जागतिक नेत्रदान दिनविशेष : नेत्रदान काळाजी गरज, लोक स्वतःहून पुढे येऊन नेत्रदान करत नाहीत, तोपर्यंत अंध व्यक्तींना दृष्टी मिळणे अशक्य
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, असे आपण लहानपणापासून वाचत आलोत… ऐकत आलोत.
काळ बदलला तसतशी दानाची व्याख्यासुद्धा बदलली. नव्वदीच्या दशकात विश्वसुंदरी ऐश्वर्या रायने केलेल्या जाहिरातीनंतर नेत्रदानाची खरी गरज लोकांच्या लक्षात येऊ लागली. किंबहुना नेत्रदान करता येते, हे लोकांना कळू लागले. सध्या नेत्रदानाच्या एक पाऊल पुढे जात अवयवदानाची संकल्पना पुढे येऊ लागली आहे. मात्र अवयवदानाला अनेक मर्यादा आहेत. एखादा रूग्ण ब्रेनडेड अवस्थेत असेल तर अवयवदान करता येते. मात्र नेत्रदान आणि त्वचादान हे एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतरही करता येते. दरवर्षी १० जून हा दिवस 'जागतिक नेत्रदान दिन' म्हणून साजरा केला जातो.
नेत्रदानाची गरज आणि महत्त्व
अंधत्वाचे अनेक प्रकार असतात, त्यापैकी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे 'कॉर्नियल अंधत्व' (पारपटलाचा दोष). जेव्हा डोळ्याचा बाहेरील पारदर्शक भाग (काॅर्निया / बाहुली) इजा, आजार, कुपोषण किंवा संसर्गामुळे खराब किंवा पांढरा होतो, तेव्हा माणसाला दिसणे बंद होते. या प्रकारच्या अंधत्वावर कोणतीही औषधे नाहीत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरी मानवी डोळा किंवा त्याचा कॉर्निया प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. तो केवळ एका मानवाकडून दुसऱ्या मानवालाच दिला जाऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत लोक स्वतःहून पुढे येऊन नेत्रदान करत नाहीत, तोपर्यंत अंध व्यक्तींना दृष्टी मिळणे अशक्य आहे. अंध व्यक्तीमध्ये फक्त वृद्धच नाही तर लहान बालके, विद्यार्थी, तरूण व्यक्तीसुद्धा आहेत. एखाद्या मुलाला शाळेत किंवा कुठे खेळताना डोळ्याला इजा झाली किंवा एखाद्या तरूण / तरुणीची अपघातानंतर दृष्टी गेली किंवा आजारपणामुळे मध्यमवर्गीय व्यक्तीला दिसेनासे झाले तर त्या व्यक्तीचे आणि त्याच्या परिवाराचे काय होत असेल? त्यामुळे अशा रूग्णांसाठी 'कॉर्निया ट्रान्सप्लांट' म्हणजे नेत्रपटल रोपण हाच एकमेव मार्ग उरतो. ज्यासाठी मृत व्यक्तीच्याच डोळ्यांची गरज असते.
Health Watch : कडक उन्हाची डोळ्यांना झळ…
मागणी विरुद्ध पुरवठा : दरी अजूनही कायम
भारतात कॉर्नियल अंधत्व ही एक मोठी समस्या आहे. एका सर्वेक्षणानुसार, भारतात कॉर्नियल अंधत्वाचा सामना करणाऱ्या रुग्णांची, विशेषतः लहान मुलांची आणि तरुणांची संख्या लाखोंच्या घरात आहे. दरवर्षी हजारो नवीन रुग्णांची यात भर पडते. दुर्दैवाने, जेवढी डोळ्यांची मागणी आहे, त्या तुलनेत नेत्रदान करणाऱ्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. ही दरी भरून काढण्यासाठी नेत्रदानाची प्रचंड गरज आहे. एका अंदाजानुसार भारतात दरवर्षी सुमारे अडीच लाख कॉर्निया प्रत्यारोपणाची गरज आहे मात्र त्या तुलनेत वर्षाला साधारण ५५ हजार कॉर्निया संकलित केले जातात.आपला शेजारी देश श्रीलंकेत त्यांच्या गरजेच्या दीडपट जास्त कॉर्निया उपलब्ध आहेत. मात्र अनेक वैद्यकीय नियमांमुळे आपण ते उपलब्ध कॉर्निया देशात मागवू शकत नसल्याची माहिती पुण्यातले नेत्रशल्यविशारद डॉ. मंदार परांजपे यांनी 'सीविक मिरर'ला दिली.
अनेकजण नेत्रदानासाठी अर्ज करतात, मात्र नातेवाईकांना सांगत नाही. त्यामुळे त्यांची इच्छा असूनही त्यांना मरणोत्तर नेत्रदान करता येत नाही. सुरूवातीला भित्तीपत्रांच्या माध्यमातून जनजागृती केली होती. मात्र आता सोशल मीडियाचे युग आहे. त्यामुळे रील्सच्या माध्यमातून जनजागृती केली तर जास्त फायदा होऊ शकेल.
- डॉ. दीपक सावंत, माजी आरोग्यमंत्री, महाराष्ट्र
रूग्णांना कॉर्निया न मिळण्याची कारणे…
नेत्रदान होऊनही कॉर्निया रुग्णांपर्यंत न पोहोचण्यामागे अनेक तांत्रिक आणि व्यवस्थापकीय त्रुटी आहेत.
वेळेची मर्यादा : व्यक्तीच्या मृत्यूनंतर ४ ते ६ तासांच्या आत कॉर्निया काढून घेणे आवश्यक असते. अनेकदा नातेवाईक निर्णय घेईपर्यंत किंवा आय बँकेची टीम पोहोचेपर्यंत उशीर होतो. त्यामुळे उशिरा काढलेले कॉर्निया प्रत्यारोपणासाठी निकामी ठरतात.
मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यात होणारा वेळ : अनेकदा मृत्यूनंतर नेत्रपेढीची टीम नेत्रपटल काढून घेण्यासाठी पोहोचलेली असते मात्र मृतव्यक्तीचं डेथ सर्टिफिकेट मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे नेत्रपटल काढण्यात अडचणी येऊ शकतात.
नेत्रपटलांचा दर्जा : मृत व्यक्तीचे वय जास्त असेल किंवा त्यांना कोणता नेत्रविकार अथवा गंभीर आजार (कर्करोग किंवा इतर संसर्गजन्य आजार) असेल, तर ते कॉर्निया प्रत्यारोपणासाठी योग्य मानली जात नाहीत.
कोल्ड चेन आणि पायाभूत सुविधांचा अभाव : संकलित केलेले डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष प्रकारच्या सोल्युशनची आणि कोल्ड स्टोरेजची गरज असते. ग्रामीण किंवा निमशहरी भागात अशा सुविधा नसल्यामुळे कॉर्निया खराब होतात. पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या शहरांमध्ये १० ते १२ नेत्रपेढ्या आहेत. मात्र पुण्याच्या ग्रामीण भागात एकही नेत्रपेढी नाही. त्यामुळे ग्रामीण भागातल्या व्यक्तीला नेत्रदान करायचं असेल किंवा त्याला डोळ्यांची गरज असेल तर ते मिळण्यात अडचण येऊ शकते.
अयोग्य व्यवस्थापन आणि समन्वयाचा अभाव : नेत्रपेढ्या, रुग्णालये आणि प्रतीक्षा यादीत असलेले रुग्ण यांच्यात अनेकदा समन्वयाचा अभाव दिसून येतो. अनेकदा कॉर्निया उपलब्ध असतो, पण योग्य वेळेत योग्य रुग्ण न मिळाल्यामुळे तो कॉर्निया फेकून द्यावा लागतो कारण नेत्रदानानंतर कॉर्निया फक्त ७ ते १४ दिवसच टिकू शकतो.
कॉर्निया वाया जाण्याचे प्रमाण झाले कमी
सुरूवातीला विविध कारणांमुळे देशात कॉर्निया फुकट जाण्याचे प्रमाण ३० ते ३५ टक्क्यांच्या आसपास होते. मात्र आता हे प्रमाण कमी झाल्याची माहिती डॉ. मंदार परांजपे यांनी दिली. ''नेत्रपटल चांगले आहे की नाही हे स्पेक्युलर मायक्रोस्कोपीद्वारे तपासता येते. मात्र जोपर्यंत नेत्रपटल काढून ते मायक्रोस्कोप मध्ये तपासले जात नाही तोपर्यंत त्याचा दर्जा कळत नाही. याशिवाय तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे कॉ़र्निया वाया जाण्याचे प्रमाण कमी झाले. सुरूवातीला पूर्ण नेत्रपटल बदलावे लागत होते. आता नेत्रपटलाचे सातपैकी एखादा थर खराब असेल तरीही बाकीचे थर वापरता येऊ शकतात,'' असेही त्यांनी सांगितले.
नेत्रदान करताना घ्यायची काळजी
· मृत्यूनंतर शक्यतो ४ ते ६ तासांच्या आत नेत्रदानाची प्रक्रिया सुरू करावी.
· मृत व्यक्तीचे डोळे हलकेच बंद करावेत. ते दाबू नयेत किंवा त्यात कोणतेही ड्रॉप्स टाकू नयेत.
· पंख्याचा वारा थेट चेहऱ्यावर लागू देऊ नये, डोळ्यांवर स्वच्छ आणि ओलसर कापड ठेवावे. त्यामुळे कॉर्निया कोरडा पडत नाही.
· त्वरित जवळच्या आय बँकेशी किंवा नेत्रदान संस्थेशी संपर्क साधावा.
· मृत व्यक्तीचे वैद्यकीय तपशील उपलब्ध ठेवावे, जेणेकरून नेत्रदान पथकाला मदत होईल.
नेत्रदात्यांची संख्या वाढवण्यासाठी…
* हॉस्पिटल कॉर्नियल रिट्रीव्हल प्रोग्राम : केवळ घरी जाऊन डोळे गोळा करण्यापेक्षा, रुग्णालयांमध्ये होणाऱ्या मृत्यूंनंतर नातेवाईकांचे समुपदेशन करून तत्काळ दर्जेदार कॉर्निया मिळवणे अधिक फायदेशीर ठरते. यामुळे वेळेची बचत होते आणि कॉर्नियाचा दर्जा चांगला राहतो.
* आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण : आय बँकांचं डिजिटलायझेशन करून थेट 'सेंट्रलाइज्ड वेटिंग लिस्ट' तयार करायला हवी जेणेकरून कॉर्निया उपलब्ध होताच गरजू रुग्णाला तत्काळ तो देता येईल
* गुणवत्ता तपासणीवर भर : केवळ संख्या वाढवण्यापेक्षा दर्जेदार आणि निकोप कॉर्निया संकलित करण्यावर भर दिला पाहिजे. जेणेकरून कॉर्निया फुकट जाण्याचे प्रमाण कमी होईल आणि मृताच्या नातेवाईकांनासुद्धा समाधान मिळेल.

