ब्रोकोली ही एक पोषकतत्वांनी समृद्ध भाजी आहे. यामध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन के, फोलेट, फायबर, पोटॅशियम असतात. अनेकजण ब्रोकोलीचं सेवन डाएटद्वारे करतात. तिच्या सौम्य चवीमुळे आणि कुरकुरीत टेक्स्चरमुळे लहानपासून मोठ्यांपर्यंत हल्ली आहारात ब्रोकोलीचा समावेश करण्याचे प्रमाण वाढत आहे.
आज आपण ब्रोकोली सलाडशिवाय आणखी कोणत्या पद्धतीने खाऊ शकता यावर एक नजर टाकूया,
ब्रोकोली सूप
पावसाच्या दिवसांत गरमागरम ब्रोकोली सूप एक उत्तम पर्याय आहे. ब्रोकोली, कांदा, लसूण आणि थोडे दूध किंवा बटर एकत्र उकडून त्याची मिक्सरमध्ये प्युरी बनवा. त्यात काळीमिरी पूड आणि मीठ घालून उकळू द्या. हे सूप पचनासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
ब्रोकोली पराठा
गव्हाच्या पिठात ब्रोकोलीचा किस, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे आणि चवीनुसार मसाले घालून कणीक मळून पराठे लाटून घ्या. हा पराठा लहान मुलांच्या टिफिनसाठी उत्तम पर्याय ठरतो.
ब्रोकोली टिक्की
उकडलेले बटाटे, किसलेली ब्रोकोली, पनीर, हिरवी मिरची आणि चवीनुसार मसाले एकत्र करून टिक्कीचा आकार द्या. थोडे तेल लावून तव्यावर शॅलो फ्राय करा. पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत आनंद घ्या.
ब्रोकोली-पनीर भुर्जी
ब्रोकोली बारीक चिरून किंवा किसून घ्या. कढईत तेल, जिरे, कांदा, टोमॅटो आणि मसाले परतवून त्यात ब्रोकोली व किसलेले पनीर घाला. 5 मिनिटांत तयार होणारी ही भुर्जी चपाती किंवा पावासोबत नक्की खा.
स्टिर-फ्राय ब्रोकोली
डाएट करणाऱ्यांसाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. कढईत थोडे ऑलिव्ह ऑईल किंवा बटर घेऊन त्यात लसूण, ब्रोकोली, सिमला मिरची आणि पनीर परतून घ्या. वरून थोडे मीठ, काळीमिरी आणि चिली फ्लेक्स टाका.

