Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pimpri-Chinchwad : नेहरूनगर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम हवेतच..

Pimpri-Chinchwad : नेहरूनगर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम हवेतच..

नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमचा सत्ताधाऱ्यांना विसर; आठ वर्षे झाली, तरी अद्याप एक वीटही नाही रचली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार स्व. अण्णासाहेब मगर यांच्या स्मृती जतन करण्यात महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना पूर्णपणे अपयश आले आहे.

शहरातील नेहरुनगर येथील स्व. अण्णासाहेब मगर यांच्या नावाने उभारलेले एकमेव स्टेडियम पाडून तब्बल आठ वर्षे उलटली, तरी अद्याप नव्या स्टेडियमची एक वीटही रचली गेलेली नाही. पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि उदासीनतेमुळे क्रीडा प्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नेहरुनगर परिसरातील अण्णासाहेब मगर स्टेडियम हे शहरातील खेळाडूंसाठी हक्काचे मैदान होते. अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू या मैदानाने शहराला दिले. मात्र, २०१६-१७ च्या सुमारास हे स्टेडियम धोकादायक झाल्याचे कारण पुढे करत महापालिकेने ते घाईघाईने पाडून टाकले. खेळाडूंच्या सुरक्षेचा हवाला देत, त्याच जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य आणि अद्ययावत स्टेडियम उभारले जाईल, असे आश्वासन तत्कालीन सत्ताधारी भाजपने दिले होते. मात्र, हे आश्वासन केवळ कागदावरच राहिले असून, प्रत्यक्षात मात्र हे स्टेडियम कचरा आणि झाडाझुडपांच्या विळख्यात सापडले आहे.

अण्णासाहेब मगर यांनी पिंपरी-चिंचवडचा पाया रचला. अशा थोर नेत्याच्या नावाने असलेली शहरातील एकमेव वास्तू नष्ट करून तिला पुनरुज्जीवित न करणे, हा एक प्रकारे त्यांच्या स्मृतींचा अपमानच आहे. महापालिकेला इतर अनेक कोट्यवधींच्या विकासकामांसाठी, नवीन प्रशासकीय भवनांच्या कोट्यवधींच्या निविदांसाठी वेळ आणि पैसा मिळतो, मग शहराच्या शिल्पकाराच्या नावाने असलेल्या स्टेडियमचा विसर पालिकेला कसा पडला? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.

या स्टेडियममध्ये धावपट्टी, इनडोअर गेम्स आणि विविध खेळांच्या सरावाची सोय होती. स्टेडियम पाडल्यामुळे भोसरी, पिंपरी, चिंचवड आणि नेहरुनगर परिसरातील हजारो तरुण खेळाडूंचे मोठे नुकसान झाले आहे. सरावासाठी मैदानच उपलब्ध नसल्याने अनेक होतकरू खेळाडूंना क्रीडा सराव करण्यास अडथळा येवू लागला आहे. तर काहींची महागडी खाजगी वाहने मैदानांचा आसरा घेत आहे. एकीककडे महापालिका 'स्मार्ट सिटी'चा टेंभा मिरवरते मात्र, दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये खेळाडूंना मात्र सरावासाठी वणवण भटकावे लागते, अशी सध्याची परिस्थिती आहे.

Italy : हिंसक आंदोलनप्रकरणी दंगलखोरांवर मेलोनींचा 'हंटर'…

स्टेडियम पाडल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, तब्बल आठ वर्षांचा प्रदीर्घ काळ उलटूनही महापालिकेला या कामाचा मुहूर्त सापडलेला नाही. सत्ताधारी भाजप आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने स्टेडियमचा पुनर्विकास आराखडा केवळ लालफितीत अडकून पडला आहे. पालिका दरवर्षी अंदाजपत्रकात क्रीडा क्षेत्रासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करते, मग या ऐतिहासिक स्टेडियमसाठी निधी का उपलब्ध होत नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

अण्णासाहेब मगर स्टेडियम हे पिंपरी-चिंचवडमधील पहिले आणि खेळाडूंचे हक्काचे मैदान होते. हे स्टेडियम पाडल्यानंतर खेळाडूंची राहण्याची सोय असणारे हॉस्टेल आणि आधुनिक क्रीडा सुविधा देण्याचे जाहीर केले होते. मात्र, वर्षानुवर्षे फक्त घोषणा केल्या जात आहेत, प्रत्यक्षात मात्र काम शून्य आहे. राजकीय श्रेयवाद आणि प्रशासनाच्या सुस्तीमुळे आमच्या नवोदित खेळाडूंचे भवितव्य अंधारात ढकलले गेले आहे.
- अरविंद भोसले, सीए, क्रीडाप्रेमी नागरिक

दरम्यान, नेहरुनगर आणि परिसरातील क्रीडाप्रेमी, नागरिक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा संयम आता सुटत चालला आहे. शहराच्या वैभवशाली क्रीडा परंपरेची महापालिकेने दुरवस्था केली आहे. जर आगामी काही महिन्यांत स्व. अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली नाही, तर महापालिका भवनासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक क्रीडा मंडळांनी आणि संतप्त नागरिकांनी दिला आहे. या संदर्भात महापालिकेचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी आणि क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

शहरात गुणवत्ता असलेल्या खेळाडूंची कमतरता नाही, पण त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा मिळत नाहीत. स्टेडियम वेळेत झाले असते तर आज इथले अनेक खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम होणार म्हणून खेळाडू खूप खूश होते. चांगल्या खेळपट्ट्या, धावपट्टी आणि सरावासाठी आधुनिक सुविधा मिळतील, अशी आशा होती. पण दरवेळीप्रमाणे हे आश्वासनही फक्त कागदावरच राहिले. आमच्या हक्काच्या मैदानासाठी आम्ही अजून किती वाट पाहायची?
- विजय जगदाळे, क्रीडा प्रशिक्षक, किक्रेट

राजकीय पक्षांची केवळ पोकळ आश्वासनांची खैरात

महापालिका असो की विधानसभा निवडणुका आल्या की सर्वच राजकीय पक्षांकडून क्रीडा क्षेत्राच्या विकासाच्या गप्पा मारल्या जातात. मात्र, निवडणूक संपली की लोकप्रतिनिधींना या मैदानाची आठवण राहत नाही. महापालिका प्रशासनही केवळ "प्रक्रिया सुरू आहे", "टेंडर काढले जाईल", "नकाशा मंजूर होत आहे" अशी तांत्रिक कारणे पुढे करून गेल्या आठ वर्षांपासून नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकत आहे.

२६ एकर जागा उपलब्ध असूनही जर प्रशासन तिथे काही करू शकत नसेल, तर हा निव्वळ राजकीय स्टंट होता असेच म्हणावे लागेल. निवडणुकीच्या काळात मोठे मोठे बोर्ड लावले जातात आणि नंतर त्या जागेवर फक्त गवत वाढते. एवढी मोठी जागा मोकळी पडून राहिल्यामुळे तिथे आता कचरा टाकला जात आहे. बेकायदेशीर कामे सुरू होण्याची भीती आहे. स्टेडियम बनवायचे नसेल, तर किमान सर्वसामान्य जनतेसाठी एक चांगले उद्यान किंवा खेळाचे मैदान तरी विकसित करावे.
-अॅड, अशोक धायगुडे, सामाजिक कार्यकर्ते

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियमचे आश्वासन हवेतच

नेहरुनगर परिसरातील अण्णासाहेब मगर स्टेडियम हे शहरातील खेळाडूंसाठी हक्काचे मैदान होते. मात्र, २०१६-१७ च्या सुमारास हे स्टेडियम धोकादायक झाल्याचे कारण पुढे करत महापालिकेने ते घाईघाईने पाडून टाकले. खेळाडूंच्या सुरक्षेचा हवाला देत, याच २६ एकर जागेवर 'डेक्कन जिमखाना'च्या धर्तीवर अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारले जाईल, असे मोठे आश्वासन स्थानिक आमदार महेश लांडगे आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र, आमदार आणि महापालिका प्रशासनाने दिलेले हे आश्वासन केवळ कागदावरच राहिले असून प्रत्यक्षात तिथे फक्त कचरा आणि झाडीझुडपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror