Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Health Watch | वाढती धडधड धोक्याची घंटा.

Health Watch | वाढती धडधड धोक्याची घंटा.

तनिषा जे. कुंदेन

चानक हृदयाचे ठोके वाढणे, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा अगदी बेशुद्ध पडणे यांसारख्या लक्षणांचे कारण अनेकदा ताणतणाव, चिंता किंवा पॅनिक अटॅक मानले जाते.

विशेषतः धावपळीच्या जीवनशैलीत आणि करिअरच्या दबावाखाली काम करणाऱ्या तरुणांमध्ये ही धारणा अधिक आढळते. मात्र, अशा घटना प्रत्यक्षात हृदयाच्या ठोक्यांतील गंभीर बिघाडाचे (अ‍ॅरिदमिया) संकेत असू शकतात. अनेकदा गंभीर प्रसंग घडेपर्यंत याचे निदान होत नाहीत, याकडे पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

२० ते ५० वयोगटातील तरुणांमध्ये हृदयाच्या ठोक्यांतील अनियमिततेचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत हृदयाची धडधड जाणवणे, कारण नसताना बेशुद्ध पडणे, अनियमित हृदयस्पंदने आणि अ‍ॅरिदमियाशी संबंधित इतर लक्षणे घेऊन येणाऱ्या तरुण रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बैठी जीवनशैली, सततचा ताण, अपुरी झोप, वाढता लठ्ठपणा, एनर्जी ड्रिंक्सचे अति सेवन, धूम्रपान, व्हेपिंग आणि अमली पदार्थांचे सेवन ही या वाढत्या समस्येमागील प्रमुख कारणे असल्याचे हृदयरोगतज्ज्ञांचे मत आहे.

जीवनशैलीशी संबंधित हृदयविकार वाढत असताना आणि हृदयविकाराचा झटका तरुणांमध्येही अधिक प्रमाणात दिसून येत असताना, अ‍ॅरिदमिया म्हणजेच हृदयाच्या असामान्य ठोक्यांबाबत जागरूकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात. चिंता हे धडधडीचे एक सामान्य कारण असले तरी तपासणी न करता लक्षणांकडे वारंवार दुर्लक्ष करणे काही वेळा जीवघेणे ठरू शकते.

Health Watch | सतत थकवा, विस्मरणाकडे दुर्लक्ष नको; ब्रेन ट्यूमरच्या सामान्य लक्षणांबाबत पुण्यातील तज्ज्ञांचा युवकांना सावधगिरीचा इशारा…

हृदयाच्या ठोक्यांतील बिघाडाचे निदान करण्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्याची लक्षणे अनेकदा चिंतेच्या लक्षणांसारखीच दिसतात. पॅनिक अटॅक दरम्यान शरीरातील "फाइट-ऑर-फ्लाइट" प्रतिक्रिया सक्रिय होते आणि अॅड्रेनालिनसारखे ताण निर्माण करणारे हार्मोन्स स्रवतात. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढणे, घाम येणे, छातीत जडपणा जाणवणे, श्वास लागणे आणि भीतीची भावना निर्माण होते.

परंतु अ‍ॅरिदमियामध्ये हृदयाच्या विद्युत प्रणालीत बिघाड होतो. त्यामुळे हृदय खूप वेगाने, खूप मंद गतीने किंवा अनियमित पद्धतीने धडधडू लागते. याबाबत अधिक माहितीसाठी 'सीविक मिरर'ने संपर्क साधला असता पुण्यातील एका नामांकित रुग्णालयातील वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अन्नपूर्णा कालिया म्हणाल्या, "हृदयाची धडधड, चक्कर येणे, श्वास लागणे किंवा बेशुद्ध पडणे ही लक्षणे विशेषतः तरुणांमध्ये अनेकदा चिंतेशी जोडली जातात. मात्र, ही लक्षणे वारंवार होत असतील, शारीरिक हालचालीदरम्यान दिसत असतील किंवा कारण नसताना बेशुद्ध पडत असेल, तर ते हृदयाच्या ठोक्यांतील बिघाडाचे संकेत असू शकतात. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. वेळेत तपासणी केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते."

पॅल्पिटेशन म्हणजे नेमके काय?

डॉक्टरांच्या मते, स्वतःच्या हृदयाचे ठोके स्पष्टपणे आणि अस्वस्थपणे जाणवणे याला 'पॅल्पिटेशन' म्हणतात. ताणतणाव किंवा उत्साहाच्या क्षणी हृदयाचे ठोके वाढल्याचे जाणवणे सामान्य असले तरी वारंवार होणाऱ्या किंवा सतत जाणवणाऱ्या धडधडीकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

"पॅल्पिटेशन हे सर्वाधिक गैरसमज निर्माण करणाऱ्या हृदयाशी संबंधित लक्षणांपैकी एक आहे. अनेकांना हृदयाचे ठोके वेगाने जाणवले की ते लगेच चिंता असल्याचे समजतात. प्रत्यक्षात ते हृदयाच्या ठोक्यांतील बिघाडाचे लक्षण असू शकते. हृदयाचे ठोके अत्यंत वेगाने, अनियमित किंवा कधीकधी अत्यंत मंद होऊ शकतात. हृदयगती प्रति मिनिट २०० पेक्षा जास्त किंवा ४० पेक्षा कमी असेल आणि त्यासोबत चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे अशी लक्षणे असतील, तर ती वैद्यकीय आणीबाणी मानली पाहिजे,'' असे बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाचे हृदयविकार विभागप्रमुख व इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट डॉ. हेमंत कोकणे यांनी सांगितले.

Health Watch | 'रेड लाईट थेरपी' तरुण त्वचेसाठी जादू? पुणेकरांमध्ये वाढती क्रेझ…

कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?

डॉक्टरांच्या मते, खालील लक्षणे दिसल्यास ती साधी चिंता नसून अ‍ॅरिदमियाची शक्यता दर्शवू शकतात :

* कोणतेही स्पष्ट कारण नसताना अचानक हृदयाची धडधड वाढणे
* वारंवार पॅल्पिटेशन होणे
* चक्कर येणे किंवा डोळ्यांसमोर अंधारी येणे
* बेशुद्ध पडण्याच्या जवळ जाण्याचे प्रसंग
* कारण नसताना बेशुद्ध पडणे
* व्यायाम किंवा शारीरिक श्रम करताना लक्षणे दिसणे
* अत्यंत वेगवान आणि अनियमित हृदयस्पंदने

यापैकी कारण नसताना बेशुद्ध पडणे हे विशेषतः गंभीर लक्षण मानले जाते. डॉ. कोकणे म्हणाले, "स्पष्ट कारण नसताना बेशुद्ध पडणे म्हणजे हृदयाच्या असामान्य ठोक्यांमुळे मेंदूपर्यंत पुरेसा रक्तपुरवठा तात्पुरता थांबला असू शकतो. काही वेळा हे जीवघेण्या प्रसंगापूर्वी मिळणारे एकमेव इशारा ठरू शकते."

निरोगी दिसणाऱ्या व्यक्तींमध्येही लपलेला असू शकतो विकार

धमनींमध्ये अडथळे निर्माण होऊन होणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यांपेक्षा काही अ‍ॅरिदमिया अशा व्यक्तींमध्ये आढळतात ज्यांचे हृदय तपासणीत पूर्णपणे सामान्य दिसते. काही आनुवंशिक विकार हृदयाच्या केवळ विद्युत प्रणालीवर परिणाम करतात. लाँग क्यूटी सिंड्रोम, ब्रुगाडा सिंड्रोम आणि कॅटेकोलामिनर्जिक पॉलिमॉर्फिक व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया यांसारखे विकार अनेक वर्षे कोणतीही लक्षणे न दाखवता राहू शकतात.

