Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिक्षण उपसंचालक कार्यालयात लाच घेताना रंगेहात पकडले.

शिक्षण उपसंचालक कार्यालयात लाच घेताना रंगेहात पकडले.

मुंबई : मुंबईतील चर्नी रोड येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक राहुल विठ्ठल शिंदे याला दीड लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे एका नामांकित शिक्षण संकुल संस्थेत कार्यरत आहेत. त्यांच्या संस्थेच्या इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या वर्गांना मान्यता देण्याची फाईल चर्नी रोड येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात मंजुरीसाठी प्रलंबित होती. ही फाईल क्लिअर करून देण्यासाठी वरिष्ठ लिपिक राहुल शिंदे याने तक्रारदाराकडे १ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

संस्थेच्या नियमानुसार काम होणार असतानाही लाच मागितली गेल्याने, तक्रारदाराने लाच देण्यास नकार दिला. त्यांनी या भ्रष्टाचाराविरोधात १३ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील वरळी येथील एसीबी कार्यालयात रीतसर तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गोपनीय पद्धतीने या तक्रारीची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान वरिष्ठ लिपिक राहुल शिंदे याने फाईल पुढे सरकवण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर, एसीबीच्या पथकाने चर्नी रोड येथील कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, तक्रारदार जेव्हा लाचेची रक्कम दीड लाख रुपये घेऊन राहुल शिंदे याच्याकडे गेले, तेव्हा लाचेची रक्कम स्वीकारतानाच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने राहुल शिंदे याला रंगेहात पकडले. लाचखोर लिपिक राहुल विठ्ठल शिंदे याला ताब्यात घेण्यात आले आहे. शासकीय कार्यालयातील या कारवाईमुळे शिक्षण विभागातील लाचखोर अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka