Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Pavana River Bridge : पवना नदीवरील पादचारी मार्ग बनला धोकादायक

Pavana River Bridge : पवना नदीवरील पादचारी मार्ग बनला धोकादायक

प्रभात 2 weeks ago

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरासह धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. या संततधार पावसामुळे आणि नदीला आलेल्या पुरामुळे चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाजवळ असलेल्या पवना नदीच्या पुलावरील पादचारी मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

पुलाचे सिमेंटचे संरक्षक कठडे पुराच्या पाण्याच्या प्रचंड वेगाने वाहून गेले आहेत. कठडे वाहून गेल्यामुळे आणि पादचारी मार्गावर खड्डा पडल्यामुळे हा मार्ग आता नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाने तातडीने या ठिकाणी फलक लावून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

आदित्य बिर्ला रुग्णालय परिसरातील पवना नदीवर असलेला हा पूल चिंचवड आणि थेरगाव, डांगे चौक परिसराला जोडणारा दुवा आहे. या पुलावरून दररोज हजारो वाहनांची आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. नागरिकांना पायी चालण्यासाठी पुलाच्या बाजूने स्वतंत्र पादचारी मार्ग (फूटपाथ) तयार करण्यात आला होता.

मात्र, नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात नदीचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने, पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे पादचारी मार्गाचे मोठे नुकसान झाले. पुलाच्या दोन्ही बाजूंचे संरक्षक कठडे पाण्याच्या प्रवाहात उन्मळून वाहून गेले आहेत. कठडे नसल्यामुळे पुलावरून चालताना थेट नदीच्या पात्रात कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.

पुराचे पाणी ओसरल्यानंतर या पादचारी मार्गाचे विदारक चित्र समोर आले आहे. पादचारी मार्ग पूर्णपणे उखडला असून त्यावर धोकादायक आणि मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. रात्रीच्या वेळी किंवा अंधारात हे खड्डे चालणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येत नाहीत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी या मार्गावरून चालणे म्हणजे जिवावर बेतण्यासारखे झाले आहे.

तोल जाऊन थेट नदीत पडण्याचा मोठा धोका या ठिकाणी निर्माण झाला आहे. सध्या पावसाचा जोर ओसरला असल्याने नदीची पातळी कमी झाली आहे. पुन्हा पाणी पातळी वाढल्यास धोका अधिक गंभीर होऊ शकतो. त्यामुळे महापालिका प्रशासन याकडे कधी गांभीर्याने पाहणार आणि पुलाची डागडुजी कधी सुरू करणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

महापालिका स्थापत्य विभागाकडून फलकबाजी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूला सावधगिरीचे फलक लावले आहेत. पादचारी मार्ग धोकादायक झाला आहे, नागरिकांनी काळजी घ्यावी, अशा आशयाचे फलक लावून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकल्याची भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

केवळ फलक लावल्याने नागरिकांचा जीव सुरक्षित होणार नाही, तर या ठिकाणी तात्पुरती बॅरिकेडिंग करणे आणि पादचारी मार्ग तत्काळ दुरुस्त करणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप
या पुलावरून परिसरातील नागरिक सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जातात. तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे कामगार आणि शाळा-कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने या मार्गाचा वापर करतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

प्रशासनाने दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने युद्धपातळीवर या पुलाची आणि पादचारी मार्गाची दुरुस्ती करावी. केवळ फलक लावून अपघात टळणार नाहीत, तर तिथे तात्पुरते मजबूत रेलिंग बसवणे आवश्यक आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.

Education Committee: अधिकाऱ्यांकडून शिक्षण समितीची दिशाभूल; डीबीटीऐवजी e-RUPI आधारित प्रणालीद्वारे निविदा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat