिषद स्वीकृत सदस्य पदासाठी दाखल ९ अर्जा पैकी ५ अर्ज वैध तर ४ अर्ज अवैध ठरले.
वैध अर्जातील शिफारस पात्र उमेदवार ॲड. सचिन अनंतराव काळे यांची आळंदी नगरपरिषद स्वीकृत सदस्य पदी निवड झाल्याची घोषणा आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी वैजयंता उमरगेकर यांनी केली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे अखेरच्या दिवसाखेर मुदतीत नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व अर्ज छानणी साठी खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांचेकडे पाठविण्यात आले होते. छानणी नंतर अहवाल बुधवारी (दि.२७) आळंदी नगरपरिषदेस सुपूर्द करण्यात आला. या अहवालाचे ऑनलाइन सभेपुढे वचन करण्यात आले. यात वैध अर्ज ॲड. सचिन काळे, सुरेश तापकीर, वासुदेव तुर्की, संकेत वाघमारे, विशाल तापकीर यांचे अर्ज तर दत्तात्रय काळे, रेणुकादास पांचाळ, सचिन सोळंकर, किरण येळवंडे यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.
वैध, अवैध अर्ज सभेपूढे वचन करण्यात आल्यानंतर भाजपाचे गटनेते पांडुरंग वहिले यांनी पक्षीय धोरणा नुसार ॲड. सचिन काळे यांच्या नावाची शिफारस स्वीकृत सदस्य पदासाठी केली. यानंतर नगराध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी वैजयंता उमरगेकर यांनी आळंदी नगरपरिषद स्वीकृत सदस्य पदी ॲड. सचिन अनंतराव काळे यांच्या निवडीची घोषणा केली. ॲड. काळे यांच्या निवडीचे समर्थकांनी स्वागत केले. यावेळी नगरपरिषद सभागृहात नवनिर्वाचित स्वीकृत सदस्य ॲड. काळे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
आळंदी भाजपचे कार्याध्यक्ष दत्तात्रय काळे यांचा राजीनामा
दरम्यान आळंदी शहर भाजपचे कार्याध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी तडकाफडकी पक्षाच्या पदाचा राजीनामा पुणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांचेकडे पाठवीत नाराजी व्यक्त केली. येत्या तीन महिन्यात आळंदी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने अल्प कालावधीसाठी का होईना नगरपरिषद सदस्य होण्यासाठी आळंदीत निवड प्रक्रिया राबविण्यात आली. उमेदवारी अर्ज अवैध प्रकरणी शहरात प्रबळ दावेदारांचे अर्ज कसे काय अवैध ठरविले. यावर चर्चा रंगली. अनेक इच्छुकांनी आपले फॉर्म अवैध ठरविले प्रकरणी नाराजी व्यक्त केली.
भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे म्हणाले, या निवडी संदर्भात पक्ष संघटनेत एखादे नाव निश्चित करण्यापूर्वी चर्चा होण्याची गरज होती. सर्वांना विश्वासात घेवून निर्णय अपेक्षित होता. पक्षासाठी कार्य करून पक्ष वाढीसाठी काम करणार्या निष्ठावान पदाधिकारी यांना विश्वासात घेतले गेले नाही. येत्या काळात आळंदीत निवडणूक होणार असल्याने पक्षाने स्थानिक पदाधिकारी यांना विश्वासात न घेतल्यास पक्ष संघटना वाढीवर परिणाम होवू शकतो . याचा पक्षाने जरूर विचार करावा असे आवाहन शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी केले.