आजच्या डिजिटल युगात शाळेतील प्रत्येक उपक्रमाचे छायाचित्र, व्हिडीओ आणि त्यावर आकर्षक कॅप्शन सोशल मीडियावर झळकणे ही जणू शिक्षण व्यवस्थेची नवी गरज बनली आहे. मुलांनी एखादा प्रयोग केला, वृक्षारोपण केले, सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला किंवा एखादी कृती केली की त्याचा कॅमेरा आधी सुरू होतो आणि शिक्षण नंतर.
प्रसिद्धीचा हा हव्यास पाहता एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे हे उपक्रम मुलांच्या शिकण्यासाठी आहेत की शाळेचे प्रदर्शन करण्यासाठी?
शाळांनी आपल्या उपक्रमांची माहिती पालकांपर्यंत पोहोचवणे, विद्यार्थ्यांच्या कामगिरीची झलक दाखवणे किंवा शैक्षणिक प्रयोगांची नोंद ठेवणे यात गैर काहीच नाही. उलट योग्य पद्धतीने सोशल मीडिया वापरला तर तो शाळा आणि पालकांमधील संवादाचे प्रभावी माध्यम ठरू शकतो. मात्र सोशल मीडिया पोस्ट हीच उपक्रमाची अंतिम कसोटी बनते तेव्हा शिक्षणाचा गाभाच धोक्यात येतो. आज अनेक शाळांच्या सोशल मीडिया पेजकडे पाहिले तर रंगीबेरंगी कार्यक्रम, हसतमुख मुले, आकर्षक सजावट आणि व्यवस्थित रेकॉर्ड केलेले व्हिडिओ यांची रेलचेल दिसते. परंतु खरे शिक्षण अनेकदा असे चकचकीत नसते.
एखाद्या मुलाने शिक्षकाला विचारलेला अनपेक्षित प्रश्न, प्रयोग फसल्यावर पुन्हा केलेला प्रयत्न, पुस्तकातील मजकुरावर झालेली चर्चा किंवा गणिताचे अवघड उदाहरण सोडवताना केलेली धडपड या गोष्टी कदाचित कॅमेऱ्यात आकर्षक दिसणार नाहीत; पण याच प्रक्रियेत शिकण्याचे खरे बीज दडलेले असते.
दुर्दैवाने सोशल मीडियाकेंद्रित संस्कृतीमुळे शिक्षकांवरही अतिरिक्त ताण वाढत आहे. अध्यापन करणे, उत्तरपत्रिका तपासणे, पालकांशी संवाद, बैठका, शाळेतील प्रशासकीय जबाबदाऱ्या यासोबतच शासकीय कामे राज्यातील शिक्षकांच्या पाचवीला पुजलेली आहेत. त्यात आता 'पोस्ट करण्यायोग्य' उपक्रमांचे नियोजन आणि त्याचे चित्रीकरण यांचीही भर पडत आहे. याहून गंभीर परिणाम मुलांवर होत आहेत. प्रत्येक कृतीला कॅमेरा आणि प्रत्येक यशाला टाळ्यांची अपेक्षा जोडली गेली तर मुलांना सहभागाचा आनंद लुटून कृतीतून अनुभव मिळवण्यापेक्षा प्रदर्शन महत्त्वाचे वाटू लागेल.
'मी काय शिकलो?' याऐवजी 'माझा फोटो किती लोकांनी पाहिला?' याचेच आकर्षण त्यांच्या मनात निर्माण होऊ शकते. शाळेच्या कार्यक्रमांमध्ये नेहमी पुढे दिसणारी, आत्मविश्वासाने कॅमेऱ्यासमोर बोलणारी मुले अधिक ठळकपणे प्रसिद्ध होतात. पण शांतपणे अभ्यासात प्रगती करणारी, प्रश्न विचारण्यापेक्षा निरीक्षणातून शिकणारी किंवा अंतर्मुख असलेली मुले दुर्लक्षित राहण्याची शक्यता वाढते.
वृक्षारोपणाचा कार्यक्रम मुलांनी झाडे लावल्यामुळे महत्त्वाचा आहे. त्या झाडाजवळ उभे राहून काढलेल्या छायाचित्रामुळे नव्हे. आपण हे कधी समजून घेणार? विज्ञानाचा प्रयोग मुलांच्या जिज्ञासेला चालना देतो म्हणून महत्त्वाचा आहे; तो इंटरनेटवर व्हायरल झाला म्हणून नव्हे. म्हणून शाळांनी स्वतःसाठी एक साधी पण कठोर कसोटी निश्चित करावी. हा उपक्रम सोशल मीडियावर पोस्ट करता आला नाही तरी आपण तो करणार आहोत का? उत्तर 'होय' असेल, तर तो उपक्रम शिक्षणकेंद्री आहे. 'नाही' असेल, तर त्याचा पुनर्विचार आवश्यक आहे. पालकांचीही यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. शाळेच्या सोशल मीडिया फॉलोअर्सची संख्या, आकर्षक व्हिडिओ किंवा सतत होणाऱ्या कार्यक्रमांपेक्षा शिक्षकांची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता, वाचनाची सवय, प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आणि विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती यांना प्राधान्य दिले पाहिजे.
संपादकीय : बळी गलथान कारभाराचे
शाळा या स्वत:चे प्रदर्शन करणाऱ्या संस्था नाहीत, शिक्षक हे कंटेंट क्रिएटर नाहीत आणि मुले ही मार्केटिंगची साधने नाहीत. कॅमेरा बंद झाल्यानंतरही मुलांच्या मनात जे ज्ञान, जिज्ञासा, संवेदनशीलता आणि विचारशक्ती उरते, त्यालाच शिक्षण म्हणता येईल. क्षणिक लाईक्सपेक्षा आयुष्यभर उपयोगी पडणारे शिक्षण मोठे आहे. त्यामुळे शाळांनी प्रसिद्धीच्या प्रकाशझोतातून थोडे बाजूला होत पुन्हा वर्गखोलीच्या शांत, साध्या आणि खऱ्या जगाकडे वळण्याची गरज आहे.