भावनिक ताण, तीव्र व्यायाम, शरीरातील पाण्याची कमतरता, ताप, व्हायरल संसर्ग किंवा झोपेची तीव्र कमतरता यावेळीच हे विकार अचानक समोर येऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक हृदयक्रिया बंद पडण्याची शक्यता असते. "हृदयाची विद्युत क्रिया ही सोडियम, पोटॅशियम आणि इतर आयन चॅनेल्सच्या नाजूक संतुलनावर अवलंबून असते. या मार्गांमधील अगदी किरकोळ बिघाडामुळेही हृदयाची रचना सामान्य असतानाही गंभीर ठोक्यांचे विकार उद्भवू शकतात," याकडे डॉ. कोकणे यांनी लक्ष वेधले.

जीवनशैलीमुळे वाढणारा धोका

तज्ज्ञांच्या मते, आधुनिक जीवनशैलीतील काही सवयी तरुणांमधील अ‍ॅरिदमियाचे प्रमाण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत. खालील सर्व गोष्टी संवेदनशील व्यक्तींमध्ये हृदयाच्या ठोक्यांतील बिघाडाला कारणीभूत ठरू शकतात.

* कॅफीनचे अति सेवन
* एनर्जी ड्रिंक्स
* व्हेपिंग
* मद्यपान
* अमली पदार्थांचे सेवन
* सततचा ताण
* अपुरी झोप
* शरीरातील पाण्याची कमतरता

तिमिराकडून तेजाकडे : नेत्रदानाची गरज आणि महत्त्व…

'फॅमिली हिस्ट्री' महत्त्वाची

हृदयरोगतज्ज्ञांच्या मते, कौटुंबिक इतिहासाकडे कधीही दुर्लक्ष करू नये. ५० वर्षांपूर्वी अचानक आणि अनाकलनीय मृत्यू, कारण नसताना बुडून मृत्यू होणे, झोपेत मृत्यू होणे, कुटुंबातील सदस्यांमध्ये वारंवार बेशुद्ध पडण्याच्या घटना किंवा आनुवंशिक अ‍ॅरिदमिया सिंड्रोमचा इतिहास असल्यास त्यामागे आनुवंशिक कारण असू शकते. अशा कौटुंबिक इतिहास असलेल्या व्यक्तींनी अगदी सौम्य लक्षणे असली तरी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

स्मार्ट वॉच उपयुक्त, पण पुरेशी नाही

स्मार्टवॉच आणि वेअरेबल हेल्थ डिव्हाइसेसच्या वाढत्या वापरामुळे अनेकांना हृदयाच्या असामान्य ठोक्यांचा लवकर शोध घेणे शक्य झाले आहे. मात्र, तज्ज्ञांचा इशारा आहे की ही उपकरणे वैद्यकीय तपासणीची जागा घेऊ शकत नाहीत. डॉ. कालिया म्हणाल्या, "वेअरेबल उपकरणे काही महत्त्वाचे संकेत देऊ शकतात, परंतु ती केवळ प्राथमिक तपासणीची साधने आहेत. कारण नसताना बेशुद्ध पडणे, वारंवार धडधड होणे, चक्कर येणे किंवा व्यायामादरम्यान लक्षणे दिसणे यांसारख्या समस्यांची डॉक्टरांकडून सखोल तपासणी होणे आवश्यक आहे."

वेळेत निदान म्हणजे जीव वाचवणे

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हृदयाचे प्रत्येक वाढलेले ठोके हे ताणतणावामुळेच होतात असे नाही. पॅनिक अटॅक सामान्य असले तरी वारंवार होणाऱ्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये.

डॉ. कालिया म्हणाल्या, "हृदयाच्या ठोक्यांतील अनेक विकार वेळेत निदान झाल्यास प्रभावीपणे उपचार करता येतात. योग्य वेळी निदान केल्याने केवळ रुग्णाचे संरक्षण होत नाही, तर जोखमीच्या कुटुंबीयांचीही तपासणी करून त्यांना प्रतिबंधात्मक उपचार देता येतात."

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror