महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी कपात रद्द करण्याची सूचना; पाटबंधारे खात्याचा विषय असल्याचे सांगत प्रशासनाने झटकले हात
पिंपरी : शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे.
शहराला सध्यस्थितीत दिवसाआड पाणी पुरवठा सुरु असताना त्यात १५ टक्के पाणीकपात सुरुच आहेत. तसेच पवना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्येही १५ टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. ही पाणी कपात रद्द करून पूर्ण क्षमतेने पाणी द्यावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी केली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यासोबत सत्ताधारी व विरोधक पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (दि.२७) बैठक देखील पार पडली. यावेळी पाणी कपात रद्द करावी, असा सूचना महापौर रवी लांडगेसह सर्व पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र, पाणीपुरवठा विभागाने पाणीकपात रद्द करण्यास नकार दिला असून, ही बाब पाटबंधारे खात्याच्या अखत्यारित असल्याचे कळवत हात वर केले आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी तोंडावर पडल्याचे दिसत आहेत.
Make Civic Mirror My Trusted Source
शहरामध्ये १९ जूनपासून १५ टक्के पाणीकपात करण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणी सोडण्याच्या वेळा बदलल्या आहेत. परिणामी शहरातील अनेक भागांतील नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही. अनेक ठिकाणी गढूळ, गाळमिश्रित तसेच कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे सोसायट्यांना टँकरवर लाखो रुपयांचा खर्च करावा लागत आहे.
शहरातील पाणीकपात रद्द करण्यासंदर्भात आयुक्तांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे आय़ुक्त हे संबंधित जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन तत्काळ निर्णय घेतील.
-रवी लांडगे, महापौर
पवना धरण शंभर टक्के भरलेले असतानाही शहरामध्ये पाण्याची बोंब असल्याचे चित्र आहे. यावरून सर्वसाधारण सभेत विरोधकांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर टीका केली. धरण भरलेले असतानाही १५ टक्के पाणीकपात का? असा सवाल उपस्थित केला. तर दूषित पाण्यावरून देखील प्रशासनाला जाब विचारला. त्यावर बाजू सावरून नेण्यासाठी सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी आयुक्तांसोबत बैठक घेत मंगळवारी (दि. २८) याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. तर आता पाणीकपात रद्द करून शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करा असे निर्देश प्रशासनाला दिले.
शहरातील पाणीकपातीबाबत आयुक्तांसोबत बैठक झाली. ही बाब पाटबंधारे विभागाशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पाणीकपात अजून तरी कायम राहणार आहे. मात्र, आयुक्तांनी पाटबंधारे विभागाशी याबाबत सकारात्मक चर्चा करून लवकर कपात रद्द करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.
- प्रशांत शितोळे, सत्तारुढ पक्षनेते
सत्ताधाऱ्यांच्या आदेशाला प्रशासनाचा ठेंगा
मंगळवारी (दि. २८) आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापौर लांडगे, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत १५ टक्के पाणीकपात मागे घेण्यास आयुक्तांनी नकार दिला. तसेच ही बाब पाटबंधारे विभागाशी संबंधित आहे. पाटंबधारे विभागाने पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका यामध्ये काही करू शकत नसल्याचे सांगितले. परिणामी, सत्ताधारी भाजपने दिलेल्या आदेशालाच प्रशासनाने ठेंगा दाखवला असून, शहरात पाणीकपात कायम राहणार असल्याचे स्पष्ट आहे.

